पदी लगता धन्य होऊनी गेलो भाग 11

इच्छाभोजन परीक्षा भाग 11 ११-०१-२२

  इच्छा भोजनाला विशेष अर्थ आहे. सामान्यत: जो अर्थ निघतो त्याप्रमाणे हा शब्दप्रयोग वापरला जात नाही . विशेष म्हणजे इच्छाभोजनात भोजनाला काहीच अर्थ नसतो. परीक्षा घेणाऱ्या शक्ती आपल्या मनाला येईल त्या अटी सांगून ते आपल्या श्रद्धेची , आत्मविश्वासाची , निष्ठेची परीक्षा घेत असतात. परीक्षा ही ज्याला काही सामर्थ्य प्राप्त झाल आहे किंवा जो गुरुपदी पोहोचला आहे त्याची परीक्षा होते. शिष्याची , भक्तांची किंवा सामान्य माणसाची इच्छाभोजन परीक्षा होत नसते. इच्छाभोजन ही फार कठीण कडक अशी परीक्षा आहे.

भगवान दत्तात्रेयांचे गुरुत्व-गुरुतत्व हे अबाधित अखंड आहे. ते स्वतः सर्व देवांना 'अध्यात्मिक गुरु ' म्हणून मार्गदर्शन करीत असतात. तसेच भूमीवरील जनतेला अव्याहत अहोरात्र अखंडपणे मार्गदर्शन करणे हेच त्यांचं जीवन कार्य आहे.
   गुरुचरित्र हे अखंड पणे अस्तित्वात असणारी एक धारा आहे. जिचा साधकाला परिचय व्हायला हवा हे आम्ही पहिल्या लेखातच सांगितले होते. गुरुचरित्रात घडलेल्या घटना जशाच्या तशा पुन्हा घडतील, पुन्हा कॉपी-पेस्ट होईल ही कल्पना करणे चुकीचे आहे.
    युगे लोटली तरी गुरूंच्या प्रभावाचा झरा हा अखंड राहणार आहे. घडणाऱ्या घटनांमधून गुरु आपलं अस्तित्व , आपला प्रभाव आपल्या सामर्थ्याची ओळख सतत देत असतात. हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. गुरु ज्ञानाची किंवा भौतिक गोष्टींची परीक्षा घेत नसतात तर ते नेहमी सत्व, शुद्ध अंतकरण, शुद्ध आचार विचार, शुद्ध भावना याची परीक्षा घेतात हे लक्षात घेतले तर आपली अध्यात्मिक प्रगती होऊ शकेल.
   मी गुरु आहे , मी दत्त आहे अशी ओळख कधीच कोणी दिली नाही व देणारही नाही. ही ओळख साधकाने आपल्या अंतर्मनाने अनुभूतीने विवेकाने करून घ्यायची असते. देवाचा ठराविक साचा नसून तो ज्याला त्याला त्याच्या भावनेप्रमाणे दिसतो व तपासून पाहतो.
    गुरु म्हणून कार्य करणारे सद्गुरु हे देखील भगवान दत्तात्रेयांचे प्रतिनिधी म्हणूनच कार्य करीत असतात. आपल्या सद्गुरु मध्ये दत्ताचा साक्षात्कार शिष्याला सहज लीलया होऊ शकतो. सद्गुरु देखील वेळोवेळी भगवान दत्तात्रेयांच्या संकेताप्रमाणे कार्य करीत असतात. भगवान दत्तात्रेयांचे आणि सद्गुरुंचे हितगुज हे नेहमीच सुरू असते.
   गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात दत्त जन्माची कहाणी आहे. अनुसया माता ही अति तेजस्वी पतिव्रता आहे. म्हणून तिचे तेज हरण करण्याच्या उद्देशाने, सत्व हरण करण्याच्या दृष्टीने, ब्रम्हा-विष्णू- महेश ब्राह्मणाचे रूप घेतात आणि तिची सत्वपरीक्षा पाहतात. हा प्रसंग सर्वांच्या वाचण्यातला आहे
 इथे सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की देवी आणि देवता स्त्रीलिंगी आणि पुल्लिंग ही मानवी कल्पना आहे. देवांमध्ये असला कोणताही भाव नाही अनेकविध ब्रम्हांडातील योजनेनुसार देवी आणि देवता यांचे वर्णन केले आहे. माणसांमध्ये होतात तसे कोणतेही व्यवहार त्यांच्यात होतच नाहीत.
   ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच कार्य म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हे आहे त्या नुसार जी कोणती व्यक्ती देव तत्त्वा जवळ येऊन प्रखर तेजाची होऊ लागते त्यावेळेस हे त्या व्यक्तीची सत्वपरीक्षा घेतात. सत्त्वपरीक्षा याचा अर्थ नैतिक मूल्य हे नसून त्याचं मूळ ब्रीद हे त्याचं अंतकरण किती शुद्ध पवित्र निर्मळ आहे हे पाहण्याचा त्यांचा उद्देश असतो. 
    सात्त्विक, शुद्ध ,पवित्र, निर्मळ अंत:करण, निष्कलंक जीवन, पूर्ण प्रांजळ शुद्ध भक्ती भाव म्हणजेच देवतत्व आहे.
   चरित्रातल्या प्रसंगात जरी असे म्हटले असले की , विवस्त्र होऊन आम्हाला इच्छा भोजन दे. मात्र त्यात असा कोणत्याही विचारांचा लवलेश नव्हता. तिचं रूप तिचे शरीर , तिचं सौंदर्य किंवा कोणत्याही विकार वासनेच्या उद्देशाने त्यांनी म्हटले नव्हते.
    ज्ञानेश्वरांच्या काळातले उदाहरण सांगतो चांगदेव ज्या वेळेला वाघावर बसून हवेतून आपल्या सर्व प्रभाव आणि सामर्थ्यानिशी ज्ञानेश्वरांच्या दर्शनाला आले त्यावेळेला ज्ञानेश्वर आणि सर्व भावंड हे गावाबाहेरच्या पडक्या भिंतीवर बसलेले होते त्यांनी त्याच भिंतीला थाप मारली आणि म्हणाले चल बाई एवढा मोठा योगी आला आहे त्याच्या दर्शनाला जाऊ !
  निर्जीव वस्तुवरची ज्ञानेश्वरांची सत्ता पाहून चांंगदेवांनी शरणागती पत्करली आणि ते त्यांच्या बरोबरच राहू लागले .एकदाचा प्रसंग आहे हे सर्व लोक नदीमध्ये स्नानासाठी गेले आणि ज्या वेळेला मुक्ताबाईच्या अंगावरची वस्त्र बदलण्यासाठी खाली पडली त्यावेळी चांगदेवांनी आपल्या हातांनी आपले डोळे झाकले त्यावर ज्ञानेश्वर महाराज लगेच म्हणाले अजून हा कच्च मडकं आहे शरीराच्या भावना मनातून गेलेल्या नाहीत हा कसा पूर्ण योगी होईल?
  ज्ञानेश्वर म्हणजे विष्णूने स्वतः सांगितले होते की , मी नाथ पंथांमध्ये गुरु शिष्य प्रणालीमध्ये गुरूंची सेवा करण्याच्या उद्देशाने ज्ञानदेव म्हणून अवतार धारण करीन. 
    इतिहासात ज्ञानेश्वर एका कुटुंबातले व्यक्ती म्हणून सांगितले असेल तरी ते प्रत्यक्षात विष्णूचा अवतार म्हणून कार्य करीत होते .या विष्णूने एका योग्याचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवला होता. 
  गुरुचरित्रात वर्णन केलेला हा प्रसंग जरी भूमीवर घडत असला तरी तो ईश्वरी पातळीवरच होता. तो मनुष्य पातळी वर नव्हता त्यामुळे मानवी तत्त्वावर त्याचा विचार करणे चुकीचे ठरेल.
  पुढे अनुसया मातेच्या स्वच्छ , निर्मळ , निष्कलंक , शुद्ध अंतःकरणामुळे देवांना देखील बालकाचे रूप धारण करावे लागले.
  ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांनी ब्रम्हांड निर्माण केलं त्यांना या गोष्टीची पूर्वकल्पना नव्हती हा विचार करणे हे शुद्ध मुर्खपणाचे आहे.
   तसेच अनुसया मातेचे पती अत्रि मुनी यांच सामर्थ्य प्रभाव हे ब्रह्मा विष्णू महेश यांना माहित नव्हता का किंवा अशी घटना होणार आहे याची पूर्वकल्पना त्यांना नव्हती , ही कल्पना करणे देखील चुकीची आहे.
 त्यांनी जे तत्त्व दाखवलं ते हेच की , मनुष्यदेह असला तरी तो ज्या वेळेला ईश्वर समान होतो त्यावेळी देवाला आपलं देवत्व विसरून त्याच्याशी समरस व्हाव लागतं.
   देवगावला असाच काही प्रसंग घडला व्यंकटनाथ महाराज म्हणजे माझे गुरु यांचे निजस्थान. राहते ठिकाण. हे देवगावरंगारिला आहे. त्यांच्या घरी वार्षिक कार्यक्रमाला शिष्य मंडळी यायची आणि सर्व मिळून उत्सव साजरा करायचे. अशाच एका उत्सवाला जवळ जवळ १५० मंडळी जमली असताना तिथे तीन साधू आले. ते भक्त मंडळींना विचारू लागले की , "बंकटलाल महाराज यहा रहते है क्या?" सर्वांनी हो म्हणून सांगितलं. ते म्हणाले , "उनको नीचे बुलाओ !" एवढ्यात महाराज स्वतःहून खाली आले .त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले "क्या आज्ञा आहे". त्यावर ते म्हणाले , "हमने सुना है की आप इच्छा भोजन देते हो । हम को आपसे इच्छाभोजन चाहिये ।क्या आप इच्छाभोजन देंगे" ? क्षणाचाही विलंब न करता महाराज म्हणाले , "आप बोलो आपकी इच्छानुसार हम आपको भोजन देंगे"।
  त्या तीन साधुंनी सर्वांसमोर सांगितले की , " हमे बकरू चाहिये"।
  हा सगळा प्रसंग माध्यान्हाला आणि घराच्या समोरच्या खुल्या भागात होत होता. महाराज त्यांना म्हणाले , " आपसे प्रार्थना आहे की आप पीछे के हिस्से मे आई ये"।
 महाराजांच्या घरातील सर्वांनी कडक विरोध केला आणि शिष्य मंडळीदेखील घाबरली. ते तीनही साधू घराच्या मागच्या बाजूने आले. महाराज त्यांच्या स्वागतासाठी मागच्या बाजूला गेले. तोच घरातील सर्व मंडळींनी दार आतून बंद केले.  
  आज पर्यंत या पवित्र वास्तूत असा अपप्रकार कधी घडला नाही. नाथ घराण्यामध्ये असे कधी झाले नाही. आज हे बकरी कापणार आणि ती शिजवून त्या तीन साधूंना आजच्या मंगल प्रसंगी जेऊ घालणार , हे घरातील कुणालाही आवडले नाही. म्हणून त्यांनी महाराजांना घराच्या बाहेरच काढले असे केले. महाराजांनी देखील ते दार त्यांच्या कडून बंद केले म्हणजे कोणी येण्या-जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
  महाराजांनी त्या साधूंना नमस्कार केला आणि म्हणाले , "आपकी आज्ञा जैसी हो वैसा हि हम करेंगे"। त्यांच्या सांगण्यावरून एक बकरीचे पिल्लू ते कापण्यासाठी लागणारे साहित्य आणि मोठाले पातेले , पाणी वगैरे साहित्य जमा केले. त्यांनी एक एक सूचना दिली त्याबरोबर एक मोठ ॲल्युमिनियमच भांड चुलीवर ठेवल. मोठा जाळ लावला. त्या पातेल्यात भरपूर पाणी भरले आणि त्याच्यावर झाकण ठेवले . 
   इकडे बकरीचे पिल्लू त्यांनी आणायला सांगितलं जो विळा आणला होता त्यांनी एका झटक्या मध्ये त्या पिल्लाची मान कापायला सांगितली. 
  महाराजांनी वीरासन घेतले तिघांनाही नमस्कार केला. बकरीच्या तोंडाला धरले आणि गुरूंचे स्मरण करून त्या विळ्याने एका झटक्यात मान आणि धड वेगळे केले. हा सर्व प्रकार सर्व शिष्य मंडळी व घरातील सर्व मंडळी गच्ची वरून पाहत होते. त्या तीन साधूंनी सांगितल्या प्रमाणे बकरीच्या पिल्लाची सर्व हाड काढून ते एका कोपऱ्यात टाकले.  मासाचे बारीक तुकडे करून त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकले. 
बराच वेळ महाराज आणि ते तिघे एकमेकाकडे पाहत बसले. काही वेळ गेल्यानंतर त्या पातेल्यातून घमघमाट सुगंध बाहेर आला. तो होता सत्यनारायणाच्या प्रसादाचा ! त्या वासाने गच्चीतल्या सर्व लोकांनी तिथे येण्याचा प्रयत्न केला पण ते कुणीही

तिथे येऊ शकले नाहीत. थोड्यावेळाने पातेल्यावरचे झाकण काढले तर त्या पातेल्यात सत्यनारायणाचा प्रसाद भरलेला होता. हा पूर्ण प्रसाद त्या तीन ब्राह्मण साधुंनी व महाराजांनी मिळून खाल्ला. सर्व प्रसाद खाण झाल्यावर एका साधूने त्या पातेल्यात पाणी टाकले. तो पाण्याने स्वच्छ धुतला आणि ते पाणी प्यायला. हे झाल्यावर महाराज त्या तिघांच्याही पाया पडले , आणि पाहता पाहता ते तिघेही अदृश्य झाले ! तिकडे कोपऱ्यात टाकलेली हाडं आणि कातड यातुन ते बकरीचे पिल्लू बँ बँ करत धावत गेले .

ज्यांची ब्रह्मांडावर सत्ता आहे पंचमहाभूतांवर सत्ता आहे जे स्वतः केंव्हाही पाहिजे ते रूप घेऊन कुठेही प्रगट होऊ शकतात व अदृश्य होऊ शकतात त्यांना हे शक्य आहे का हा विचार देखील मनात आणण्याचे कारण नाही ते काहीही करू शकतात व करीत आले आहेत व करीत राहतील संपूर्ण ब्रह्मांड त्यांचच आहे .
अशा तऱ्हेने त्या तिघांनी महाराजांची परीक्षा घेतली आणि अंतर्धान पावले.
ही घटना याच विसाव्या शतकात घडली आहे. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की , ” गुरुचरित्र हा अखंड प्रवाह आहे”.गुरु आपलं कार्य आजही त्याच पद्धतीने करीत आहेत . आपण हे सर्व विवेकाने समजून घेण्याची गरज आहे.
याप्रमाणे पंधरावे नाथ म्हणून कार्य करणाऱ्या व्यंकटनाथांची इच्छा भोजनाची परीक्षा भगवान दत्तात्रयांनी घेतली. या परीक्षे वरून भगवान दत्तात्रेय आणि सद्गुरु या दोघांचे एकमेकांशी असलेले संबंध, एकमेकांना ओळखण्याची क्षमता, कार्याची ओळख तसेच या अघटित घटनेने तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मिळालेल्या विचारांची दिशा आणि येणाऱ्या पिढींना अध्यात्माची ओळख देणे , हे सर्व उद्देश्य एकाच परीक्षेने सर्वांना ज्ञात झाले. आणि सद्गुरु वरची ‘श्रद्धा-विश्वास’ व्दिगुणित झाला.

Leave a Reply