आत्मोन्नती साधना- लेख ४० .

"जस अन्नरस हा शरीराला पुष्ट , संतुष्ट करतो. तस श्री सद्गुरूंनी दिलेल नाम हे आत्म्याला पुष्ट , संतुष्ट, करत. कर्म उपासनेन शरीर व आत्मशुध्दी होते. आत्मोन्नती साधण्यासाठीचा हा गुरूमार्ग आहे."

“संसारी जन सुख स्वार्थाचे , दुःख संकटी नाही कुणाचे । म्हणुनी बंध तोडुनी मायेचे , सद्गुरू चरण घट्ट धरावे ।।”

जीवनाला श्री सद्गुरूंच कृपाकवच असलच पाहिजे. संसारात ज्यांचे साठी आपण अपार कष्ट उपसतो अशी अनेक नाती असतात. त्यांचे सुखात आपण नाचलो. ज्यांच्या दुःखान आपण कळवळलो. ते सगे सोयरे (?) आपण दुःख संकटात असतांना आपल्या सोबत नसतात.

रिकाम्या डब्यांच्या घरात उंदिर देखील राहत नाहीत. ही तर माणस आहेत. ही जगरहाट आहे.

एका जुन्या कवितेची या वेळी आठवण येते.
“खडबड हे उंदिर करिती । कण शोधायाते फिरति । परि अंती सोडोनि जाती । गणगोत तसे आपणाला ।।”

जग सुख स्वार्थाच ! दुःख संकटी नाही कुणाच ! ही इथल्या गणगोताच्या वागण्याची रित. अशा वेळी आपुला कैवार घेणारे श्री सद्गुरूच असतात.
म्हणून सर्व मायेची मायिक अर्थात खोटी नाती तोडावी. सद्गुरूंचे चरण घट्ट धरावे.

सद्गुरू आपल्या जन्माला येण्याचे प्रयोजन सांगतात. जिंवत राहण्यासाठी स्वस्थ व निरामयतेसाठी अन्नरस आवश्यक असतो. तसेच शरीराच्या आणि आत्म्याच्या पोषणासाठी साधना आवश्यक असते.

आपण वर्षभराच एकदाच जेवून टाकतो का ? अस करून अन्नरस तर साठणार नाहीच. शरीराचे भरण , पोषण , तोषण होणारच नाही. उलण मरण ओढवेल. अजीर्ण होईल. यातना होतील.

पंच पक्वांनाच एकदाच जेवलात. समाधान होईल का ? सकाळी सुग्रास आकंठ जेवलात तरी सायंकाळी भूक लागतेच.

तसे उपासना-साधना-जप-तप-हवन-अनुष्ठानाचे बाबतीत का असू नये ?

जस अन्नरस हा शरीराला पुष्ट , संतुष्ट करतो. तस श्री सद्गुरूंनी दिलेल नाम हे आत्म्याला पुष्ट , संतुष्ट, करत. कर्म उपासनेन शरीर व आत्मशुध्दी होते. आत्मोन्नती साधण्यासाठीचा हा गुरूमार्ग आहे.

हे समजून आपण वागलो नाही तर आपल जीवन काहीच नाहीचा पाढा बनेल.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi