आत्मोन्नती साधना- लेख-३४.

"विवेक ठरवतो की माझा देह देवाच मंदिर व्हाव. श्री सद्गुरू हा विवेक जागा करतात."

रत राहोनी सद्गुरू सेवेत , नित्य नेमे साधना करित । अंगिकारोनी गुरूभक्ति , आत्मोन्नती साधावी ।।

विवेक ठरवतो की माझा देह देवाच मंदिर व्हाव. श्री सद्गुरू हा विवेक जागा करतात. अन्यथा देह विकारांची धर्मशाळा झालाच म्हणून समजा.

माझा देह विकारांची धर्मशाळा म्हटल की कुणीही याव कसही याव. केव्हाही याव. वाट्टेल तसा धिंगाणा घालावा. सगळ अस्ताव्यस्त , उध्वस्त कराव.

माझा देह देवाच मंदिर म्हटल की , चैतन्य , पावित्र्य आल. मंदिर परम सुखशांती च निधान आहे.

दुधामध्ये ज्या प्रमाणे लोणी तसा देहामध्ये चक्रपाणी असतो. पण साधारण डोळ्यांना हे सत्य दिसत नाही. त्यासाठी काही शिस्तबध्द संस्कार करावे लागतात. श्री सद्गुरू आवश्यक
ते संस्कार करतात. जस दुधावर योग्य वेळी योग्य संस्कार केले की नवनीत मिळत. श्री सद्गुरू हा संस्कार करतात.

तप , मंथन , तप असा हा त्रिवेणी संस्कार आहे.

दुध तापविल नाही तर नासते. आयुष्य तपाने तापविल नाही तर तेही नासते. तापविलेल्या दुधाला विरजण घालतात व मंथन करून लोणी मिळवितात. श्री सद्गुरू मी कोण ? कोठून आलो ? जन्माच प्रयोजन काय ? माझा स्वधर्म कोणता ? या सारख्या प्रश्नांवर विचार मंथन घडवून आणतात. आत्ममंथन करायला लावतात. मंथनानी निष्कलंक चरित्र व चारित्र्याच लोणी मिळत. सद्गुरूनां हे नवनीत आवडत. लोण्यालाही तापविण्याचा संस्कार केला की तुप होते. मग हे जितक जुन होत जाईल तितक गुणधर्मान श्रेष्ठ ठरत. निष्कलंक झाल्यावरही पुन्हा तप आलच.

श्री सद्गुरू आपल्याला अस घडवितात. आपल्या आत्म्यावर जप , तप , अनुष्ठान , हवन , उपासना , प्रबोधन , उद्बोधनाद्वारे संस्कार करतात. जेणेकरून आपला देह शुध्द व आत्मा उन्नत होतो.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक – प्रा. गजानन कुळकर्णी ,अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi