आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य -लेख २७.

व्यंकटनाथ महाराजांच्या या उद्गारात वात्सल्य होते. सामर्थ्याची प्रचिती होती. पंचमहाभूतांवर असणार्‍या त्यांच्या सत्तेची साक्ष देणारे ते उद्गार होते.

पंचप्राण पंचमहाभूते , असती गुरूंच्या आज्ञेत । गुरू न दावी स्वरूप आपुले जरी तो श्रेष्ठ ईश्वराहूनी ।।

नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथांनी आत्मोन्नती साधनेतून श्रीगुरूंची महती गायीली आहे.

ईश्वरू होय जरी कोपता ।गुरू रक्षेल परियेसा । परी गुरू कोपेल एखाद्यासी । कोणी न रक्षे तयासी ।। हे सद्गुरूंच सामर्थ्य आहे.

गुरूकार्य करणे म्हणजे श्री गुरूगीता गाण. श्री सद्गुरू चरणांवर शुध्द प्रेम जडल की ते सर्वतोपरी मार्गदर्शन करित असतात. ते सार्वभौम सत्ताधीश आहेत. पंचमहाभूतांवर आणि पंचप्राणांवर त्यांची निर्विवाद सत्ता असते.

प.पू. व्यंकटनाथ महाराज हे श्री नरेंद्रनाथांचे सद्गुरू. त्यावेळी डायल फोन नव्हते की आजच्या सारखे भ्रमणध्वनी. श्री नरेंद्रनाथ महाराज चार्टड अकाऊन्टट असल्यामुळे कामा निमित्त नगरला गेले होते. लाॅजच्या तिसर्‍या मजल्यावर रात्रीचे वेळी मुक्कामी होते. अचानक त्यांना पू. व्यंकटनाथ महाराजांचा आवाज आला. ते म्हणाले , “बाळ आम्ही येथेच आहोत. तू येथून कुठेही जाऊ नको”. आणि थोड्याच वेळात लाॅज हादरायला लागला. काॅट भिंतीवर आदळू लागला. छतावरची माती खोलीत पडायला लागली. वीज गेली. हा भूकंपाचा झटका आहे हे श्री नरेंद्रनाथांच्या लक्षात आल. त्यांनी निर्णय घेतला. जीव वाचवायचा असेल तर तिसर्‍या मजल्यावरून उडी मारू या. पायात पटकन जोडे घातले. खिडकीशी गेले. आता उडी मारायची. जे होईल ते पाहून घेऊ. तितक्यात पुन्हा आवाज आला , “बाळ , आम्ही तुला सांगितल न की कुठेही जाऊ नकोस”. त्या आवाजात आज्ञेची जरब होती. त्या सरशी महाराज काॅटवर स्वस्थ बसले. थोड्यावेळानी सार कस शांत झाल. ते खाली उतरले. सर्वत्र ढिगारे होते. होय तो कोयनेचा भूकंप होता !

पुढे श्री नरेंद्रनाथांची व व्यंकटनाथांची प्रत्यक्ष भेट झाली. कारे बाळ , “तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली असती तर काय झाले असते “…. व्यंकटनाथ महाराजांच्या या उद्गारात वात्सल्य होते. सामर्थ्याची प्रचिती होती. पंचमहाभूतांवर असणार्‍या त्यांच्या सत्तेची साक्ष देणारे ते उद्गार होते.
प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचीही पंचमहाभूतांवर अशीच निर्विवाद सत्ता आहे. नाथपंथाच्या प्रसार-प्रचारासाठी ते अनसुया आश्रमी गेले होते. हिमालयातील हा अतिशय दुर्गम भाग आहे.तेथील रहिवासी तुम्ही इथे हवन करूच शकत नाही असे म्हणाले. त्यांचे म्हणण्यात तथ्तही होते. कारण तिथे खर्‍या अर्थाने मुसळाधार पाऊस पडत असतो. महाराज म्हणाले , आम्ही येथेच हवन करू. अन् पाऊस आला तर…. महाराज म्हणाले , आम्ही त्यांना सांगु हे तुमचच हवन आहे. याने की आप गिरती बारीश रोकेंगे ! झाल या महाराजांच्या बोलण्याची बातमी झाली. नरेंद्रनाथ , गिरती बरसात रोखेंगे ! हा मथळा उत्सुकतेचा विषय ठरला. आणि सर्वांनी याचा अनुभव घेतला की , ज्या वेळी पावसाच पाणी यज्ञकुंडामध्ये पडणार तेव्हा महाराजांनी विभूती घेऊन यज्ञकुंडावरून हात फिरवल्या सारख केल. जणू पाऊसाच आच्छादन त्यांनी दूर केल. जोरदार पडायला आलेला पाऊस तिथून निघून गेला. हवनाची पूर्णाहूती झाल्यावर महाराज म्हणाले लवकर आवरा. आणि आवरून होत नाही तर तीन दिवस थांबलेल्या वरूण राजाने अनावर वृष्टीस प्रारंभ केला. हे सद्गुरूंच सामर्थ्य आहे.

अशा सार्वभौम शक्तीच कृपाकवच प्राप्त करण्यासाठी हे मना त्यांच्या चरणी शध्द प्रेम जडव.


सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय.
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi