आत्मोन्नती साधना – १८


वाटे जरी नसावे दुःख कष्ट नी भोग , शोधावे त्याचे उगम ।( आत्मो. साधना-४७ ) आपल्याला प्राप्त झालेल दुःख कष्ट नी भोगास आपले आचार-विचार-कर्म जबाबदार असतात. ही त्रिवेणी आपल्या जीवनातील सुख-दुःखाच उगमस्थान आहे. ज्यांचे जीवनात स्वर्गोपभोग असतील त्यांनी हे आपल्या पूर्व पुण्याईच फळ आहे , हे लक्षात घ्याव. सुख -सुबत्तेचे-ऐश्वर्याचे सोहळे उपभोगतांना अधिक सावध व्हाव. जीवनात जरी असले स्वर्गसुख , जाणावे हे पूर्वपुण्याचे फळ । आपले आचार , विचार , कर्म तसेच आपल्या चित्त , वृत्ती , प्रवृत्ती याचा प्रवाह जाणीवपूर्वक स्वच्छ ठेवावा. इथे प्रदुषण खपवून घेतल्या जात नाही. शरीर शुध्दीचे व आत्मा उन्नतीचे कर्म करित रहावेच लागते. अन्यथा आत्मोन्नती साधना सांगते की , न करशील सायास आत्मोन्नतीचा , र्‍हास होई पूर्व पुण्य संचिताचा । उपभोगात मग्न राहिलात तर पुण्याईचा ठेवा संपेल. पुढील जन्म पुन्हा दुःख-कष्टाचेच असतील. यावर कुणी अशीही शंका घेईल की , याचा अर्थ स्वर्गोपभोग घेऊच नयेत का ? सुखावर आमचा अधिकार नाही काय ? या प्रश्नावर , पुण्याईचा ठेवा वाढविण्याची युक्ती श्री नरेंद्रनाथ सांगतात. स्वर्गोपभोग घ्या पण त्यात गुंतू नका. जीवाने सद्गुरूंच्या सेवेत रहाव. इंद्रियांची गुंतवणूक भक्तीत करावी. आपल चरित्र्य व चारित्र्य उज्ज्वल ठेवाव. अशान पुण्याईचा ठेवा निरंतर वाढत राहिल.
सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय !
लेखक- प्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi