आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य-लेख २९.

" एक दिवस स्वतः पू. श्री व्यंकटनाथ महाराज म्हणाले , "तू चालला तर मी चाललो , तू बोलला तर मी बोललो , जे तू केल ते मी केल , जे मी केल ते तू केल , मी म्हणजे तू व तू म्हणजे मी ".

सदा सेवीत सद्गुरूनाथ , कर्म करी शुध्द नी पवित्र । शुध्द होता देह आत्मा , गुरू करिती ब्रह्मांड नायक।। – लेख २९

श्री सद्गुरूंची सेवा- सान्निध्य जीवाला अद्भूत सामर्थ्य देते. त्याच्या सहवासामुळे , जीव शुध्द होतो. शुध्द जीवाकडून पवित्र कर्म घडतात. उपासनेची बैठक पक्की होते. आत्मा उन्नत होतो. अनन्य शरणांगत भाव वाढत जातो. शिष्य तोचि गुरू , गुरू तोचि शिष्य अशी समरसता साधल्या जाते. आणि एक क्षण असा येतो त्या वेळी शिष्याला गुरू गुरूपणा देतात.

आमोन्नती साधनेतील या दोन ओव्या म्हणजे नाथशक्तिपीठाधीश प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचा दिव्य आध्यात्मिक जीवन प्रवास आहे.

या जगात एकही गोष्ट ईश्वर निर्मित नाही. ईश्वर असतोच कुठे ? हा श्री नरेंद्रनाथांच्या विचाराचा आरंभ बिंदू होता.

प.पू. व्यंकटनाथांची भेट ही त्यांच्या आयुष्याला वळण देणारी घटना ठरली.
या भेटीन त्यांच अंतर्मन ढवळून निघाल. पू. व्यंकटनाथांना गुरू म्हणून स्वीकारतांना त्यांनी काही कसोट्या लावल्या. मात्र अनुग्रहानंतर स्वतःच शिष्यपण पणाला लावल. श्रीगुरूंच्या कसोटीला उत्तीर्ण होण्याचा अभ्यास ते सतत करित राहिले. त्यातूनच त्यांच साधकपण विकसित होत गेल. ऐके दिवशी आदिगुरू दत्तात्रेयांनी त्यांची परीक्षा घेतली. परीक्षेतून श्रीगुरूनिष्ठा सिध्द झाली.

समर्पण. जप-तप-अनुष्ठान श्री गुरूंनी सांगितलेल कर्म करीत राहणे. असा दिनक्रम चाले. कर्मातून चित्त शुध्दी , देह शुध्दी अन् आत्मा पूर्ण उन्नत झाला. श्रीगुरूं विषयीच्या श्रध्दाभावाने प्राप्त झालेल ज्ञान. आता आत-बाहेर केवळ श्रीगुरू. अवघ जग गुरूमय झाल. विश्वास गुरू वचनाचा.ध्यास केवळ गुरूंचा. श्वास घ्यायचा तोही गुरूंसाठी. केवळ व्यंकटांचा छंद. मासा जसा पाण्यासाठी तडफडतो तसा.ध्यास वाढत गेला. एकरूपता साधल्या गेली. सेवेची पराकाष्ठा झाली. सेवा म्हणजे सक्ति-आसक्ति पलिकडचा शुध्द , निर्भेळ भाव. अर्थात भक्ति. अळीस भ्रमराचा ध्यास । होता भ्रमरपणा ये तिस । सोडी ती मग जीवपणास । भोगी आनंद । जाय तुटोनिया भवबंध ।।

असा आनंदी आनंद चाललेला होता. गुरू शरणांगत व ईश्वर सन्मुखता ओतप्रोत भरलेली होती. एक दिवस स्वतः पू. श्री व्यंकटनाथ महाराज म्हणाले , “तू चालला तर मी चाललो , तू बोलला तर मी बोललो , जे तू केल ते मी केल , जे मी केल ते तू केल , मी म्हणजे तू व तू म्हणजे मी” ! गुरू गुरू पणा दे शिष्याला अनन्य झाल्यावरती । दासगणू म्हणे भेद नुरे ज्योतिस मिळाल्या ज्योती ।।
असा हा सोहळा संपन्न झाला.

व्यंकटनाथांनी श्री नरेंद्रनाथांना नाथगुरू म्हणून पंथकार्य करण्याची आज्ञा दिली. गुरूपदी आरूढ झाल्यावरही , ब्रह्मांडनायक झाल्यावरही ते स्वतःचा परिचय श्री व्यंकटनाथ माझे गुरू आहेत असा देतात.

श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की, मानवी जीवन हे केवळ कर्म करण्यासाठीच प्राप्त झाल आहे. हे कर्म केवळ श्री गुरूच सांगु शकतात व करवून घेऊ शकतात. गुरूंनी केलेले संस्कार हे त्या जीवावर जन्मोजन्मी कार्य करित राहतात. लोकानुग्रह कार्या करसी कर्मे आर्या कर्मातीता सदया जय जय सद्गुरू नाथ । असे हे सद्गुरू असतात.

पामराचा नर आणि नराचा नारायण करण्याची सिध्दता हे श्री सद्गुरूंचे सामर्थ्य आहे. मिळालेला हा जन्म त्यांच्या कृपा प्रसादाने सार्थकी लागावा व आत्मोन्नतीच्या दिशेने आम्हा सर्वांची वाट मोकळी व्हावी. ही सद्गुरू चरणी प्रार्थना.

सद्गुरूनाथ महाराज की जय ।
लेखक-प्रा. गजानन कुळकर्णी. अकोला.
gajanankulkarni@gmail.com

mrMarathi