​नाथसंप्रदाय हा सर्व संप्रदायांचा गुरू संप्रदाय

​नाथसंप्रदाय हा सर्व संप्रदायांचा गुरूसंप्रदाय – डाॅ. म.रा. जोशी.

केवळ वारकरी संप्रदायच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच संप्रदाय हे नाथसंप्रदायाला गुरूस्थानी मानतात.मग तो दत्त संप्रदाय असो ,रामदासी  संप्रदाय असो,किंवा महानुभाव असो,या सर्वांमध्ये गुरू-शिष्य भाव आहे.अशा अर्थानी नाथ संप्रदाय हा केवळ अद्वितीय पंथ असल्याचे प्रतिपादन मराठीतील ज्येष्ठ संशोधक प्राध्यापक डाॅ.म.रा.जोशी यांनी येथे केले. ते नाशक्तिपीठ परिवाराच्या वतीने आयोजित  कार्याच्या द्वितपःपूर्ती व प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातील
संतपूजन व विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.आपला मुद्दा अधिक स्पष्ट करतांना ते पुढे म्हणाले की,ज्या नामदेवांना भक्तिसंप्रदायाचा प्रवर्तक म्हणविल्या जाते त्या  नामदेवांपर्यंत सर्व संत हे नाथसंप्रदायीच आहेत.

नाथसंप्रदायाचे तत्त्वज्ञान हे तंत्रप्रधान योगशास्त्राचे आहे.शिव हा शक्ति आणि शक्ति ही  शिव स्वरूप अशा प्रकारची शक्तिउपासना आहे.गोरक्षनाथांचा सिध्द-सिध्दांत हा ग्रंथ प्रमाण मानला तर नाथपंथ हा अद्वैतवादी संप्रदाय आहे.आदिनाथ हे पंथाचे गुरू जगद्गुरू असून मंत्रगुरू हे श्री दत्तात्रेय भगवान आहेत.त्या मुळे या संप्रदायातील मत्सेंद्रनाथांपासून श्री नरेंद्रनाथापर्यंत सर्वच नाथसिध्द हे भगवान दत्तात्रेयांचे शिष्य ठरतात.

नाथसंप्रदाय व योगशास्र यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबध आहेत.नाथ संप्रदायाच्या व्याप्ती बद्दल बोलतांना डाॅ. जोशी पुढे म्हणाले की,नाथ संप्रदाय हा केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित नसून त्याने भारताच्या भौगोलिक मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत.

 हे सारे काही लक्षात घेतले म्हणजे नाथ संप्रदाय हा सिध्द, व्यापक व उपयुक्त असल्याचे समोर येते. यावेळी वाशीम येथील वासुदेव आश्रमाचे पीठाधीश प.पू. श्री विजय काका पोफळी महाराज यांचे उत्सव समितीचे वतीने श्री भाउसाहेब मारोडकर यांनी श्रध्दापूजन केले.

याप्रसंगी बोलतांना पू.श्री विजय काका महाराजांनी नाथशक्तिपीठाच्या वेद  प्रसार प्रचार कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला व पू.श्री नरेंद्रनाथांना निरामय आयुष्यासाठी अभिष्टचिंतन केले.

कार्याच्या द्वि तपःपूर्ती निमित्ताने नाथशक्तिपीठ परिवाराचे वतीने विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.या प्रसंगी डाॅ.जोशी, श्री सुहास कुळकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.

या विशेषांकात प.पू. श्री नरेंद्रनाथ ,पद्मश्री डाॅ. पठाण, डाॅ म.रा.जोशी, डाॅ.शंकर जोगी, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदमूर्ती डाॅ श्रीकांत शास्त्री, प्राचार्य प्रमोद डोरले, प्रा.भाउसाहेब मेरेकर, पत्रकार श्री सुहास कुळकर्णी डाॅ.ल.का. मोहरील  या महाराष्ट्रातील सिध्द लेखकांचे लेख आहेत. या विशेषांकाचे संपादन ह.भ.प.श्री गजानन कुळकर्णी यांनी केले. 

प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांनी चैतन्यश्री व्यंकटनाथांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन व ऋण निर्देश श्री गजानन कुळकर्णी यांनी केले.

mrMarathi