आत्मोन्नती साधना – लेख ३५.

"प.पू. श्रीनरेंद्रनाथांची आत्मोन्नती साधना , ज्ञानांजन आहे. ते आपल्या देहबुध्दीच्या अहंकाराची धुंदी खाडकन उतरविते !"

मानव म्हणे मी कितीकांते , दिले अन्न वस्त्र निवार्‍याते । करि पालन पोषण जगाचे , म्हणे देव काय करि ।

परमेश्वर हा विश्वनियंता आहे. त्या सम तो दुजा नसे कुणी , असेच त्याचे वर्णन करता येईल. त्याची ब्रह्मांडरचना अफाट आहे. त्यांची संख्या अनंतकोटी आहे. त्यातील एका ब्रह्मांडावर आपण आहोत. अनंतकोटी ब्रह्मांडातील सृष्टि , विसृष्टि मधील घटकांची संख्याही असंख्यच ! दोन अंकी बेरीज-वजाबाकी साठी गणकयंत्र वापरणारे आम्ही अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री गुरूंना व अनंतकोटी ब्रह्मांडाचे निर्माण करणार्‍या ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. देव आहे कुठे इथून आमच्या प्रश्नाला सुरूवात होते. ती देव काय करतो इथवर जाते.

त्याच देण अनंत हस्ते आहे. ते घेतांना आमचे होन हात किती अपुरे आहेत याची आम्हाला जाणीव असायला हवी.

आपली बुध्दि , मति , गति , प्रगती , शक्ति , दृष्टि , आवाका , जाणीव ….. यांना पदोपदी मर्यादा आहेत.
असे असूनही आपण सर्वज्ञाचे थाटात वावरतो. मी केल मी दिल अशीच आमची भाषा असते.

प.पू. श्रीनरेंद्रनाथांची आत्मोन्नती साधना , ज्ञानांजन आहे. ते आपल्या देहबुध्दीच्या अहंकाराची धुंदी खाडकन उतरविते !

अशा वेळी समर्थ रामदासांच डफगाण आवर्जून आठवत.

समर्थ चाफळहून परळीस निघाले. मार्गात पालीस पौष मासातील जत्रा भरली होती. जत्रेत दोन शाहीर परस्परांवर चढ टाकत होते. समर्थांना पाहताच त्या दोघांनीही साष्टांग नमन केले. त्यावेळी समर्थांनी त्या दोघांवर चढ टाकला.

चढातील प्रश्नावली सुरू झाली-किती पृथ्वीचे वजन । किती आंगोळ्या गगन ।सांग सिंधूचे जीवन किती टांक ।। किती आकाशीचा वारा । किती पर्जन्याच्या धारा । तृण भूमीवरी चतुरा । संख्या सांग ।। वायुसरसे उडती सांग अणूरेणू किती । लक्ष चौर्‍यांशीची उत्पत्ती संख्या सांग ।। अठरा भार वनस्पती । भूमंडळी पाणी किती । पुष्पे फळे जाती किती । संख्या सांग ।। बीज वडी आणि पिंपळी । किती आहे भूमंडळी । सर्व धान्याची मोकळी । संख्या सांग ।। सर्व सरितांची वाळू किती । सिंधूसागरी वाळू किती । हरखूं आहे किती । संख्या सांग ।। रामदासाचा विनोद । सांडी अहंतेचे बीज । मग स्वरूपी आनंद सुखी राहे ।।

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi