पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 144

शुद्ध प्रांजळ अंतःकरणाने विचार केला तर ज्या शुद्धतेने ईश्वर आराधना किंवा गुरुची सेवा व्हायला हवी त्या प्रांजळ  मनाने ही आराधना होत नाही झालेल्या चुकीची क्षमा याचना ही  गुरूंजवळ करणे आवश्यक आहे.
ब्रह्मांडाचे सद्गुरू भगवान दत्तात्रेय

02-08-22 श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकली                  करुणाघन तू गुरुनाथा । कोण दत्ता आम्हां त्राता ।।

          प्रत्येक माणूस कळत नकळत रोजच काही ना काही चुका करीत असतो  आपण काही ना काही अपराध करीत असतो. हा अपराध म्हणजे गुन्हा   नसून ईश्वर भक्तीच्या भूमिकेतून घडलेला अपराध, भक्ताने आराध्य दैवतेची साधनापूर्ण जीवन जगत असताना केलेली चूक

          शुद्ध प्रांजळ अंतःकरणाने विचार केला तर ज्या शुद्धतेने ईश्वर आराधना किंवा गुरुची सेवा व्हायला हवी त्या प्रांजळ  मनाने ही आराधना होत नाही झालेल्या चुकीची क्षमा याचना ही  गुरूंजवळ करणे आवश्यक आहे.

          संपूर्ण ब्रह्मांडाचे गुरु म्हणजे भगवान दत्तात्रय. त्यांच्या सेवेत घडलेला  अपराध लक्षात घेऊन त्या अपराधाचे क्षालन करण्यासाठी त्यांची करुणा भाकली, ती देखील दत्ताला पूर्णपणे समर्पित असलेल्या दत्ताच्या लाडक्या भक्ताने – वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज गरुडेश्वर चे.

          दत्ताची अत्यंत आर्ततेने त्यांनी करुणा भाकली. भगवान दत्तात्रेयांचे अत्यंत लाडके शिष्य आणि त्यातून त्यांनी दत्ताचे आर्ततेने करुणा भागली ती विशेषच आहे

          हे करुणा गीत ज्याला कोणाला असे वाटते की दत्ताची आपल्यावर कृपा असावी त्याने ही करुणा रोजच दत्ता जवळ भाकावी.

         झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण,रसाळ रचना म्हणजे

शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥

          श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे. त्यांच्या ‘मनोहर पादुका’ कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चातुर्मास्यातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते.

          इ.स.१९०५ मध्ये एकेदिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना, पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळे घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे, असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी प. प. श्री. टेंब्ये स्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी (नामदेव) येथे चातुर्मास्यानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली.

          पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामी ध्यानाला बसले. ध्यानात त्यांनी श्रीदत्तप्रभूंना कारण विचारले, त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, “तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत, पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हांलाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंच नेमून परभारे व्यवस्था करावी !”

         कोणत्याही गुरूंना आपल्या सद्भक्ताला दुखावलेल आवडत नाही. सद् भक्ताची केलेली अवहेलना गुरूंना आवडत नाही व ते सद्भक्ताला त्रास देणाऱ्या सर्वांवर रुष्ट होतात.

          नाथपंथामध्ये सद्गुरूंची केलेली अवहेलना अथवा त्यांना दिलेला त्रास हा मागील संपूर्ण गुरुपरंपरेला आपलाच अपमान झाल्यासारखे वाटते त्यामुळे परंपरा अशा व्यक्तींना शासन केल्या शिवाय राहत नाही.

         तोच अनुभव पुजाऱ्यांनी टेंबे स्वामींची अवहेलना केली म्हणून भगवान दत्तात्रय रुष्ट झाले आणि त्रास देणाऱ्या सर्व पुजाऱ्यांना याची जाण देऊन धोक्याची सूचना द्यावी लागली.

          ध्यानातून उठल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी पुजा-यांना रोषाने सांगितले की, “जर दुर्वर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे !”

          पुजा-यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची, जशी घालून दिली आहे त्या बरहुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर प. प. श्री. टेंब्ये स्वामींनी कळवळा येऊन भगवान श्रीदत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी तीन पदांची करुणात्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली.

          प. प. श्री. टेंब्येस्वामी त्रिपदीचा समारोप करताना श्रीदत्तमहाराजांकडे फार सुंदर मागणे मागतात,

          प्रार्थी वासुदेव पदीं ठेवी भाव । पदीं देवो ठाव, देव अत्रिनंदन ॥

देवा सद्गुरुराया अत्रिनंदना, मी आपल्या श्रीचरणीं प्रेमभाव ठेवून प्रार्थना करतो की, आपण मला कायमच आपल्या पदी ठाव द्यावा, आपल्याच श्रीचरणीं निरंतर सेवारत ठेवावे. करुणात्रिपदीच्या सतत अनुसंधानाने, श्री. टेंब्येस्वामींच्या या मागणी प्रमाणे, करुणावरुणालय भगवान श्रीदत्तप्रभू तुम्हां-आम्हां सर्वांवर कृपावर्षाव करोत ही प्रार्थना .

या विशेष करुणात्रिपदीची खरी जन्मकथा लक्ष्यात घेण्यासारखी आहे

          ‘ करुणात्रिपदी ‘ ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण,रसाळ रचना आहे. यातून श्रीस्वामी महाराज, भगवान श्रीदत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा, आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हां सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला, अशी अत्यंत दयार्द्र होऊन भगवंतांची ते प्रार्थना करीत आहेत.

          आजच्या घडीला श्रीदत्तप्रभूंच्या सर्वच क्षेत्रांमध्ये, दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानांवर ही करुणात्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात् दत्तावतार प. प. श्री. टेंब्ये स्वामींचेच हे प्रासादिक, मंत्रमय शब्द असल्याने, आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की, करुणात्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्रीदत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच.

      अपराधक्षमापनासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील, एकमेवाद्वितीय, अद्भुत व अलौकिक काव्य म्हणून करुणात्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे !

करुणा गीत  

श्री टेंबे स्वामी महाराज

शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥

तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता । भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता । तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥

अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥

तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी । गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥

तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥

सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ॥५॥

          श्रीनृसिंहवाडीच्या पुजा-यांच्या मनमानी कारभारावर कोपाविष्ट झालेल्या श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकताना स्वामी महाराज म्हणतात,

“हे श्रीगुरु दत्तराया, आपण नेहमी शांतच असता. आपल्याला क्रोध येणे संभवतच नाही. पण भक्तांच्या हितासाठी आपण धारण या कृतक कोपाने माझ्या मनाला अस्वस्थता आलेली आहे, तेवढी घालवून आपण मला शांती प्रदान करावी ॥ ध्रु.॥

‘शांत हो श्रीगुरुदत्ता’ मध्ये, ‘अहो शांत श्रीगुरुदत्ता’ ‘शांत’ हे श्रीदत्तप्रभूंचे विशेषण आहे. स्वभावत:च ते नित्यशांत आहेत.

          देवा, आपणच आमची माता आहात, आम्हांला जन्माला घालणारे जनितेही आपणच आहात. आपणच आमचे सर्व बाजूंनी हित करणारे आमचे आप्त, जवळचे नातेवाईक, सगेसोयरे, आमचे वाडवडील, बंधू  आणि आमचे रक्षणकर्ते आहात. प्रसंगी आम्ही नीट वागावे म्हणून भय दाखविणारे व ती सुयोग्य जाणीव झाल्यावर ते भय हरण करणारेही आपणच आहात. म्हणूनच तुम्ही दंड धारण केलेला आहे. शिवाय तो दंड आमच्या संकटांचा, शत्रूंचा नाश करण्याच्या आपल्या लीलेचा द्योतकही आहे. म्हणूनच श्रीदत्तराया, तुमच्याशिवाय आम्हांला अन्य कोणीही माहीतच नाही. देवा, आपणच आमच्यासारख्या आर्तांचे एकमात्र आश्रय आहात. ॥१॥

          हे दयाळू भगवंता, आपण चुकलेल्यांना अपराधांची शिक्षा देण्यासाठीच हा दंड हाती धरलेला आहे. हे जरी यथार्थ असले तरी आम्ही अपराधी भक्त, आमच्या चुकांची कबूली देऊन, तुमची यशोगाथा गाऊन तुमच्या चरणीं मस्तक नमवून करुणा भाकत आहोत. तरीही आपण आम्हां अज्ञ लेकरांना दंड देणार असाल, तर मग आम्ही कोणाचा धावा करावा? तुमच्याशिवाय आम्हांला संकटांमधून सोडवणारे कोण आहे दुसरे? ( एरवी तुम्हीच आम्हांला सर्व संकटांमधून बाहेर काढता, आता जर तुम्हीच संकट रूपाने समोर उभे ठाकलात तर आम्ही बापुड्यांनी जायचे कुठे?) ॥२॥

          हे दत्तात्रेयप्रभो, आम्ही सुधारावे म्हणून आपण नटाप्रमाणे क्रोधाचा आवेश आणून आम्हां पापी जीवांना एकवेळ दंड द्याल. पण आम्ही अज्ञानी, संसारी जीव पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणार. तेव्हा आपण आम्हांवर असे रागावू नका. पडून पडून आम्ही जाणार कुठे? तुमच्याच चरणांवर पडणार ना? तेव्हा आमच्यावर आता आपण निजकृपेचा वर्षाव करावा हीच आमची कळकळीची प्रार्थना आहे. ॥३॥

          हे पतितपावना, आपल्या पदांचा एकदा का आश्रय घेतला, की समजा चुकून आडमार्गावर पाउल जरी पडले, तरीही आम्हांला त्या परिस्थितीतून सांभाळून सुखरूप पुन्हा आपणच योग्य मार्गावर आणता. हेच आपले भक्तवात्सल्याचे अलौकिक ब्रीद आहे. तेव्हा आता त्याच आपल्या ब्रीदाची आठवण काढून, हे करुणाघन गुरुनाथा, आपण आपला कोप सोडून पुन्हा आमच्यावर कृपावंत व्हावे. ॥४॥

          सहकुटुंब, सहपरिवाराने, अवघ्या घरादाराने आम्ही आपलेच दास आहोत. आपल्याच श्रीचरणीं आम्ही आमचा हा असार संसारभार, आमची सर्व कर्मे अर्पण केलेली आहेत. त्या कर्मांच्या जडभाराचा परिहार करून, हे करुणेच्या सागरा, दीनानाथा, आमच्या उत्तम बांधवा, हे दत्तात्रेयप्रभो, आपण आमचे ते सर्व पाप हरण करावे. त्या पापांच्या लवलेशानेही आमच्या सेवेत इथून पुढे कसलीही बाधा आणू नये, हीच कृपा आम्हां दीनदासांवर आता आपण करावी, अशी मी ‘वासुदेव’ आपल्याला प्रार्थना करीत आहे. ॥५॥

सद्गुरु श्री टेंबे स्वामी महाराजांची करुणात्रिपदी हे अत्यंत प्रासादिक व अजरामर प्रार्थनाकाव्य आहे. आजवर लाखो भक्तांनी या त्रिपदीच्या अनुसंधानाने भगवान श्रीदत्तप्रभूंच्या करुणाकृपेची अद्भुत प्रचिती घेतलेली आहे. श्री स्वामी महाराजांनी या करुणात्रिपदीतून श्रीदत्तप्रभूंच्या करुणाप्राप्तीचा राजमार्गच तुम्हां आम्हां भाविकभक्तांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे यात शंका नाही.

          तेव्हा आजच्या पावन दिनी या अलौकिक करुणात्रिपदीचे अनुसंधान करून, श्री स्वामी महाराजांच्या शब्दात श्रीदत्तचरणीं कायमचा ठाव देण्याची श्रीगुरुचरणीं प्रेमप्रार्थना करू या !!

             श्री गुरुदेव दत्त

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi