आत्मोन्नती कशी साधावी – २०

धन ऐश्वर्य समृध्दी , मायेची झाली वृध्दी । जन समुदाय प्रसिध्दी , राहे सर्वथा येथीची ।।(आत्मो. साधना-८)

आत्मोन्नती साधना सांगते की ब्रह्मांड निर्मिती पासून जीवाशिवाचे मिलना पर्यंतच्या विषयांची मांडणी सातवारात केली आहे. घागर मे सागर असे आत्मोन्नती साधनेचे स्वरूप आहे.

बहु जन्म पुण्ये फळालागी आली तेव्हा मनुष्य देह प्राप्त झाला. तो सार्थकी लागला पाहिजे. आत्मोन्नती ही केलीच पाहिजे. ही काळजी स्वतःलाच करावी लागणार आहे. ईश्वरानी आम्हाला सजीव सृष्टीमध्ये श्रेष्ठतम केल. मन , बुध्दी दिली. पंच ज्ञानेंद्रिय , कर्मेंद्रिय दिलीत. विवेक दिला. चित , वृत्ती , प्रवृत्ती दिली. अन् आम्ही मिळालेल्या अनमोल देहाची गुंतवणूक विषयांमध्ये केली. प्रपंच सर्वतोपरि मानला. त्यासाठीच काबाडकष्ट उपसले. सत्ता , संपत्ती , संतती पाठी स्वतःची लांडगेतोड करवून घेतली. मोठा व्याप केला. अन् स्वतःचा संताप तेवढा वाढविला.

ज्यावेळी हातापायातील बळ सरून गेल , दृष्टी अधू झाली , कान बधीर झाले , शरीरास कापर भरल , तेव्हा कळल की प्रपंच नावाचा व्यवहार खोटा आहे. जन्म नावाची अपूर्व संधी आपण वाया गमावली. लहानपणी बाहुला -बाहुलींना सजवल. तारूण्यात स्वतःला नटवल. आयुष्याचे श्वास संपण्याची वेळ आली. तेव्हा आठवल ,तेवढ अंतरात्म्याला सजवण्याचे बाकी राहिल आहे. पण वेळ निघून गेलेली असते. सार कमावलेल इथेच सोडून जाव लागते. हा अनुभव कोरोनाच्या काळात आपण सर्वांनीच घेतला आहे. महावस्त्र आहेत पण नेसता येत नाहीत. दागदागिने आहेत पण घालता येत नाहीत . सार काही पेटीच धन. महाल असो वा झोपडी सारेच नजरकैदेत आहेत. जे गेलेत त्यांच्या सोबत कुणीही नाही.

पूर्वी म्हणायचे , बायको दरवाज्या पर्यंत , मुल बाळ , आप्त- गणगोत स्मशानापर्यंत , लाकड राख होईपर्यंत सोबत करतील …पण हेही समीकरण बदलल. घरातून बाहेर पडला की कुणीच नाही. आपल जगण- मरण केवळ ईश्वरी इच्छा. इथे सारेच वशीले कुचकामी.

तेव्हा सज्जनहो शरीर शुध्द करून आत्मा विकसित करण्यार्‍या कर्माकडे लक्ष द्या. श्री सद्गुरूंना शरण जा. तरच आपले कल्याण आहे.


सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय ।

लेखक- प्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanan kulkarni19@gmail.com

mrMarathi