आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य. लेख-२१


उध्दारार्थ जीवा जन्मा आलासी , देह , बुध्दी , मन घेऊनी ।उध्दरण्या प्रयत्न न करसी , जन्मो जन्मी व्यर्थ शिणसी ।। (आत्मो. साधना) श्री सद्गुरूंच मार्गदर्शन घ्याव. शरीराची शुध्दि करावी. आत्मा उन्नत करावा. ही ब्रह्मांड व्यवस्थापनातील ईश्वरी योजना आहे.या योजनेनुसार मनुष्य जन्म ही त्यानी दिलेली संधी आहे. ज्यानी संधीच सोन केल तो जिंकला. अन्यथा आयुष्याची माती अटळ आहे. लक्षात घ्या , संधी दुसर्‍यांदा दरवाजा ठोठावत नसते ! आमची इंद्रिय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मन हा इंद्रियांचा राजा. मनाचा स्वभाव चंचल खरा पण त्याचा एक गुण आहे. ते ज्याच्यात गुंतवल तिथेच गुंतते. मनाला आवर घातला नाही की ते स्वैर उधळते. इंद्रियांची आम्ही गुंतवणूक करायची ते आमच मुळी ऐकत नाहीत. आमचे वर स्वार होतात. बुडत्याचे पाय डोहाकडे अशी ही अवस्था असते. माऊली ज्ञानेश्वरांनी यावर मार्मिक भाष्य केल आहे. ते म्हणतात , इंद्रिय जे जे म्हणती । ते तेचि जे पुरूष करिती । ते तरलेचि ना तरति । विषयसिंधू ।। हे पहा , विकार विषयाकडे खेचतात. विषयात ध्यान पक्क होत. वासना वरचेवर डोक काढते. वासना क्रोधाला जन्म देते. क्रोधान विवेक नाहीसा होतो. विवेकच नाही तर भगवंताची स्मृतीही नाही. देवाचा विसर म्हणजे बुध्दीचा नाश .आणि बुध्दीचा नाश म्हणजे सर्वनाश. असा सर्वनाश ओढवून घेण्यापेक्षा त्या नारायणालाच विषयांचा विषय बनविल पाहिजे.
सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज की जय !
लेखक-प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi