आत्मोन्नती साधना – ४

लेख- ४
प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी आत्मोन्नती साधनेतून “जीवा-शिवाचे मिलन” ही ब्रह्मांड व्यवस्थापनाची योजना असल्याचे म्हटले आहे. या योजनेसाठी मानवी देह हेच माध्यम असल्याचे वारंवार सांगितले आहे. म्हणून प्रथम शरीराचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. विशेष करून सत्ता , संपत्ती आणि संतती याच्या मागे दमछाक करून घेणार्‍या जीवास आपण कोण ? कुठुन आलो ? आपल्या जन्माचे प्रयोजन काय ? हे व असले प्रश्नच पडत नाहीत. तिथे मग या प्रश्नांची उकल ही दूरवरच राहते. समर्थ रामदास स्वामी राम मंत्राच्या श्लोकात म्हणतात , तुला ही तनु मानवी प्राप्त झाली । बहु पुण्यकर्मे फळालागी आली ।। तिला तू कसा गोविसी विषयी रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। बहु जन्मांची पुण्याई कामी येते तेव्हा मनुष्य जन्माची प्राप्ती होते. अनेक जन्माच्या पुण्याईची किंमत चुकवून हा देह प्राप्त झाला आहे. अस म्हणतात की एखाद्या गोष्टीबद्दल किंमत चुकवावी लागली न की आपण तिची फार काळजी घेतो. पण देहाच्या बाबतीत असे फार क्वचित बघायला मिळते. ईश्वरान आम्हाला भरजरी पोताच महावस्त्र दिलय अन् आम्ही त्याच पोतेर करून टाकलय. अस व्हायला नको. मथितार्थ हाच की , देहाचे मोल समजले पाहिजे. ज्याला समजल तो श्रीगुरूंना शरण जातो. ते कृपा करतात. अनुग्रह देतात. उपासना देतात. ती वाढीस लागली की विवेक जागा होतो. विवेकामुळे जीवनाचे प्रयोजन समजते. जीवाला ब्रह्मांडतत्त्वाचा विशेषाविशेष कळतो. निसर्ग व पंचहाभूतांचा शरीरावर होणारा परिणाम समजुन यायला मदत मिळते. आत्मोन्नतीची तळमळ वाढीस लागते. ब्रह्मांडतत्त्व समजवून घेण्यापासून जीवा-शिवाच्या मिलना पर्यंतचा हा विकास क्रम आहे. तो श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनातच पूर्ण होतो.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय
लेखकः प्रा. गजानन कुळकर्णी , अकोला.
gajanan kulkarni 19@gmail.com

mrMarathi