आत्मोन्नती साधना- लेख ३७.

"संचित कर्माला अनुसरून माणसाला जन्माला घालण हे ईश्वरी कार्य ! जन्माला आलेल्या जीवावर कर्माचे संस्कार करण हे श्री सद्गुरूंच कार्य !"

” देव मानीती गुरूंसी , जे घडविती मानवासी । गुरू सांगती सर्वांसी , देवची विधाता ब्रह्मांडी ।।

ईश्वरानी अनंत ब्रह्मांड निर्माण केली. जीवसृष्टी निर्माण केली. अवघ्या ब्रह्मांडाचा पालनकर्ता म्हणून प्रत्येक जीवाच्या अन्न , वस्त्र , निवार्‍याची व्यवस्था केली. आणि अदृष्य झाला.

संत माहात्म्यांनी त्याचा निवास स्वर्गात सांगितला आहे. तिथून तो दिव्य दृष्टीन सार काही अवलोकन करतो. मानवाला न उमगणारा ब्रह्मांडाचा खेळ हा खेळिया तिथून खेळतो.

पृथ्वीवर तो सार्वभौम झाला नाही. तो मान त्यान श्री सद्गुरू या तत्त्वाला दिला.

श्री सद्गुरू स्वतः सार्वभौम आहेत. तर्क बुध्दीच्या पलिकडे जाऊन ते हव ते करू शकतात. कतुर्मकर्तुम अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य आहे.

संचित कर्माला अनुसरून माणसाला जन्माला घालण हे ईश्वरी कार्य ! जन्माला आलेल्या जीवावर कर्माचे संस्कार करण हे श्री सद्गुरूंच कार्य !

श्री सद्गुरू अनुग्रहित जीवास जसा जन्माला आला तसा स्वीकारतात. संस्कारानी पाहिजे तसा घडवितात.

अनुग्रहितांची आत्मोन्नती करवून घेतांना सद्गुरू त्याला ईश्वराची उपासना देतात. ईश्वराचे नाम देतात. स्वतःचा उदोउदो कधीच करवून घेत नाहीत.

ईश्वर आणि श्री सद्गुरू हे दोघेही परस्परांचा उचित सम्मान करतात. परस्परांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करित नाहीत. इतकच काय साध डोकावूनही पाहत नाही.

आध्यात्मिक उन्नतीसाठी जीव सज्जन , सत्शील , सत्प्रवृत्त , सत्कर्मी , लोकोपयोगी असावा लागतो.

सद्गुरू उपासना आणि प्रभूनामस्मरणाने त्याच्यातील दोष वजा करतात. काम क्रोधादि विकारां मुळे अशांत अस्थिर झालेल मन शांत करतात. त्याचा विवेक जागा करतात.

जे सत् आहे त्या बद्दल माहित असण हा एक भाग झाला. यास विवेक म्हणता येत नाही. तर जे जे सत् आहे त्याच आचरण करावयास लावण हे विवेकाच काम आहे.

दुर्योधन कृष्णाला म्हणाला , ” जेवढा धर्मराजाचा अभ्यास आहे , तेवढाच माझा देखिल आहे. परंतु ती माझी प्रवृत्ती नाही. या नाहीचे कारण विवेकाचा अभाव. दुर्योधनाचा विवेक जागा नसल्यामुळे तो तस बोलला. शस्त्र शास्त्रांच्या ज्ञाना मध्ये , शक्ति-युक्ति मध्ये तो सरसच होता. पण त्याचा विवेक आंधळा होता. सद्गुरू विवेक जागा करतात.

अशा श्री सद्गुरूंचे मी काय वर्णन करावे. समर्थ रामदास स्वामींनी देखील अखेर ” सद्गुरू
वर्णवेना , हेचि गे माझी वर्णना ” अस मान्य केल. तिथे मी त्या तत्त्वाला शरण जाणच योग्य !

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi