पदी लागता धन्य होऊनी गेलो भाग ९

भाग ९ 9-1-22
व्यंकटनाथांचा जन्म आणि कार्य सिद्धता

  गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात सांगितले आहे की ब्रम्हा-विष्णू-महेश ते तिघे अनुसया च्या पुठे समोर प्रगट होतात व तिला इच्छाभोजन मागून तिचे सत्वर पाहण्याच्या दृष्टीने ते तिची परीक्षा घेतात व शेवटी तिचे बालक होऊन तिच्या सांगण्याप्रमाणे विष्णू तिचा मुलगा म्हणून राहून बाकी दोघे आपल्या कार्यासाठी निघून जातात नरसिंह सरस्वती म्हणून विष्णू आपलं दत्तावतारी कार्य करतात
   देवगावला कृष्णाबाई पुरुषोत्तम यांचे सात्वीक जीवन पाहून एक यती कृष्णाबाई समोर प्रगट होतो आणि तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुझ्या उदरी बालाजी म्हणून व्यंकटेश नांवाचा मुलगा अवतरेल असे सांगतो. एवढे सांगून तो अदृश्य होतो
   स्वतः विष्णूनेच यतीच रूप घेऊन हे सर्व सांगितले
   गुरुचरित्रात देखील विष्णूनेच दत्ताचा अवतार घेऊन नरसिंह सरस्वती म्हणून कार्य करण्यास प्रारंभ केला .त्याच प्रमाणे देवगाव रंगारी ला विष्णूने व्यंकटनाथांचे रूप घेऊन कार्याला प्रारंभ केला
    भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना कानामध्ये मंत्र सांगून अनुग्रह दिला व नाथ परंपरा त्यांना पुढे कार्यान्वयित करण्याचे संकेत दिले मच्छिंद्रनाथांनी नाथपंथाची योजना केली आणि पहिले नऊ नाथ हे विष्णूचे पार्शद होते. त्यांनी अयोनी संबंधातून प्रगट होऊन नाथपंथाच्या कार्याचा विस्तार केला.
    याच नाथपंथातील अखंड परंपरेने कार्य करणारे माधवनाथ महाराज हे मच्छिंद्रनाथां पासून चौदावे नाथ होते त्यानंतर यांच्या आज्ञेवरून व्यंकटनाथांनी हे कार्य पुढे सुरू ठेवले ते मच्छिंद्रनाथां पासून अखंड परंपरेतले पंधरावे नाथ होते
   याप्रमाणे व्यंकटनाथांनी माधवनाथांच्या आज्ञेवरून कार्याला सुरुवात केली
  व्यंकट नाथांच्या जन्माचा विचार केला तर असे झाले की

अशा नाथकुलांत व्यंकटनाथांचा जन्म शके १८२५ माघ शुद्ध पंचमीला औरंगाबाद जिल्ह्यांतील देवगांव येथे झाला.
देवगांवचा परिसर मोठा पुण्यपावान आहे. ह्या गांवाला देवगांव नांव पडण्याचे कारण, ती भूवरील देवलोकांची तपोभूमि आहे. पुराणांत ह्या ठिकाणी देवांची वस्ती होती असा उल्लेख आढळतो. गोरखनाथांची समाधि, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे घृष्णेश्वर नावाचे तीर्थक्षेत्र, त्याचप्रमाणे जगातील आश्चर्यापैकी एक व कलेची मूर्तिमंत आकृती अशी वेरुळची लेणी, इतिहासप्रसिद्ध दौलताबादचा प्रेक्षणीय किल्ला व शेकडो पवित्र स्थाने ह्या परिसरांत आढळून येतील.
गावच्या वेशीवर मधुमंजुळ प्रवाहाने वाहत असलेली व नाथांच्या पायवणीनें अधिक पुण्यपवित्र झालेली वेळगंगा असा देव गांवचा पवित्र व प्रेक्षणीय परिसर आहे.
वसंत पंचमीला व्यंकटेशाचा जन्म झाला. प्रत्यक्ष सृष्टिसतीने व्यंकटेशाचे स्वागत केले त्यामुळे व्यंकटेशाला जन्माबरोबर जणु, ‘आनंदी आनंद’ जन्माला आला असेच वाटायला लागले.
श्रीव्यंकटेशाचे मंदिर
देवगांवला देवपुरी असे म्हणत असत. तेथे एक ब्राह्मण राहत असे. तो शंकराचा मोठा भक्त होता. त्याचा नेम कधी चुकत नसे. शंकराची त्याने दीर्घकाल अविरत सेवा केली. दर्शनाची तगमग काही केल्या कमी होईना. एक दिवस तो आजारी पडला. प्रार्थना केली की,-‘देवा आजपर्यंत तू मला दर्शन दिले नाहीस. निदान अंतकाली तरी एक इच्छा राहून गेली आहे.’ असे वाटते- ‘मरावे तर काशींत-तुझ्या पुण्यपावन क्षेत्री.’ त्याच्या भक्तीने शेवटी शंकरभगवान् प्रसन्न झाले व त्याला देवगांवच्या परिसरात काशी विश्वेश्वराचे दर्शन घडविले. धनुषाकार वेळगंगा, अष्टतीर्थ वगैरे काशीतील प्रमुख भाग दर्शनभूत करून ते अंतर्धान पावले. ज्या जागी ते अंतर्धान पावले ती जागा बरीच वर्षे तशीच पडली होती. लोक तिथे काढीकचरा टाकीत.
श्रीसद्गुरु माधवनाथ महाराजांच्या लक्षात ही गोष्ट येऊन त्यांनी आपल्या बंधूंना ती जागा विकत घ्यावयास सांगितले व त्या जागेवर दत्तात्रेयाचे मंदिर बांधण्याचा संकल्प केला. श्रीमाधवनाथ महाराज गिरीला गेले असता त्या गडावर एक गृहस्थ आला. त्याने त्यांचा मानस ओळखून म्हटले ‘आपणांस दत्ताच्या मृतींची स्थापना करावयाची आहे पण दत्त काय अन व्यंकटेश काय एकच. ही व्यंकटेशाची सुंदर मूर्ती घ्या व मंदिरात स्थापना करा’ असे म्हणून तो सद्गृहस्थ गुप्त झाला. तो सद्गृहस्थ दुसरा तिसरा नसून प्रत्यक्ष बालासाहेबच होते. प्रत्यक्ष बालासाहेबांनी दिलेल व्यंकटेश मूर्ति त्या विशिष्ट पवित्र जागेवर श्रीमाधवनाथांनी स्थापन केली. आणि म्हणून व्यंकटेशाचे मंदिर एक लोकांचे दैवत झाले आहे. हे मंदिर म्हणजे देवगांवची शोभा ! हे मंदिर म्हणजे एक आनंदनिधान ! दरवर्षी फाल्गुन शु. दशमीला व नाथषष्ठीला मंदिरात उत्सव होतो व हजारो लोका हजर राहून उत्सव साजरा करितात. ह्याप्रसंगी अभिषेक, वेदघोष, हरिकीर्तन, भजन, मंत्रजागर, भोजन इत्यादि कार्यक्रम ठेवण्यात येतात.
संपूर्ण मंदिर पश्चिमाभिमुख असून काळ्या दगडाचे बांधले आहे.

  व्यंकट नाथांचा जन्म

    कृष्णाबाई व पुरुषोत्तम हे व्यंकटनाथांचे आई वडिल होते. कृष्णाबाई कृष्णा नदीप्रमाणेच पवित्र व मोठी साध्वी स्त्री होती. वडील पुरुषोत्तम हे नावाप्रमाणेच पौरुपवान होते. कृष्णाबाई मूळची नेवासे येथे राहणारी असल्यामुळे ज्ञानेश्वरांची छाप तिच्या जीवनावर पुरेपूर होती नित्य ज्ञानेश्वरी वाचण्याचा तिचा परिपाठ असे. एकदा ती पूजा करीत बसली असता एक यति आला व म्हणाला, बाई तूं काही काळजी करूं नकोस. तुझी मनोकामना पूर्ण होईल. तू ज्याचे ध्यान करीत आहे तोच तुझ्या उदरी जन्माला येईल.-'  
 माझ्या उदरीं व्यंकटेश, बालाजी म्हणजे विष्णूचा अवतार जन्माला येणार म्हणून तिला अत्यानंद झाला. जिकडे पाही तिकडे तिला त्या प्रभूची मूर्ति दिसायला लागली. अशा भावपूर्ण अवस्थेत व्यंकटेशाचा जन्म झाला. नाव कोणते ठेवावयाचे असा प्रश्न निर्माण झाला असता स्वत: माधवनाथ महाराजांनी मुलाचे नाव व्यंकटेश ठेवले. ह्यात त्यांची अंतर्दृष्टि व दूरदृष्टि प्रत्ययाला आली. व्यंकटेशाची मंदिरात स्थापना करून मुलाचे नाव व्यंकटेश ठेवले. जणु व्यंकटेश साकार होऊन जन्माला आले हेच सर्वांना प्रतीत केले. 
   माधवनाथांनी मुलाची लक्षणे पाहून माझ्यानंतर माझे कार्य चालविणारा हा अधिकारी पुरुष जन्माला आला म्हणून सर्व लक्ष व्यंकटेशावर केंद्रित केले.
  लहानपणी ते कपिलागाईच्या दुधाशिवाय दुसरे दूध पीत नसत. अवघ्या पाच वर्षांचा असताना गीता, मनाचे श्लोक, रामरक्षा त्यांना मुखोद्गत होती. स्मरण शक्ति तर फार विलक्षण होती.
  शिक्षक त्यांचे सदैव कौतुक करीत असत . एकदा खेळत असता मुलांनी डोक्यावर मारले तेव्हा ते उत्तरले,-'अरे कुठे मारता तुम्ही ! ब्रह्मरंध्र आहे. इथे मारू नका.' 
  कधी कुणाला बरे नसले-काही दुखत असले तर मातीची गोळी करून देत असत व त्याचा रोग बरा होई. लहानपणा पासून दुसऱ्याचे दुःख हलके करण्याची सवयच त्यांना लागून गेली होती एकदा दोनतीन मैलांवर कुणी आजारी आहे असे कळल्यावर स्वारी कुणालाही न सांगता निघून गेली. इकडे कुठे गेला म्हणून आईवडील गाव शोधत बसले. पुढे पुढे अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शिक्षकांनी काही वाचायला सांगितले तर नारायणाचा मंत्र म्हणून दाखवी. शिक्षकहि 'अरे, पुस्तकात नारायण दिसतो का ? , म्हणून रागवीत असत.
 एकांतवास त्यांना फार आवडत असे. नदीतीरी जावे व ध्यानस्थ बसावे, हा त्यांचा नित्यक्रम अनेकदा शिक्षकांनी आपला मुलगा आज शाळेत आला नाही म्हणून तक्रार केली. पाहतात तर नदीकिनारी एका मंदिरात स्वारी ध्यान लावून बसलेली असायची. 
  व्यायामाचाही त्यांना फार नाद होता. सूर्यनमस्कार, योगासने वगैरे करून त्यांनी शरीर चांगले कमावले होते. 
    माधवनाथांनी निरनिराळ्या यौगिक क्रिया त्यांना शिकविल्या. माधवनाथ महाराजांनी त्यांना अनुग्रह देऊन आपल्या मालिकेत आणले .
   त्यांचा अभ्यास एकांतांत होत असल्यामुळे त्यांनी अभ्यास केव्हा व कसा केला ह्याचे कोडेच लोकांना वाटायचे. 'गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु:' हा परमभाव व आदर्श ठैवून सद्गुरु माधवनाथांची त्यांनी अविरत सेवा केली. काही वर्षे ते नुसता पाला पाचोळा खाऊन राहिले.
    एकदा वृद्धरूप घेऊन एक बैरागी देवगावी आला. तो ब्राह्मण भुकेने व्याकुळ झालेला होता म्हणून व्यंकटनाथांनी त्यांना भोजन करण्यास विनंति केली ब्राह्मण काही निराळा होता. त्यांनी इच्छाभोजनाची मागणी केली. ती व्यंकटेशाने मान्य केली. त्या बैराग्याने तीन मुद्रिका झोळीतून बाहेर काढल्या व त्या नाभिकमलाचे दोन्ही बाजूस सहा ठिकाणी चांगल्या लाल तापवून ठेव असे सांगितले व ह्या अटीवर आम्ही भोजन करतो असे ते म्हणाले. व्यंकटनाथांपुढे मोठा पेच पडला. धैर्यवान असल्यामुळे व भीति हा शब्द त्यांच्या कोशात नसल्यामुळे त्यांनी अट ताबडतोब मान्य केली. हे ब्राह्मण कोण असावे हे त्यांनी ओळखले. त्या बैराग्याला जेऊ घातले त्या बैराग्याने अंगठ्या दिल्या व तो बैरागी तेथेच अदृश्य झाला. त्यामुळे व्यंकटेश याने मनाशी खूणगाठ बांधली की हे साक्षात्कारी पुरुष येऊन गेले त्यामुळे ते सांगतील तसेच करायचे असे ठरवले   
 मध्यरात्रीचे सुमारास व्यंकटनाथ उठले. त्या आंगठ्या तापवल्या व त्या सांगितल्यानुसार नाभिकमलाचे सर्व ठिकाणी डागवल्या. त्यांना मूर्च्छा आली. 
    तेवढ्यात बंद खोलीत एका लहानशा खिडकीतून दैदिप्यमान तेज असलेली देवी आत आली कडू लिंबाचा रस तिने त्या सर्व ठिकाणांवर लावला आणि अदृश्य झाली 
  ज्या ठिकाणी त्या अंगठ्या जागवल्या त्या ठिकाणी अजूनही त्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.  
 ह्यामुळे वासना आपोआप दग्ध झाल्या. ते वासनातीत झाले. त्यांची षट् चक्रे जागृत झाली
    संसार करून परमार्थ केला व्यंकटेश वयाच्या २२ व्या वर्षी त्यांचा विवाह श्री. कुळकर्णी ह्यांच्या वत्सला नामक सुशील गुणवान कन्येशी माधवनाथांनी करून दिला . 

मुलीचे नाव रमा ठेवण्यात आले. ‘रमा-व्यंकटेश ‘ असा जोड साधल्या गेला. जणु शिवशक्तीचे ते मीलन होते. ‘संसार करुनी परमार्थ केला तो नर भला रे भला’ असे रामदास स्वामींनी म्हटले ते खरे आहे.

” प्रपंच करुनी संत जाहला, स्वात्मपदाचा स्वाद घेतला, विषयसुखाचा भंग भंगला.
आवरुनी माया.”
व्यंकटनाथांच शालेय शिक्षण सहावी सातवी पर्यंत झालं होतं पुढील शिक्षणासाठी घरच्या लोकांनी त्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून पुण्याला पुढील शिक्षणासाठी पाठवले पुण्याला माधवनाथांच वास्तव्य होतं सगळ्या लोकांचा विचार लक्षात घेऊन माधवनाथ महाराज व्यंकटेशावर प्रकार चिडले व म्हणाले कुळाला काळीमा लावण्यापेक्षा मरून का जात नाही जा चालता हो घराच्या बाहेर पुन्हा तुझं तोंड दाखवू नको
माधवनाथ महाराज म्हणजे आपले गुरु त्यांचं हे म्हणणं ऐकून व्यंकटनाथांनी मनात विचार केला की आपण आता शिक्षण करण्यापेक्षा हिमालयात गुरूंच्या संकेताप्रमाणे निघून जाव आणि अवघ्या बारा वर्षाचा व्यंकटेश अंगावरच्या कपड्यानिशी घर सोडून निघाला तो भटकत भटकत येनकेण प्रकारेण हिमालयात पोहोचला अंगावरच्या कपड्यानिशी राहणे काही मिळालं तर खाणे नाहीतर पालापाचोळा खाऊन राहणे अशी सुरूवात झाली त्यांना निरनिराळे साधुसंत भेटत गेले व त्यांनी यांना निरनिराळ्या अध्यात्मिक विद्यांच शिक्षण दिलं बारा वर्षे हिमालयात राहिल्यानंतर एक दिवस ते गेले त्याच पद्धतीने पुण्याला परत आले माधवनाथ महाराज जणू त्यांची वाट पाहत होते अशाच वेळी ते पुण्याला परत आले व त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुढील जीवनक्रम सुरू झाला
व्यंकट नाथांच्या जन्मापासून अनेकविध अकल्पित दैदिप्यमान अशा घटना घडत गेल्या त्यातून स्वतः माधवनाथांनी त्यांना पंथ कार्याच्या दृष्टीने कसून तपासणी करून घडवून घेतलं
व्यंकटनाथ महाराजांनी ५७ वर्षे गुरूंच्या सांगण्यावरून नाथपंथाचे न भूतो न भविष्यती असे अलौकिक कार्य केले नाथ पंथामध्ये गुरु हे दत्तात्रयाचे स्वरुपच मानले जाते
अलौकिक सामर्थ्य अलौकिक अतर्क्य योगीक क्रिया अंतर्ज्ञानी वैद्य ज्योतिषी अशा विविध भूमिका त्यांनी आपल्या जीवनात पार पडल्या. शांत अत्यंत साधी राहणी साधं बोलणं साधे विचार , जीवनात सहजता एवढी की एवढं अलौकिक सामर्थ्य त्यांच्यात असेल अशी कल्पनादेखील समोरच्याला येऊ शकत नाही, तो साधक असेल , विवेकी असेल तरच त्याला ते कोण याच ज्ञान व्हायचं. पंचमहाभूता वरच त्यांचं प्रभुत्व हे त्यांच्या कृतीतूनच त्यांच्या सहज लीलेतुनच कळत होतं
असे व्यंकटनाथ महाराज नरेंद्रला घडवीत होते आणि पंथ कार्यासाठी त्याला तयार करीत होते.

Leave a Reply