आत्मोन्नती साधना- शरीर माहात्म्य- लेख -२३

केले कर्म कोरले जाई , सुखदुःखे लिहिले जाई । अंतरात्म्यावरी बीजरूपे । स्वरूपे।।
प.पू. श्री नरेंद्रनाथांचा सर्वाधिक भर कर्मावर आहे. शास्त्र वचनाचा हाच दाखला आहे. सुखं , दुःखं , भयं , शोको हर्षो मंगलमेव च । संपत्तीश्च , विपत्तीश्च ।सर्व भवतु कर्मणा ।।
आपले जीवनमान , राहणीमान , सांपत्तिक स्थिती , संकट , सुख , दुःख , भय , शोक , आनंद , दारिद्र्य , …या सर्व गोष्टी कर्माचाच परिणाम आहे. इतकेच नव्हे तर आचार विचार , स्वभाव , योग आणि भोग हेही कर्माचाच परिणाम आहेत. यावर कुणी असाही प्रतिप्रश्न करेल की जर , सुखं , दुःखं , भयं…. हे सर्व कर्माचा परिणाम आहे तर , आम्ही या जन्मी योग्य कर्म करतो. आताच्या आताच आमच्या परिस्थितीचा कायापालट झाला पाहिजे. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी कर्माच्या संदर्भातील आपला गैरसमज दुर करतात. ” पी हळद अन् हो गोरी ” असा न्याय इथे लागू पडत नाही. प्रत्येक वाल्याचा महर्षि वाल्मिकी होत नाही. त्यांना देवर्षि श्री नारद मुनी भेटले. त्यांनी सद्गुरूंच्या भूमिकेतून त्याचा विवेक जागृत केला. त्यांचे कडून जप अनुष्ठान करून घेतले. या कर्मामुळे ते साहित्य जगतातील सर्वश्रेष्ठ रामायण या संस्कृत महाकाव्याचे रचियता झाले. हा त्यांचा दैवयोग होता. पण साधारण पणे आपल्या सर्वांना असेच वाटते की , तुप खाल्याबरोबर रूप याव. एकाच जन्मातील आपल्या कर्मानी आपले पूर्वसंचित आणि व्यक्तिमत्व बदलल्या जात नसते.आपले आचार विचार , स्वभाव , योग , भोग , बदलविणारी ही प्रक्रिया अतिशय धिम्या गतीची असते. अनंत जन्म घालविल्या नंतर कुठे हे शक्य आहे.
याचा अर्थ आपण असा काढला पाहिजे की , माझ भाग्य की मला या जन्मी मनुष्य देह मिळाला. त्याहून अधिक भाग्य हे की , माझे योग आणि भोग बदलले पाहिजेत , माझे हातून योग्य कर्म घडल पाहिजे , परमार्थ घडला पाहिजे याची मला जाणीव झाली. आणि महद्भाग्य हे की मला श्री सद्गुरूंंचा कृपाप्रसाद मिळाला . त्या योगे मी योग्य कर्म- उपासना दृढपणे करेल. तसेच सत्शील , सप्रवृत्त होऊन माझी प्रगती करेल. या जन्माची मिळालेली अपूर्व संधी सार्थकी लावेल. व पुढील जन्म ही सुधारेल. आत्मोन्नती साधना आम्हाला हाच वस्तुपाठ देते.कर्माचा संस्कार हा आमच्या आत्म्यावर कोरला जाणार आहे. व हे सर्व बरे वाईट जे ही संस्कार असतील ते माझ्या पुढील जन्माची खोळ ठरविणार आहे.
सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय !
लेखक – प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi