आत्मोन्नती साधना – लेख -३३.

" श्री सद्गुरूंना शरण जाव. म्हणाव , माझ्या ठिकाणी असलेल्या बुध्दीला निश्चयात्मक करा. जेणेकरून ती भगवंताचे चरणी स्थिर राहील. मनाच्या चंचलतेला पूर्ण विराम द्या. जेणेकरून ते तुम्हाला समर्पित करता येईल".

सद्गुरूविण दुसरे काही नाही ।भवसागर तरूनी जाण्या । अज्ञान अहंकारादी गुण , त्यागणे आवश्यक आत्मोन्नती साधण्या.।।

जन्म. कौंटुंबिक दृष्ट्या आनंदाचा सोहळा. पण पारमार्थिक दृष्टिकोनातून जन्म म्हणजे विस्मरण. आत्म्याच परमात्म्याशी असलेल्या नात्याच विस्मरण ! मी कोण ? जन्मापासून कोSहं कोSहं चा आक्रोश सुरू होतो. जीवाच – शिवाशी असणार नात विस्मरणात जात.

आईच्या गर्भात असल्यामुळे अप्रत्यक्षपणे भूमीशी संपर्क येतो , कारण आईचे पाय जमिनीला लागलेले असतात. पण अप्रत्यक्ष असल्यामुळे अहंकाराची तीव्रता कमी असते. पण जसा प्रत्यक्षपणे या जीवाचा स्पर्श भूमीशी होतो तसा अहंकार उत्पन्न होतो. वाढीस लागतो. अहंकार हा भूमीचा गुण आहे. ज्याचाही तिला स्पर्श होईल त्यात तो निर्माण होणार आहे. पुढे पुढे जीवाचा हा अहंकार जसा जसा वाढेल तसे तसे भगवंताशी असणार्‍या नात्याचे विस्मरण वाढत जाते. भगवंता विषयीच स्मरण केवळ सद्गुरू जागवू शकतात.

परमात्म्यान प्राण्यांपैकी कुणीतरी आपल्या सारख व्हाव म्हणून मानवामध्ये आपल मन आणि बुध्दीची स्थापना केली. बुध्दीच्या द्वारेच मनुष्याला परमेश्वराचे अस्तित्व जाणवते. त्यासाठी ही बुध्दी सत् पक्षाचा कैवार घेणारी असली पाहिजे. ती निश्चयात्मक झाली पाहिजे. ती निश्चयात्मक झाली की परमेश्वराचे ठिकाणी स्थिर होते. त्याला मी कोण हे कोडे उलगडते. नात्याच स्मरण होते. हे ज्ञान देण्याचा अधिकार श्री सद्गुरूंचा आहे.

श्री सद्गुरूंना शरण जाव. म्हणाव , माझ्या ठिकाणी असलेल्या बुध्दीला निश्चयात्मक करा. जेणेकरून ती भगवंताचे चरणी स्थिर राहील. मनाच्या चंचलतेला पूर्ण विराम द्या. जेणेकरून ते तुम्हाला समर्पित करता येईल.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक – प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला. gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi