आत्मोन्नती साधना-लेख ४६

" भुकेल्याचा अन् अन्नाचा जसा निकटचा संबध आहे , तसा जीवाचा आणि नामाचा संबध आहे ".

” तैसेचि नामस्मरण करता , ईश्वर भक्ति वाढता । स्वरूप ईश्वराचे कळू लागे वैराग्य ज्ञान बाणू लागे ” ।।

आत्मोन्नती साधनेतून श्री नरेंद्रनाथांनी नामस्मरण -विष्णोस्मरण या भक्तीचा महिमा गायिला आहे. नाम हे जीवाच्या आत्मोन्नती प्रवासातील अत्यंत महत्त्वाचे पाथेय आहे. नामशिवाय या मार्गावरील प्रवास बिनधोक होऊच शकत नाही.

नामस्मरण कसे करावे याबाबत काही मार्गदर्शक तत्त्व आहे. आपण नाम घेतो ते फलद्रुप झाल पाहिजे. ते होत नसेल तर आपलेकडून नामाचे अपराध घडतात असा त्याचा अर्थ आहे.

जग्दगुरूं तुकोबारायांनी नवविधेतील नामस्मरण भक्तीला विठ्ठलाच्या शपथेवर ‘साधन पै सोपे’ अस म्हटल आहे.

शांतीब्रह्म संत एकनाथांनी नामाची अपार शक्ति कथन केली. “जेवढी नामाची शक्ति । तेवढे पाप नाही त्रिजगतीं । अस नाथ म्हणतात.

नामामुळे अक्षय आनंद का मिळतो याच सुंदर विश्लेषण माऊली ज्ञानेश्वरांनी केल आहे. “सततं कीर्तयन्तो मां ” या वर भाष्यात माऊली म्हणते , “नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचें ” ! भगवंताच्या नामस्मरणामुळे नामस्मरण घेण्यापूर्वीची सारी पातक नाहीशी होतात.

आत्मोन्नती साधनेतून प.पू. श्री नरेंद्रनाथ नामाचा आणि जीवाचा सहसंबध स्पष्ट करतात. भुकेल्याचा अन् अन्नाचा जसा निकटचा संबध आहे तसा जीवाचा अन् नामाचा संबध आहे.

भूक लागल्यावर आपण जेवण करतो. जेवणार्‍याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होऊ लागते.जीवनशक्ति मिळू लागते. भूक नाहीशी होते. असे तीन फायदे एकाच वेळी होतात. त्याच प्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो. त्यांचे नाम घेतो. त्याला ईश्वराबद्दल प्रेम निर्माण होते. त्याच्या स्वरूपा विषयीचा अनुभव येतो. तसेच इतर विषय वस्तुंबद्दल वैराग्य निर्माण होते.

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi