आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य – लेख २६

" पत्नी , संपत्ती , जमीन जुमला , पुत्र , शुभाशुभ कर्म या आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार्‍या गोष्टी आहेत केवळ मानवी देह असा आहे की , जो आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही."

सांग रे बा मानवा , चाले हे शरीर कोणाचिया सत्ते ? । स्वामी कोण ब्रह्मांडाचा ?

आत्मोन्नती साधना आपल्यापुढे चिंतनासाठी प्रश्न मालिका ठेवते. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी या ओव्यां मधून तीन प्रश्न विचारले आहेत . पहिला , हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते ? दुसरा , या ब्रह्मांडाचा स्वामी कोण ? आणि तिसरा तुला कोण बोलवितो ? या प्रश्न मालिकेस जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगाचा संदर्भ आहे. ही प्रश्न मालिका पुढील अहंकाराच मूळ समूळ उपटून टाकणारी आहे.

कोण हालवी वृक्षाची पाने ? विचार करी मानवा. विचारा अंती लक्षात येत की अरे हो , माझ्या म्हटल्या प्रमाणे तर झाडाच पानही हालत नाही . क्षुल्लक असा तो पाला-पाचोळा माझ ऐकत नाही. तर माझ शरीर माझ्या सत्तेन कस चालत असेल. माझी इंद्रिय माझ ऐकत असतील का ? त्यांचेवर माझ नियंत्रण असेल. मीच माझा स्वामी होऊ शकत नाही तर मग ब्रह्मांडाचा स्वामी तर फार फार दूरची गोष्ट झाली. या सृष्टीचा कर्ता धर्ता असल्याच्या थाटात आजवर मी स्वैर वागत होतो. या प्रश्न मालिकेनी मला माझी जागा दाखवली.

प.पू. श्री नरेंद्रनाथांनी सोमवारच्या साधनेतून समर्थ रामदास स्वामींचेही कवित्व आपल्यापुढे ठेवले. शरीराच मूळ किती अमंगळ आहे याच हे वास्तव दर्शन ! रजस्वलेच्या विटाळी या शरीराचा जन्म. आतील शारीरिक यंत्रणा किती गलिच्छ तर सोन्याच्या ताटात दिव्यान्न जरी जेवलो तरी त्याची विष्टाच होणार. गंगेच पाणी हे तीर्थ ! पण आम्ही प्यायलो की त्याचे मूत्र होणार. श्री नरेंद्रनाथ महाराज नेहमी सांगत आले की आमच्यापेक्षा गाय बरी. गो मूत्र घरात ठेवल तर वातावरण पवित्र आणि शुध्द करते. तिच्या शेणान सारवलेली भूमी पवित्र होते. आमच्या शरीराच मूळ अमंगळ आमची आंतरिक यंत्रणा किळसवाणी. असे असतांना या शरीराने अहंकाराचा फणा का काढावा ? याचा मी विचार केला पाहिजे.

शरीरा विषयी वाटणारी अहंता आणि ममता तुटावी यासाठी संत सद्गुरू शरीराच किळसवाण वर्णन करित असतात. ते जन्म सार्थकी राहण्याच साधनच रहाव साध्य होऊ नये हा त्या पाठीमागे उद्देश असतो.

श्री नरेंद्रनाथ आपल्या मार्गदर्शनातून एक संस्कृत वचन नेहमीच सांगत आले आहेत. पुनदार्राः , पुनर्वितं , पुनः क्षेत्रं , पुनः सुत । पुनःशुभाशुभं कर्म , शरीरं न पुनः पुनः ।। अर्थात पत्नी , संपत्ती , जमीन जुमला , पुत्र , शुभाशुभ कर्म या आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार्‍या गोष्टी आहेत केवळ मानवी देह असा आहे की , जो आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होत नाही. म्हणून मिळालेल्या याच जन्मात जीवताचे सार्थक करावे. ते कसे साधले जाईल याचाच रात्रंदिवस विचार करावा.

आपण रविवारच्या उपासनेत ब्रह्मांडाची निर्मिती पाहिली. अवघी सजीव सृष्टी हे ईश्वराचे खेळणे आहे. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की , ईश्वर जरी ब्रह्मांडाचा कर्ता असला तरी तो ब्रह्मांड नायक नाही. ब्रह्मांडाचा कर्ता ईश्वर , परि तो नसे ब्रह्मांड नायक । ब्रह्मांडनायक असे देहधारी , गुरूस्वरूपे संचारिती ।। श्री सद्गुरू या ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी आहेत. चराचरावर त्यांची सत्ता आहे.

अकोल्यातील पाचव्या अतिसौरीत आठवडी कीर्तन सेवा आयोजित केली होती. अकोल्यातील नामवंत कलाकार तबला वादनासाठी यायचे. त्या दिवशी अकोल्यातील संगीताचे प्राध्यापक पू. नरेंद्रनाथांच्या दर्शनाला आले. आम्ही दोघे सोबत गेलो. महाराज , हे प्राध्यापक … ते म्हणाले मी ओळखतो. आज हे तबला वाजवणार आहेत. महाराज म्हणाले. त्यांनी विधान केल होत. आम्हाला मात्र तो प्रश्न वाटला. आम्ही दोघांनीही एकाच वेळी नाही म्हटले. त्यांनी आमचेकडे पाहिल न पाहिल्यासारखे केले. आम्ही दर्शन घेऊन दहा पाऊल पुढे टाकली. माझा भ्रमणध्वनी खणखणला. तिकडून आवाज, दादा आता ७.३० वाजले आज मी तबल्यासाठी येऊच शकत नाही. अकोल्यापासून ५० कि.मि. दूर आहे. दुसर्‍या कुणाला बोलवून घ्या. प्राध्यापक म्हणाले चला आधी महाराजांच दर्शन घेऊ. आम्ही त्यांचे समोर उभे झालो. प्राध्यापक म्हणाले मी तबल्याची साथ करतो. महाराज आमचेकडे पाहून मंद हसले. आम्हाला पडणारा प्रश्न त्यांनी चुटकीसरशी सोडविला. गोंधळा शिवाय क्षणार्धात. माझ्यावर , कलावंतावर आणि प्राध्यापकावर त्यांची निर्विवाद सत्ता सिध्द झाली. हे आपल्या तर्क-बुध्दी पलिकडच असत. आम्हाला घडवितांना ते साक्षात श्री ब्रह्मदेव असतात. आपल्या कृपा दृष्टीन आमच पालन पोषण करतांना करतांना ते श्री विष्णू असतात. आणि आमच्यातील खल वृत्तीचा संहार करून सन्मार्गावर लावणारे श्री महादेव असतात सद्गुरू ! तीनही शक्ति जेथे एकवटल्या ते सद्गुरू श्रीदत्तात्रय स्वरूपी असतात.
सद्गुरू श्री महाराज की जय ।
लेखक- प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi