पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 134

कुठल्याही प्रकारच्या वेद मंत्रांचे अध्ययन नरेन्द्रनाथांनी केले नाही, पण गुरुकृपेने वेदाच्या कुठल्याही मंत्राची अनुभूती ते कोणालाही देऊ शकतात. दुसर्‍याला कर्म सांगून स्वतःच्या कर्माची जोड देऊन पाहिजे त्या समस्यांचे निराकरण ते करु शकतात. बरेचदा ते करीत असताना यजमानाच्या ग्रहदोषांचा त्रास त्यांना स्वतःवर ओढून घ्यावा लागतो. परिणामतः प्रकृती ठीक असूनही विज्ञानाला न उलगडणारे कोडे पडते.

भीमाशंकर येथील हवनातून दर्शन

18-06-22           भीमाशंकराच्या सान्निध्यात

 भज नरा सतत गुरुनाथा रे ।धृ.। विश्वविनायक विघ्नविनाशक- चित्सुखदायक दाता रे..१ साधन खटपट कांही नलगे-ठेवी चरणीं माथा रे. -२ बहुविध स्वरूपें विश्वीं नटला – नटवर अनाद्यनंता रे. -३ नयन तुझें रे स्वरूप पाहो- कर्णचि ऐको गीता रे. -४ चुंबकापरी ओढुनि घेइल-तुझ्याच चंचल चित्ता रे.-५ व्यंकटनाथा गाता ध्याता-हरशिल सारी चिता रे.-६

जो ज्या भावनेने नरेन्द्रनाथांकडे जातो त्याप्रमाणे त्याच्या जीवनात स्थित्यंतर घडते. नरेन्द्रनाथ महाराज भजनाच्या माध्यमातून व्यंकटनाथ महाराजांचे चरित्र सांगून त्याची अनुभूती अनेकांना देतात. व्यंकटनाथ महाराजांच्या मंत्रामध्ये त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि सामर्थ्य ओतप्रोत भरले आहे. तेच व्यक्तिमत्त्व नरेन्द्रनाथ महाराजच्या रुपाने नवीन लोकांनी अनुभवले आहे.

स्वतः आध्यात्मिक उन्नतीच्या अत्युच्य पदावर म्हणजेच गुरुपदावर पोहोचल्यावर आजही सामान्य अवस्थेतल्या शिष्याप्रमाणेच तन्मयतेने आपल्या गुरुचे भजन आनंदाने नियमितपणे करतात.

आशा प्रमाणे कार्य सुरू असताना पुण्याला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने चिंचवडला रबडे यांचे घरी असताना चंद्रग्रहण जवळ आले होते. कोठेतरी तीर्थक्षेत्रावर किंवा सिध्द ठिकाणी ग्रहण काळातील साधना व हवन करायचे ठरवले त्यावेळी सर्व शिष्यांनी आपण भीमाशंकरला नरेन्द्रनाथ महाराजांबरोबर जाऊ असे ठरविले. त्याप्रमाणे सर्वजण गुरुपौर्णिमेनंतर भीमाशंकरला पोहोचले. एका खोलीमध्ये रात्री पर्वकाळात महाराजांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सर्व शिष्य आपआपले जपानुष्ठान करीत होते. नरेन्द्रनाथ महाराज पंथाच्या पध्दतीप्रमाणे हवन करीत होते.

त्या खोलीत केवळ अग्नीचाच प्रकाश होता. अन्यथा खोलीत सर्वत्र पूर्ण अंधःकार होता. नारायणने सर्वांचा फोटो काढला व कॅमेराच्या फलॅशवर बोट ठेवून अग्नीचा फोटो काढला. सर्वांना वाटले हा फोटो येणारच नाही पण रोल धुतल्यावर त्या फोटोमध्ये प्रत्यक्ष देवतेचा चेहराच हुबेहूब दिसू लागला.

दुसर्‍या दिवशी भीमाशंकराच्या सान्निध्यात आन्हिक करायचे ठरविले. पण पुजार्‍यांच्या परवानगी शिवाय आन्हिक करता येणार नाही असे सांगितले. त्याप्रमाणे पुजार्‍यांना विचारले असता पर्वणी निमित्ताने गर्दी असल्याने गाभार्‍यात आन्हिक करता येणार नाही. करायचे असल्यास सभा मंडपात एका कोपर्‍यात करा असे सांगितले.

सभा मंडपात आन्हिक सुरु होण्यापूर्वी सिद्ध मंत्राचे पठण सुरु होते . त्यापूर्वी सर्व वातावरण आभाळी होते. नरेन्द्रनाथांनी पुजार्‍याला विचारले सूर्य केव्हा दिसतो. त्यावेळी पुजार्‍याने सांगितले की, भीमाशंकर खोल दरीत असल्यामुळे व पावसाळ्यामुळे चार चार महिने येथे सूर्याचे दर्शनच होत नाही. सिद्धमंत्राची अर्धी माळ होताच वातावरण बदलू लागले व थोड्याच वेळात चकचकीत सूर्यकिरण पडले व तेथे सर्वांना सूर्यदर्शन घडले. हे पाहून तेथील सर्व पुजारी आश्चर्याने पाहू लागले. पुढे आन्हिक झाल्यावर आरतीला सुरुवात केली. त्यावेळी सर्व लोक भीमाशंकाराच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते. गणपती, देवी व महादेवाची आरती म्हटल्यावर ज्यावेळी दत्ताची व व्यंकटनाथांची आरती सुरु झाली त्यावेळी सर्व लोक भीमाशंकाराचे दर्शन सोडून व्यंकटनाथांच्या आरतीला उभे होते व आरती झाल्यावर नरेन्द्रनाथांच्या हातून तीर्थ प्रसाद घेण्यासाठी गर्दी करू लागले. सर्व पुजारी हे पाहून थक्कच झाले. काय करावे त्यांना सुचलेच नाही. सर्व दर्शनार्थी तीर्थ घेऊन भीमाशंकाराचे दर्शन न घेता बाहेर गेले.

तेथे केलेल्या आरतीने व प्रसादाने जणू आपण भीमाशंकराचीच पूजा आरती केली व प्रसाद घेतला असे समजून भिमाशंकराचे दर्शन घेण्याचे सर्वजण विसरलेच. गुरुच्या सामर्थ्यांची ओळख त्या ठिकाणी सर्वांनाच दिसली. एक वेगळा अनुभव प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतला. गुरुच्या सान्निध्यात काय आनंद असतो हे त्या ठिकाणीच अनुभवले की, गुरुच्या कृपेने देवसुध्दा स्वतः होऊन दर्शन देण्यासाठी उत्सुक असतो ही अनुभूती अनेकांनी अनेक वेळा नरेन्द्रनाथांच्या सान्निध्यात अनुभवली आहे.

नागनाथ शास्त्रीच्या  जावायाने हवनाची फल सिध्दता शंकराच्या प्रत्यक्ष दर्शनाने व्हावी ही कामना केली. त्याला दिलेल्या तांदळाचा भात ज्या रात्री शिजवून खाशील त्या रात्री प्रत्यक्ष दर्शन होईल असे नरेन्द्रनाथांनी सांगितल्यावर ही अनुभूती त्यांनी स्वतः अनुभवली की जे स्वतः तेलंगणामध्ये कृष्ण यजुर्वेदाचे घनपाठी आहेत. अशा अनेक अनुभूती प्रकांड पंडितांनी सुद्धा अनुभवल्या आहेत.

कुठल्याही प्रकारच्या वेद मंत्रांचे अध्ययन नरेन्द्रनाथांनी केले नाही, पण गुरुकृपेने वेदाच्या कुठल्याही मंत्राची अनुभूती ते कोणालाही देऊ शकतात. दुसर्‍याला कर्म सांगून स्वतःच्या कर्माची जोड देऊन पाहिजे त्या समस्यांचे निराकरण ते करु शकतात. बरेचदा ते करीत असताना यजमानाच्या ग्रहदोषांचा त्रास त्यांना स्वतःवर ओढून घ्यावा लागतो. परिणामतः प्रकृती ठीक असूनही विज्ञानाला न उलगडणारे कोडे पडते. अनेक विध पूजांचे संकलन करुन आगळे वेगळे सिध्द विधाने त्यांनी तयार केले आहेत  व त्याची फलश्रुती मूर्त स्वरुपात अनेकांनी घेतली आहे.

Leave a Reply