पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 132

अग्नि संतुष्ट झाला की तो यज्ञकुंडात विविध रंगांच्या रुपाने प्रगट होतो अग्निकुंडातून येणारे रंग वा कृपा करणाऱ्या देवतांच्या आकृती या गेल्या तीनशे वर्षात पाहिल्याच नाहीत असे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे सांगत असत. जुन्या ग्रंथातून त्यांनी हे पाहून सांगितले होते.
कोटगिर येथील हवन

16-06-22            अग्नी नारायणाने साक्ष दिली

अग्नि हे तेजाचे स्वरूप आहे. हे देवतांचे मुख आहे.  देवतांना जे अर्पण करायचं, जो भोग द्यायचा तो आहुतीच्या माध्यमातून अग्निला स्वाहाकार करायच अस शास्त्र सांगतं

अग्नि संतुष्ट झाला की तो यज्ञकुंडात विविध रंगांच्या रुपाने प्रगट होतो असे वेदांमध्ये सांगितले आहे कोणत्या रंगाचा कोणता परिणाम होतो त्याचे महत्त्व हे सर्व वेदांमध्ये सांगितलेल आहे

अग्निकुंडातून येणारे रंग वा कृपा करणाऱ्या देवतांच्या आकृती या गेल्या तीनशे वर्षात पाहिल्याच नाहीत असे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे सांगत असत. जुन्या ग्रंथातून त्यांनी हे पाहून सांगितले होते.

दशरथराज्याने ज्या वेळेला हवन केले होते त्या वेळेला हवन कुंडातून  प्रत्यक्ष नारायण प्रगट झाले होते.

कोटगिरला नागनाथ शास्त्रींकडे त्यांच्या काही समस्यांसाठी हवन करण्याचे ठरले होते हवनासाठी बरेच वैदिक, नामवंत प्रसिद्ध अधिकारी विद्वान जमले होते. नागनाथ शास्त्रीं हे अद्वैत वेदांताचार्य आहेत. त्यांचा नावलौकिक व शिष्य परिवार फारमोठा आहे. वैदिक क्षेत्रातील ते नामवंत अधिकारी आहेत. त्यांचा जावई हा यजुर्वेदातील नामवंत ख्याती असलेला वैदिक आहे. त्यांची स्वतःची वेदपाठशाळा आहे.

हवनाच्या आदल्या दिवशी तयारीसाठी श्रीकांतशास्त्री व काही मुले आकोल्याहून हवानासाठी पुढे गेली होती. ते कोटगीरला पोहोचण्यापूर्वीच नागनाथ शास्त्रींनी कुंडार्काप्रमाणे शास्त्रोक्त कुंड घरामागच्या विठ्ठल मंदिरात तयार केले होते. बाकी देवतांची पिठे मांडण्यास त्यांनी सांगितले होते. श्रीकांतशास्त्री, नरेन्द्रनाथांबरोबर नेहमीच काम करीत असल्यामुळे त्यांना ती जागा हवनासाठी योग्य वाटत नव्हती. श्रीकांतशास्त्रीनी त्यांना सांगितले की, ही जागा व हे कुंड महाराजांना हवनास योग्य वाटणार नाही, पण त्यांना ते मान्य नव्हते.

नथशक्तीपीठाच्या गुरुजींनी हवनाच्या पीठांची मांडणी सुरु करण्यासाठी सामान आणले व मांडणी सुरू करणार तोच एका कुत्र्याने एक उपरणे पळवले. हे पाहून  शास्त्री बुवांना तो शुभ संकेत वाटला व त्यांनी मागच्या धर्मशाळेत तयारी करण्यास सांगितले. श्रीकांतशास्त्रीनी त्यांना सांगितले की. नरेन्द्रनाथांनी तयारी घरातच करावी असे सांगितले आहे. पण ते म्हणाले की, घरात जागा नाही. ते ब्रह्मस्थान असल्याने तेथे हवन चालत नाही. त्यांच्या सांगण्याप्रमाणे धर्मशाळेत तयारी झाली.

सायंकाळी नरेन्द्रनाथ महाराज आले. त्यांनी धर्मशाळेची जागा पाहिली व म्हणाले की, ही जागा योग्य नाही हे सर्व घरीच करु नागनाथ शास्त्रींच्या मनात अनेक कुशंका येऊ लागल्या की, वास्तुशास्त्राप्रमाणे ब्रह्मस्थानी अग्नी पेटवल्यास विपरीत परिणाम होत असतात. पण नरेन्द्रनाथांच्या पध्दतीने हवन करणार हे कबूल केले असल्यामुळे ते काहीच बोलले नाहीत. धर्मशाळेतील सर्व मांडणी मोडली. नव्याने घरी सर्व पिठे मांडून कुंड तयार केले. सर्व तयारी झाली व जेवण करुन सर्व झोपले. ही सर्व तयारी नागनाथ शास्त्रींचा जावाई पाहत होता. ते यजुर्वेदाचे मान्यवर अधिकारी होते.

हे सर्व अशास्त्रीय आहे असे ते म्हणू लागले. सासर्‍यांचे व जावयाचे संबंध ठिक नव्हते. ही कल्पना शास्त्री बुवांनी नरेन्द्रनाथांना पूर्वीच दिली होती व सांगितले होते की, अशास्त्रीय कर्म केल्यास किंवा पाहिल्यास जावायाला राग येतो व तो ब्राह्मणांना उठवून देतो. नरेन्द्रनाथ महाराज केवळ हसले. म्हणाले की, उद्या हवनाला तो बसेल हे वाक्य नागनाथ शास्त्रीसाठी कवी कल्पनाच होती.

साशंक मनानी शास्त्री बुवा झोपले व मध्यरात्री मोठ्यानें ओरडत घाबरतच उठले तो गोंधळ ऐकून महाराजही उठले, नागनाथ शास्त्री महाराजांना म्हणाले की, महाराज हे कुंड अशास्त्रीय आहे त्यामुळे त्यातून रक्त वाहत आहे, असे दिसत आहे तरी कृपा करुन हे सर्व थांबवा, महाराज त्यांच्याकडे पाहत त्यांना म्हणाले की, आण्णा-तुमची सदसद्विविवेकबुध्दी जागेवर आणा व कुंडामध्ये पहा, तुमचे कुलदैवत नृसिंह व सर्व देवता आहुतीसाठी वाट पाहत कुंडात उपस्थित आहेत, तुम्ही काही काळजी करु नका, कुठलेच वाईट घडणार नाही. त्यानंतर सर्व झोपले

दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे पुजेसाठी देवघरात जाता जाता देवघराचा खांब डोक्याला लागला व घळ-घळ रक्त वाहू लागले. त्यांच्या मनातील शंका अधिकच वाढत होती. त्यानंतर देवता स्थापनेला सुरुवात झाल्यावर संकल्पापूर्वीच त्यांचा जावाई पूजेसाठी येऊन बसला, हे पाहून ते आश्चर्यचकित झाले व मनातून चिंतीतही झाले. कारण हवन करण्यासाठी आलेले सर्व लहान मुलं या विद्वानापुढे काय टिकतील आणि हे हवन कसे पार पडेल या विचारात नागनाथ शास्त्री पडले होते.

देवता स्थापन सुरु झाले, गुरुच्या सान्निध्यात असलेल्यांचे मंत्र ऐकून व तयारी पाहून तो जावाई विस्मयचकित झाला व एकाएकी बदलला. याप्रमाणे पहिल्या दिवशी देवता स्थापन झाल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी अग्नी स्थापना झाली त्यावेळी तेथे उपस्थित वैदिक विद्वान शास्त्री मंडळी ओशाळली. कारण वेदात सांगितल्याप्रमाणे अग्नीचे सर्व रंग त्या कुंडामध्ये दिसत होते. हे सर्व या विद्वान मंडळीने केवळ पुस्तकातच वाचले होते. हे सर्व विद्वान गुरुविना कोरडे होते. अग्निनारायणाने ज्वाळांच्या माध्यमातून नरेन्द्रनाथांच्या हृदयावर ॐ कराचे दर्शन सर्वांना घडवले त्याच प्रमाणे अग्नि कुंडात गणेशाचे दर्शन घडवले होते. ॐ लिहिण्यासाठी सोप अक्षर नाही. त्यातून ज्वाळातून ॐ दाखवणे केवळ कठीण आहे.त्यावेळी नरेन्द्रनाथांनी नागनाथ शास्त्रींना विचारले की, तुमच्या मनात आता कोणती शंका बाकी आहे कां ?

हे ऐकल्यावर सर्वच विद्वान नरेन्द्रनाथांपुढे नतमस्तक झाले. हा प्रसंग पूर्वी घडलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातल्या विद्वत सभेच्या प्रसंगाप्रमाणेच आहे. कलियुगात हे सामर्थ्य केवळ नाथ पंथातच आहे की पाहिजे त्या देवतेला पाहिजे त्यावेळी पाहिजे तिथे आणून बसवता येईल. पंथ सामर्थ्याची अनुभूती त्या ठिकाणी अनेकांनी घेतली.

बाधा, रोग ऐहिक समस्यांनी ग्रासलेले अनेक लोक त्या ठिकाणी नरेन्द्रनाथांच्या दर्शनाला यायचे. त्या प्रत्येकाला केवळ विभूती देऊन जा सगळे आपोआप घडेल असे सांगायचे आणि त्याच काळात अनेकांची असाध्य कामे झाल्याचे अनेकांनी सांगितले. ही सर्व कार्यप्रणाली पाहून सर्व शास्त्री लोक थक्क होऊन केवळ पाहात रहायचे. नागनाथ शास्त्रीनी लोकांना सांगितलेले उपाय अतिशय खर्चिक व परिणाम शून्य होते. या ठिकाणी नरेन्द्रनाथांच्या सान्निध्यात येणार्‍याला सहज सर्व प्राप्त होत होते.

हवन पूर्ण झाल्यावर नागनाथ शास्त्रींनी व त्यांच्या जावायांनी त्याच्या तेलगू भाषेत एक तास नरेन्द्रनाथांची स्तुती केली व कार्याची प्रशंसा केली. या काळात नागनाथ शास्त्रींचा जावाई नरेन्द्रनाथांच्या खूप जवळ आला होता. तो नरेन्द्रनाथांना म्हणाला की, मी ज्या ठिकाणी मुलांना यजुर्वेदातील अरण्यक शिकवतो त्या ठिकाणी कृपा करुन आपण माझ्या सोबत चलावे. त्या ठिकाणी खूप दिवसापासून मला मारुतीचे किंवा नागदेवतेचे दर्शन झाले नाही. आपल्या आगमनाने मला दर्शन होईल असा विश्वास मला आहे तरी कृपा करावी. त्यांना होकार देत गाडीमध्ये बसून बरेच जण नरेन्द्रनाथांच्या सोबत निघाले.

अर्ध्या रस्त्यात गाडी फसली त्यामुळे वापस जाऊ असाच सगळ्यांचा सुर होता, पण नरेन्द्रनाथ त्याच्यासोबत पायी जायला निघाले. त्यावेळी अभय, श्रीकांतशास्त्री व महाराज व तो जावाई सोबत होते. तेथे गेल्यावर त्यांनी विहिरीचे पाणी काढले व महाराजांचे पाय धुतले. दर्शनासाठी मारुती समोर जाताच त्या जावयाने दर्शन व्हावयाचा आग्रह धरला. नरेन्द्रनाथांसोबत एक प्रदक्षिणा करीत असतांना ती पूर्ण होण्यापूर्वीच वडाच्या झाडावरून एक काळाशार नाग खाली पडला आणि फणा काढून डोलत उभा होता. ते पाहून त्या जावायाला खूप आनंद झाला. त्याने दर्शन घेताच तो नाग तेथून निघून गेला. हे पाहून तो अतिशय आनंदीत झाला. त्याला नरेन्द्रनाथांच्या सहवासाची अधिकच ओढ व गोडी लागली. त्याच्यातील हे स्थित्यंतर पाहून नागनाथशास्त्री अचंबीतच झाले. त्या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना घेऊन नरेन्द्रनाथ महाराज बासरला गेले व विद्यार्थ्यांसाठी बुध्दीची व विद्येची मागणी सरस्वतीकडे केली व ती पूर्णत्वासही गेली.

Leave a Reply