पदी लागता धन्य होऊनी गेलो

गुरुचरित्र हा परमपावन ग्रंथ आहे. प्रासादिक ग्रंथ आहे .याची अनुभूती कोणीही केव्हाही घेऊ शकतो.
गुरुचरित्र हा ग्रंथ ज्या गुरूंच्या भोवती विस्तारला आहे, ज्या गुरूंच्या स्मरणार्थ लिहिला आहे, त्या गुरु चरित्रामध्ये स्वतः गुरूंनी जे काही सांगितलं ते स्वतः त्यांनी म्हणजे ब्रम्हा-विष्णू-महेश रुपी भगवान दत्तात्रेयांनी सांगितल आहे.
या चरित्रात अनेक कथा गुंफल्या आहेत. अनेक तत्त्वांच विवेचन केल आहे. ज्ञान देण्याची हातोटी वेगळी आहे. जीवनाचा उद्देश जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आणि जीवाच्या जीवनाचा अंतिम उद्देश याचे विवेचन या ग्रंथात केल आहे. हा ग्रंथ ज्या काळात लिहिला गेला तो काळ अंदाजे ५००० वर्षांपूर्वीचा होता.
५००० वर्षापूर्वी भगवान दत्तात्रेय स्वतः मनुष्यरूप घेऊन या भूमीवर अवतरले आणि केवळ भक्तिभाव वाढवण्याच्या दृष्टीने आणि कलियुगाच्या विपरीत परिणामांना सामोरे जाऊन आपलं जीवन घडवणे हे उद्देश या ग्रंथातून लक्षात येतात.
कल्पना करा ब्रम्हा विष्णू व महेश या देवता आपल्या सर्व सामर्थ्यानिशी मनुष्यरूप धारण करून जनसामान्यात सर्वांमध्ये राहतात आणि त्यांचा परिचय ते असताना पेक्षा त्यांनी आपलं अवतारकार्य आटोपल्यावर जास्त प्रकाशित होतं.
आपल्या सारख्याच दिसणार्‍या माणसाचं असामान्यत्व मनुष्य स्वीकारत नाही ही मानवाची मानसिकता लक्षात घेण्यासारखी आहे.
पाच हजार वर्षापूर्वी अवतरलेले भगवान दत्तात्रेय कोणी पाहिले? त्या काळात घडलेल्या घटना कोणी पाहिल्या ॽ गुरु चरित्रातून दिलेले ज्ञान कोणी दिले व कुणाला मिळालेॽ असे अनेक प्रश्न मनात येऊ शकतात. हे आज शक्य आहे का आज जर खरोखरीच असे गुरु अवतरले असते तर यांची अनुभूती मला घेता आली असती असे विचार सहजपणे कोणाच्याही मनात येऊ शकतात.
मी एवढेच सांगू शकतो, तुम्ही जे या गुरुचरित्रात गुरूंच चरित्र पाहिलं आहे ते तशाच प्रकारे घालवणारे जनसामान्यांना जीवनाचे मार्गदर्शन करणारे आणि आपल्या अस्तित्वाने प्रभावाने आत्मज्ञान देऊन भक्‍तीभाव वाढवणारे सद्गुरु जे गुरुचरित्रात आहे ते प्रत्यक्ष मी पाहिले आहेत. त्यांच्या सहवासात सान्निध्यात जवळ जवळ चाळीस वर्षे मी राहिलो. त्यांना निरनिराळ्या प्रकारे अनुभवले आहे. हे सद्गुरु प्रत्यक्ष मनुष्यदेह धारण करून एका सामान्य कुटुंबात एका खेड्यात सामान्य व्यक्तीसारखे राहिले ५६ वर्षे अध्यात्मिक कार्य केले पंथ कार्य केले . आपलं प्रभुत्व पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्त्वावर असल्याची ग्वाही त्यांनी आपल्या कार्यातून दिली. माणसाचं पूर्वसंचित प्रारब्ध कसं बदलतं हे त्यांनी आपल्या कार्यकाळात सहजरित्या दाखवून दिलं.
हे केवळ अतर्क्य आणि अशक्य वाटणारे आहे पण ते मी आणि माझ्या सारख्या अनेक व्यक्तींनी हे अनुभवलेल आहे.
गुरुचरित्र हा इतिहासातला ग्रंथ आहे. समाधीस्थ सत्पुरुषांना सिद्धपुरुष म्हणून सहज मान्यता देऊन त्यांना अनंत कोटी ब्रम्हांडनायक म्हटल जातं. अलीकडचं उदाहरण पाहा ना शेगाव चे गजानन महाराज हयात असतांना नंगा वेडा पुरुष म्हणून लोक त्यांना संबोधायचे आणि आज त्यांच्या स्थानाला दर्शनार्थींनी यात्रेचे स्वरूप दिले आहे . यांच्या जीवन कार्यकाळात किती लोक यांच्या सान्निध्यात राहिले?
प्रत्यक्ष जीवनात सत्पुरुषांची ओळख आणि त्यांचे सान्निध्य हे तर केवळ पूर्व संचिता प्रमाणे प्राप्त होते.
गुरुचरित्र होऊन गेलं भगवान दत्तात्रय एकदा अवतरून गेले आता हे पुन्हा कसं घडेल हा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो परंतु ब्रह्मा-विष्णू- महेश रुपी भगवान दत्तात्रेयांचे गुरुत्व गुरुतत्व हे अबाधित अखंड आहे ते स्वतः सर्व देवांना अध्यात्मिक गुरु म्हणून मार्गदर्शन करीत असतात तसेच भूमीवरील जनतेला अव्याहत अहोरात्र अखंडपणे मार्गदर्शन करणे हेच त्यांचं जीवन कार्य आहे.
गुरुचरित्र हे अखंड पणे अस्तित्वात असणारी एक धारा आहे जिचा साधकाला परिचय व्हायला हवा.
गुरुचरित्रातील नामधारक हा जसा गुरूकडे आकर्षित झाला तसाच नरेंद्र चौधरी हा देखील अशाच एका सद्गुरु कडे आकर्षित झाला आणि सद्गुरूंनी पाहता-पाहता त्या दगडाला देव पण बहाल केल.
5000 वर्षापूर्वीच गुरुचरित्र आणि विसाव्या शतकातील हे गुरुचरित्र कसे एकच आहे ते आपण पदी लागता धन्य होऊनी गेलो ह्या शीर्षकाखाली आता क्रमशः वाचू.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi