आत्मोन्नती साधना. लेख- ४४ .

"संतही श्रीमंत असतात. त्यांच्या संगतीला आलेल्या प्रत्येकास ते श्रीमंत बनवितात. आपण श्रीमंत कस झालो याची युक्ति ते सांगतात. आपल्या जवळच महाधन ते खुशाल लुटतात".

” संत सद्गरू असती परमेश्वर , ज्ञानाचा ते अथांग सागर । स्वप्रयत्ने स्थित्यंतर घडविती , साधकात क्षणोक्षणी ।”

”व्यवहारात आपण जो श्रीमंत असतो त्याचे गुण गातो. त्याच्या मागेपुढे करतो. त्यान पश्चिमेला पूर्व म्हणाव. आपण त्यालाही हो म्हणतो. आपला स्वार्थ व चोचले पुरविणारा म्हणून आपण त्याचा उदो उदो करतो. वेळप्रसंगी त्यान केलेला अपमानही गोड मानून घेतो.

संतही श्रीमंत असतात. त्यांच्या संगतीला आलेल्या प्रत्येकास ते श्रीमंत बनवितात. आपण श्रीमंत कस झालो याची युक्ति ते सांगतात. आपल्या जवळच महाधन ते खुशाल लुटतात. मात्र कुणाचाही अपमान करित नाहीत. संतांजवळ विषय सुखाच्या समृध्दीची श्रीमंती नसते. मुळात ती समृध्दि नसते. ती चंचल आहे. नाशीवंत आहे. संताजवळ परमार्थाच महाधन असत. त्यायोग ते ईश्वराचे समचरण मिळवितात. तुका म्हणे धन । ज्याचे निज नारायण । अशी अविनाशी श्रीमंती त्यांची असते. तुकोबारायांनी मी श्रीमंत कसा झालो. याच रहस्य उलगडून दाखविल आहे. “काही पाठ केली संतांची वचनं । अति आदर ठेवोनिया ।। संत हेच सद्गुरू असतात. त्यांच्या वचन आणि चरणांवर निष्ठावंत भाव ठेवल्यास आपण ही श्रीमंत होऊ. आत्मोन्नती साधना हेच सांगते.

जुन्या दासबोधात श्री समर्थ रामदासांनी संतांची महती गायीली आहे. समर्थ म्हणतात , संत शांतीचे सागर । संत सर्वस्वी उदार । ज्ञान वरूषते जलधर । सर्वस्वावरी ।। संत कळवळ्याच लेण आहेत. विनाकारण कृपा करणे हा संतांचा स्वभाव.

देहाचही तसच आहे. आम्ही त्रिविध तापाच्या उष्णतेन होरपळतोय. आता नाश अटळ आहे. अशा वेळी संत नावाचा कृपाघन दाटून येतो. सर्वांवरच ज्ञानाची कृपा बरसणे सुरू होते. ज्ञानाची लालसा असणारे या वर्षावात भिजताहेत. पहिल्या ओलाव्याने मातीला सुंगध येतो. तसा ज्ञानसुंगध दरवळायला लागतो.

ज्यांचा अहंकार आडवा येतो. ते ज्ञान वर्षावात भिजत नाहीत.
ते कोरडे ठण्ण् राहतात. रखरखीत. त्यांची घमंड शुष्कपणाला आमंत्रण ठरते. ते जीवनातील खर्‍या आनंद , सुख , समृध्दीला मुकतात.

समर्थ संत , सद्गुरू समानार्थी मानतात.
संत आनंदाचे स्थळ । संत सुखचि केवळ । नाना संतोषाचे मूळ । ते हे संत ।। आत्मोन्नती साधना संग जया जैसा । लाभ तया तैसा । या नियमाची आठवण करून देते.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi