आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य-लेख-२८.

" श्रीकृष्णानी द्वापार युग संपता संपता नाथपंथाची योजना केली. योगेश्वरांनी ही योजना केली नसती तर ,कलियुगाचे भयानक परिणाम सामान्य माणूस सहन करू शकला नसता."

देव म्हणती गुरूला , होईन तुमच्या दासाचाच दास । प्राप्त करीन गुरूकृपा , ब्रह्मांडनायक होण्या ।।

ब्रह्मदेवांनी निर्माण केलेली युग रचना अपरिवर्तनीय आहे. त्यातील सत्य , द्वापार व त्रेता युगांची निर्मिती चांगली झाली. कलियुग या तीघांचे मानाने फारच खडतर बनले. या युगाची स्थिती अत्यंत दारूण व विषम अशी झाली.

खोटेपणा , कपट , आळस , झोप , हिंसा , खेद , शोक , मोह , भय आणि दीनता या युगात अधिक राहिल. तप , सत्य , दया , दान हे धर्माचे असलेले पाय शक्तिहीन होतील. हिंसा , असंतोष , खोटेपणा आणि द्वेष हे अधर्माचे पाय मजबुत होतील अस श्री विष्णूंच्या लक्षात आल.

अपरिवर्तनीय अशा खडतर कलियुगाची निर्मिती तर झाली. आता यात बदल शक्य नाही. कलियुगातील जीवन नियंत्रित असावे. सज्जन , सद्भक्तांचे संरक्षण व्हावे. युगाचे अंतर्गत परिवर्तन घडवून आणता यावे म्हणून स्वतः श्री विष्णूंनी नाथपंथाची योजना केली.

कृत , द्वापार व त्रेता युगांप्रमाणे सामान्य जनांची वृत्ती , त्यांचे सामाजिक जीवन , नैतिकता व जीवन मूल्यांची पातळी उंचविण्यासाठीच श्रीकृष्णानी द्वापार युग संपता संपता नाथपंथाची योजना केली. योगेश्वरांनी ही योजना केली नसती तर ,कलियुगाचे भयानक परिणाम सामान्य माणूस सहन करू शकला नसता.

ईश्वरी योजने नुसार भगवंताचे पार्षद नवनारायण , नवनाथ म्हणून अवतार घेतील असे ठरले. पंथ प्रखर सामर्थ्यवान झाला. देदीप्यमान झाला. नाथ पंथातील नाथगुरूंची कृपा संपादन करावी. पंथामध्ये नाथगुरू म्हणून कार्य कराव.सामान्य जनांचा उध्दार करावा. असा मोह हरिहरांना झाला. श्रीमहादेवांनी व श्री विष्णूंनी आपण होऊन तशी इच्छा व्यक्त केली. व नाथ पंथामध्ये त्यांनी अवतार घेतला. हे दोन्ही अवतार कुटुंब संस्थेतील आहे. मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ व त्यांचे शिष्य श्री गहिनीनाथ यांचे शिष्य निवृत्तीनाथ व त्यांचे शिष्य श्री ज्ञाननाथ नाथ पंथाची अशी अखंड गुरूपरंपरा आहे. त्यातील नाथगुरू श्री निवृत्तीनाथ हे श्री शंकरांचा व ज्ञानेश्वर माऊली श्री विष्णूंचा अवतार आहे. त्यांनीही दासांचे दास होऊन गुरूप्रसादाचा मेवा चाखला. साक्षात ईश्वरही श्रीगुरूकृपेचे इच्छुक आहेत. हा श्री सद्गुरूंचा महिमा आहे. म्हणून दत्तात्रेय स्वरूपी श्री सद्गुरूनाथाचे भजन चूकवू नये. ही प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांची आज्ञा आहे.

नितनियमाने भजन करी जो उणे न त्या भासे श्री नाथांचे वचनचि ऐसे खोटे हो कैसे भजनाच्या संदर्भात नाथशक्तिपीठाच अधिष्ठान असणार्‍या श्री व्यंकटनाथांचा हा वचननामा प्रसिध्द आहे.

संत कबीराच्या सुप्रसिध्द दोह्याची यावेळी आठवण होते. गुरू गोबिंद दोऊ खडे ।काके लागुं पांय । बलिहारी गुरू अपने । गोबिंद दियो बताय ।। संत कबिर म्हणतात मी तर निःशंक मनाने श्री सद्गुरूनाथांच्या पायी मस्तक टेकवेल. त्यांच्याच तर कृपा प्रसादे मला हरि दिसणार आहे. म्हणून तयाचे भजन चूकवू नये.

गुरूकृपा झाल्याशिवाय ईश्वर भक्तीकडे चित्त , वृत्ती , प्रवृत्तीचा प्रवाह वळतच नाही. श्रीगुरूकृपेवीना भरकटलेल्या जीवाच्या चित्त , वृत्ती , प्रवृत्तींचा ओघ हा विषयाकडेच धाव घेतो. याचे कारण ही अविद्या असते.

मनुष्याला पाच प्रकारचे क्लेश असतात. अविद्या हा त्या पैकी एक आहे. हा दूर झाला की आध्यात्मिक प्रगतीची वाट मोकळी होते. हा क्लेश श्रीगुरू कृपेमुळेच नष्ट होतो.

अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे देहबुध्दी शिरजोर होते. ती शिरजोर झाली की देह म्हणजे मी हे समीकरण पक्क होत. देहबुध्दीमुळे अहंकार आणि ममतेला उत येतो. जेवढ देहबुध्दी स्मरण वाढत जाईल तेवढ देवबुध्दीच विस्मरण होत. श्रीसद्गुरू जीवाला घडवितात.

प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की , ” अखंड गुरू परंपरेने ज्यांना गुरूपदाचा अधिकार मिळाला आहे तेच खरे सद्गुरू आहेत. सद्गुरू अविद्या नावाचा क्लेश दूर करतात. आध्यात्मिक ज्ञान देतात. आध्यात्मिक उन्नती करून देतात. माणसातले काम , क्रोध , मद मत्सर हे विकार कमी करतात. त्याला सज्जन , सत् प्रवृत्त करतात. ईश्वर प्रेम निर्माण करतात. त्याचा भक्तीभाव वाढवितात. संसारामध्ये त्याला सर्व तर्‍हेचे मार्गदर्शन करतात. त्याला ‘गुरूपदी ‘ नेण्याच्या दृष्टीने घडवित असतात. जे विधिलिखीत आहे त्याच्यात कुणीही बदल करू शकत नाही परंतु सद्गुरू ते सहजतेन करू शकतात. हे त्यांचे सामर्थ्य आहे. शिष्याच्या कर्मानुसार पाहिजे तो बदल सद्गुरू करू शकतात. तत्त्वतः पाहिले तर ब्रह्मा , विष्णू , महेश रूपी भगवान दत्तात्रय हेच सर्वांचे गुरू आहेत.”

अशा भगवान दत्तात्रेयस्वरूपी सद्गुरूंच्या कृपेसाठी स्वतः ईश्वर सुध्दा आतुर आहे. याचे उदाहरण नाथपंथात आपण पाहिल आहे. श्री सद्गुरू हे अविनाशी तत्त्व आहेत.त्यांना शरण जाऊन आपले क्लेश दूर करू या.

श्री सद्गुरूनाथ महाराज की जय ।
लेखक- प्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanankulkarni19@gmail.com

mrMarathi