आत्मोन्नती साधना लेख -४३.

"गुरूमार्गी जीवाचा त्रिविध ताप नाहीसा होतो. नाही तरी त्याची तीव्रता तरी बोथट होते. जशा व्याधी नाहीशा व्हायला लागतात तसा गुरूमार्गी जीव संपन्न होत जातो."

” जन्मोजन्मीची आस , गुरू मिळावा मज विशेष । योगायोगे लाभती सत्पुरूष , शांती लाभे त्यांचे समीप ।।”

स्मृतींनी श्री सद्गुरूंच यथार्थ वर्णन केल आहे.
” ब्रह्मैवगुरूरूपेण वतिष्ठते “।
ब्रह्म या तत्त्वाला जेव्हा बध्द जीवाचा कळवळा आला. त्याचा उध्दार करण्यासाठी हे तत्त्व मानवी स्वरूपात प्रगट झाल. आपण सरसगट गुरू आणि सद्गुरू समानार्थी समजत असतो. मात्र ते तसे नाही.गुरू ही व्यक्ति आहे. सद्गुरू हे तत्त्व आहे.

हे तत्त्व चार-चौघांसारखेच वाटते. दिसते. म्हणूनच आम्ही त्यांचे बाबत नेहमीच चूकत असतो. त्यांना ओळखणे. त्यांचे चरणांशी निष्ठावंत राहणे. त्यांचे सेवेकरिता सान्निध्य लाभणे. त्यांचे विषयीचा शरणांगत भाव सतत वाढता असणे. त्यांच वचन वेद प्रमाण मानणे. या सर्वांसाठी आपल प्रारब्ध आणि संचित चांगल असाव लागत. अन्यथा कलि तेवढ सद्गुरू तत्त्व सोडुन जीवाला अन्यत्रच भटकवतो.

संतकवी श्री दासगणू महाराजांनी ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज शेगांव यांची आरती गायीली आहे. संतकवींनी या आरती मधुन श्री सद्गुरू तत्त्वाच स्वरूप , कार्य स्पष्ट केल.

सद्गुरू हे सत् , चित् स्वरूप आहेत. हे तत्त्व सत् आहे. ज्ञानस्वरूप आहे. जड-मुढ जीवांना तारण्यासाठी ते अवतीर्ण झाले आहेत.

संतकवी पुढे म्हणतात.
होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा.
सद्गुरू हे अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. मानवाच्या तर्क , बुध्दि , शक्ति , युक्ति च्या पलिकडे जाऊन कार्यरत राहणार हे तत्त्व आहे. ते मानवी स्वरूपात असल्यामुळे या तत्त्वाशी आम्ही माणूस म्हणूनच व्यवहार करित असतो. इथेच आमची घोडचूक होते. मात्र जो त्यांचा होईल. त्यांचे चरणी निष्ठावंत भाव ठेवील. त्याचे ते कल्याण करतात.

त्यांच्या कार्याच स्वरूप स्पष्ट करतांना संतकवी म्हणतात की , “व्याधी वारून केले कैका संपन्न.” आधिदैविक , आधिभौतिक , आध्यात्मिक अशा त्रिविध व्याधींनी हा जीव होरपळला जातो. परिणामी शांती , सुख , समाधान , चित्त , वित्त अस सारच काही गमावून बसतो. सद्गुरू त्याचे कडून उचित कर्म , उपासना करवून घेतात. त्याचेतील दोष वजा करतात. त्याच चित्त , वृत्ती , प्रवृत्ती सज्जन , सत्शील करतात. गुरूमार्गी जीवाचा त्रिविध ताप नाहीसा होतो. नाही तरी त्याची तीव्रता तरी बोथट होते. जशा व्याधी नाहीशा व्हायला लागतात तसा गुरूमार्गी जीव संपन्न होत जातो.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi