पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 143

श्रीपाद श्रीवल्लवांचा अवतार अथवा त्यांचा जन्म आपल्याला हे ज्ञान देतो की ईश्वराची कृपा झाल्यावर ईश्वर आपल पूर्व, संचित व प्रारब्ध बाजूला सारून सुखावह जीवन देऊ शकतो आणि पूर्ण कृपेचा जीव जन्माला घालू शकतो . जे दुःखामध्ये कष्टामध्ये जीवन जगत आहेत त्यांचे, कष्टप्रद जीवन केवळ गुरूंच्या संकल्पनेने दूर होऊन त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून येते

31-07-22         श्रीपाद श्रीवल्लभ अवतार घोर कष्टोद्धरणासाठी     

                        श्रीपाद श्रीवल्लवांचा अवतार अथवा त्यांचा जन्म आपल्याला हे ज्ञान देतो की ईश्वराची कृपा झाल्यावर ईश्वर आपल पूर्व, संचित व प्रारब्ध बाजूला सारून सुखावह जीवन देऊ शकतो आणि पूर्ण कृपेचा जीव जन्माला घालू शकतो त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या जीवांचे, जे दुःखामध्ये कष्टामध्ये जीवन जगत आहेत त्यांचे, कष्टप्रद जीवन केवळ गुरूंच्या संकल्पनेने दूर होऊन त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून येते हे केवळ भगवान श्रीवल्लभांच्या कृपेमुळे  इच्छामुळे.

          परमेश्वर कोणाचेही प्रारब्ध व पुर्वसंचित बदलू शकतो परंतु ही ईश्वरी कृपा सहजासहजी प्राप्त होत नाही ती केवळ गुरूंच्या माध्यमातून गुरुकृपेने साध्य होते

          श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रयांचे अवतार असून त्यांनी सद्गुरूंचे कार्य केले आहे

          ईश्वर होय जरी कोपिता गुरु रक्षेल परियेसा. याचा अर्थ आपल्या कुकर्मामुळे अथवा पूर्वसंचित दोषांमुळे जर आपल्या जीवनामध्ये उदासीनता आली असेल अथवा पुत्र संतती चांगली नसेल तर हे दोष गुरु आपल्या संकल्पनेने पूर्णपणे घालवू शकतात

          श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला अवतार याच कारणाने घेतला असून जीवनामध्ये तीर्थाटन अन्नदान  उपासना साधना तपश्चर्य यांचे महत्त्व दाखवले आहे. जीवनातील घोर कष्टातून बाहेर पाडण्यासाठी किंवा त्यातून उद्धरण्यासाठी

श्रीपाद श्रीवल्लभांची प्रार्थना केली आहे.

          हे देवाधिदेवा! श्रीपाद श्रीवल्लभा! तू नित्य निराकार निर्विकार आहेस. तूच स्वयं श्री दत्तात्रेयांचा स्वरूप आहेस. आमच्या प्रार्थनेला तू फलद्रूप करून आपल्या शरणात घे आणि आमचे रक्षण कर. आमचे सर्व प्रकारचे दुःख, क्लेश यांचा तू हरण कर आम्ही तुझी भक्ती करतो. तुझे सुंदर नामाचे गुणगान करतो, कीर्तन करतो. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

            तु माता, तूच पिता, आप्त बन्धु भ्राता आहेस. हे सद्गुरु, तूच त्राता आहेस, अर्थात आम्हाला या अघोर क्लेशतून काढणारा आहेस, तूच आमचे योगक्षेम चालवणारा आहेस.

तुझ्याविना कोणीच आमच नाही, तुच सर्वस्व आहेस. हे विश्व तुझ्याच रूपाने विनटले आहे. हे त्रिविक्रम भारती ला विश्वरूप दाखवणार्या श्रीदत्ता, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

            हे ईश्वरा, तूच आमचे पाप, ताप हरण करणारा आहेस. तूच सर्व व्याधी, दैन्य, दुःख, दारिद्र्य निवारण करणारा आहेस. या जन्म मरणाच्या च्या भीती आणि क्लेशातून मुक्त करणारा तूच आहेस तुझ्या शिवाय दुसरा कोणीच हे करू शकत नाही तूच सद्गुरू आहेस. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

               हे सद्गुरो ! तुझ्या शिवाय आम्हाला तारणारा कोणी नाही. आम्हाला देणारा आणि आमच भरण पोषण करणारा पण तुझ्या शिवाय कोणी नाही. तेव्हां, हे सद्गुरू, आम्ही तुला अनन्य शरण आलो आहे कारण तूच आमचा देव आहेस. हे आत्रेया (अत्रिपुत्रा) आमच्या वर अनुग्रह कर, घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

              हे अखिलान्दमूर्ते! तुच जगातल्या सगळ्या आनंदाची साक्षात मूर्ती आहेस. आम्हाला धर्मावर प्रीती दे, सन्मती आणि तुझी अर्थातच देवाची भक्ती दे. हे देवा, आम्हाला सत्संग अर्थातच चांगल्या लोकांचा साथ दे, जगातले भोग भोगून आम्हाला मुक्ती दे. तुझ्या चरणी आमचा सतत भाव असो हीच आसक्ती दे. घोर कष्टातून आमचा उद्धार कर आम्ही तुला नमस्कार करतो.

             लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारी ही श्रीपाद श्रीवल्लभांची स्तुति तथा प्रार्थना आहे. जो कोणी घोरकष्टोद्धरण या स्तोत्राचे नित्य भक्ती ने पठाण करेल, तो श्रीदत्ताला प्रिय होईल असे श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामींचे वचन आहे.

          गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायात या कथेचा विस्तार केला आहे तो असा.

          पिठापूर नावाचे एक गाव आंध्र प्रदेशात आहे. तेथे आपस्तंब कुळात आपळराजा नावाच्या ब्राम्हणाचे पोटी श्री दत्तात्रेयांचा पुढील अवतार झाल्याची कथा आहे. आपळराजा आणि सुमती हे ब्राम्हण कटुंब स्वधर्माचार सांभाळून राहात होते, ब्राम्हण यजन याजन करून प्रपंच चालवीत होता, तर त्याची पत्नी गृहस्थाश्रमाप्रमाणे अतिथी अभ्यागतांची सुद्धा मनोभावे विचारपूस करीत असे.

     एके दिवशी अमावस्येला पितरांचे श्राद्ध होते. त्याची शाक-पाक तयारी झाली होती. एवढ्यात दारावर ओम भवती अशी हाक आली. भर दुपारची वेळ दारावरील अतिथी परत जाऊ नये अशी शिकवण कारण ही वेळ श्री दत्तात्रेयांच्या भिक्षेची असते. कोणत्या स्वरूपात दत्त येतील याचा नियम सांगता येत नाही. आपळ राजाच्या पत्नीने क्षणाचाही विलंब न करता भिक्षा वाढली. घरी श्राद्ध आहे. ब्राम्हण भोजन झाले नाही. अशा वेळी भिक्षा वाढणे चुकले की काय असे वाटत असताच त्या याचकाने स्वतःचे रूप प्रगट केले.

     ते प्रत्यक्ष श्री दत्तच होते. त्यांनी जाणले की घरी श्राद्ध आहे आणि त्याआधी विप्रस्त्रीने आपल्याला भिक्षा वाढली आहे. हे पाहून दत्त प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले, माते तू चिंतीत दिसत आहेस. विप्रस्त्री म्हणाली देवा तू प्रत्यक्ष नारायणच आहेस. न मागता बिभीषणाला राज्य दिलेस ध्रुवाला अढळ पद दिलेस. माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर.

     दत्तात्रेयांनी अत्यंत करुणेने त्या विप्रस्त्रीला हात धरून उठविले आणि म्हणाले माते उठ चिंता करू नकोस. तुझी इच्छा पूर्ण करतो, माग! काय देऊ? विप्रस्त्री म्हणाली देवा मला आता तुम्ही माते म्हणालात. हेच सत्य करा, मला पुत्र बहुत झाले बहुत मेले जे वाचले ते आंधळे पांगळे आहेत काय करू असून नसल्या सारखेच. देई सूत सुबुध नाथ, नसता फजिती जनात. अशी प्रत्येक मातापित्यांची इच्छा असते.

      दत्तात्रेयांनी वर दिला. तुला पुत्र होईल माझ्यासारखा तुझ्या वंशाला उद्धारणारा होईल आणि या कलियुगात ख्यातिवंत होईल. तथापि तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे दुःख दैन्य याचे निवारण करील. एवढे बोलून दत्त अदृष्य झाले. ही हकीकत तिने आपळराजाला सांगितली. तो म्हणाला छान झाले मध्यानाला दत्तच येत असतात. पण दुपारच्या वेळी कोणत्याही वेषात ते भिक्षेसाठी येतात. तेव्हा मला न विचारता त्यांना भिक्षा देत जा ! ती म्हणाली नाथा आज श्राद्ध आहे. ब्राम्हण भोजन झाले नाही. तरीही मी भिक्षा घातली. आपळराजा विद्वानच होता. तो म्हणाला श्राद्ध करून पित्रांच्या नांवे सर्व कर्म करून ते श्री विष्णूलाच समर्पण करावे लागते. प्रत्यक्ष विष्णुंनीच येऊन श्राद्धात भक्षण केले त्यामुळे माझे पितरही तृप्तच झाले असतील. मन प्रसन्न झाले.

ती विप्रस्त्री गर्भिणी झाली. नवमासांचा कालखंड उत्तम प्रकारे व्यतीत झाला आणि एके शुभ दिनी तिला पुत्र झाला. विप्राने जातकर्म केले आणि ज्योतिषांना बोलावून योग्य संस्कार केले. जातकर्म हा सोळा संस्कारापैकी महत्वाचा संस्कार आहे. मात्र आज तो प्रचलित नाही. असो ज्योतिषांनी जन्म लग्न पाहून सांगितले की हा मोठा तपस्वी आणि दीक्षाकर्ता जगद्गुरू होईल.                    सात वर्षे पूर्ण झाल्यावर श्रीपादांची मुंज झाली आणि गायत्री प्रबोध होताच तो अत्यंत ज्ञानी झाला चार वेद सहा शास्त्रे मुखोदगत म्हणू लागला त्यामुळे आसपासचे विद्वान ब्राम्हणही शिकण्यास येऊ लागले. श्रीपाद त्यांना वेदांत भाष्य सांगत होते. श्रीपाद हे दत्तावतार असल्याने अशक्य ते काय?             अशाप्रकारे सोळा वर्षे झाल्यावर माता-पिता त्यास विवाह करू म्हणाले. श्रीपादांनी उत्तर दिले माझे नाव तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ ठेवले त्याचा अर्थ ध्यान्यात घ्या. मी ब्रम्हचारीच राहणार. श्रीपादांचा अधिकार एवढा मोठा होता की त्यांची इच्छा कोणी मोडत नसे. माता पिताही गप्प बसले पण नंतर म्हणाले आमचे सर्व पुत्र स्वतःच असहाय्य आहेत ते आम्हाला सांभाळू शकत नाहीत. आम्हालाच त्यांचा सांभाळ करावा लागतो. तुझ्यामुळे आशा पल्लवित झाल्या होत्या. तू तरी आम्हा सर्वांचे रक्षण करशील पण तू आम्हाला निराश केलेस.

     असे म्हणताच श्रीपादांनी आपल्या बांधवांवर अमृतदृष्टी टाकली आणि त्यांना सक्षम सुविद्य केले आणि म्हणाले. आता तुमचे दैन्य गेले ऐश्वर्य संपन्न जीवन जगा. मातापित्यास ही सांभाळा त्यामुळे तुम्हीही संसारसागरातून मुक्त व्हाल. आणखी आशीर्वाद दिला की या पुत्रांना कन्यापुत्र होतील तुम्ही डोळ्यांनी पहाल आता तरी मला निरोप द्या . मला तीर्थाटन करण्याची परवानगी द्याल ना. मला अनेकांना दीक्षा द्यावयाची आहे. असे म्हणून श्रीपाद श्री वल्लभ मनोवेगाने गोकर्ण क्षेत्राला आले. हा त्रिमूर्ती दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्री वल्लभ म्हणून प्रसिद्ध झाला.

Leave a Reply