आत्मोन्नती साधना -लेख ३६.

" पंचमहाभुतांची कृपा हवी असेल तर , स्वधर्माचे पालन करा. आपल्या कोमजलेल्या चित्त , वृत्ती , प्रवृत्ती टवटवीत होतील. अस्थिरता , अशांतता जाईल."

” ईश्वराच्या अनुमती विना , मानव बदलू पाहे ब्रह्मांड रचना । हेचि न कळे मानवा , कारण असे अशांतीचे ।।”

ईश्वरानी अनंतकोटी ब्रह्मांड निर्माण केलीत. सृष्टी निर्माण केली. विशेष सृष्टी म्हणजे मनुष्य प्राणी निर्माण केले.

मनुष्याच शरीर कस बनत व कार्य करत याची सखोल ज्ञान चर्चा आपल्या प्राचीन वाङमयात केली आहे.

पृथ्वीला अन्न म्हटल्या गेल आहे. पृथ्वीतून धान्य , रसभरित फळ निर्माण होतात. आपण खाल्लेल्या अन्नाच्या स्थूलाचा मळ , मध्यम भागातून मांस , आणि सूक्ष्म भागातून मन तयार होते. आपल्या आहारावर आपल मन तयार होणार आहे.

जलाचेही असेच. स्थुलातून मुत्र , मध्यम भागातून रक्त , आणि सूक्ष्म भागातून प्राण तयार होतो.

तेजाच्या स्थुलभागातून अस्थि , मध्यम भागातून मज्जा , आणि सूक्ष्मतम भागातून वाक् तयार होतो.

परमेश्वर हा विश्वनियंता आहे. त्याने विचार पूर्वक प्रत्येक सजीवाचा आहार , विहार नेमून दिला आहे. आपापले धर्म नेमून दिले आहे.

ईश्वर म्हणाला , ” माणूस माझा पिंड आहे. त्यान सुनियोजितपणे ईश्वरीय शक्तिनां माणसामध्ये वसवल. त्यास तपस्वी , तेजस्वी व तत्पर केल.आपली सर्वश्रेष्ठ रचना म्हणून त्यान माणूस प्रस्तुत केला.

आज ही सर्वश्रेष्ठ रचना अस्थिर , अशांत आहे. ईश्वरीय रचनेला बदलविण्याच्या उन्मादात त्यान स्वतःला धोक्यात घातल आहे. माणूस वगळता इतर सजीवांना आपला आहार , विहार , स्वधर्म सांभाळलाय. मांजर कितीही तहानलेली असली तरीही ती कोल्डड्रिंक पित नाही. वाघ कितीही भूकेला झाला म्हणून गवत खात नाही.

माणूस त्याचा स्वधर्म विसरला. आहारा-विहारापासून दूर गेला. भगवंताच्या चरणांना मुकला. काळ-वेळेचे त्याचे भान सुटले. विपरित कर्माकडे त्याचा ओढा वाढला. ईश्वराच्या नियोजित व्यवस्थेवर त्यान आघात केलेत. नीतिनियम पायदळी तुडवले. आत्मोन्नती सोडुन इतर उद्योगात मन रमवले. याच्या त्याच्या तेजस्वीतेवर परिणाम झाला. तो मलुल झाला. कोमेजला. त्याचे मन , प्राण आणि वाक् शक्ति क्षीण झाल्या आहेत. तो अशांत , अस्थिर झाला. सदैव गोंधळलेल्या स्थितीत तो वावरतो आहे. ईश्वराच्या नियोजित व्यवस्थेवर आम्ही आघात केले. नीतिनियम पायदळी तुडवले. आत्मोन्नती सोडुन इतर उद्योगात मन रमवले.

प.पू. नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नती साधनेतून आम्हाला परोपरिन हाच विचार करायला लावला आहे.

मनुष्य ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ रचना आहे. तिला नासविणे हा त्या विधात्याचा अपमान आहे. आपल शरीर शुध्द करणे आत्मा उन्नत करणे हाच आपल्याला प्राप्त झालेला स्वधर्म आहे. स्वधर्म शोधावा लागत नाही. तो प्राप्त होतच असतो.

पंचमहाभुतांची कृपा हवी असेल तर ,स्वधर्माचे पालन करा. त्याच क्षणापासून आपण ताजेतवाने व्हायला लागु. उपसनेला दृढ चालवा. तपाने तेजस्वीता वाढेल. आपल्या कोमजलेल्या चित्त , वृत्ती , प्रवृत्ती टवटवीत होतील. अस्थिरता , अशांतता जाईल.

mrMarathi