पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 145

शिष्याला घडवण्यासाठी गुरु सतत प्रयत्न करीत असतात. शिष्याला त्याची जाणीव नंतर होते. समाजात कार्य करण्यासाठी शिष्याला कसे तयार करावे हे सद्गुरूंपेक्षा इतर कोण जाणणार ?
सद्गुरू व्यंकटनाथ महाराज

03-08-22     सदासर्वदा देव सन्निध आहे | कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे

                           व्यवहारातून अध्यात्माकडे

शिष्याला घडवण्यासाठी गुरु सतत प्रयत्न करीत असतात. शिष्याला त्याची जाणीव नंतर होते. समाजात कार्य करण्यासाठी शिष्याला कसे तयार करावे हे सद्गुरूंपेक्षा इतर कोण जाणणार ?

          चार्टर्ड अकाऊंटंटचा व्यवसाय असल्यामुळे बँकांचे हिशेब तपासण्यासाठी निरनिराळ्या गावाला ऑडिटसाठी जावे लागे. व्यवसायानिमित्त असाच एकदा बुलढाण्याच्या महाराष्ट्र बँकेचे ऑडिट करावयास नरेंद्र गेला होता.    

     बँकेत ऑडिट सुरू असताना मॅनेजरच्या टेबलावरचा फोन खणाणला. मॅनेजरने तो घेतला आणि समोरच्या व्यक्तीचा आवाज ऐकून ब्रँच मॅनेजर अक्षरशः खुर्चीतून उठून उभा राहिला, यस सर, यस सर, यस सर असे करीत होता. त्यामुळे त्यांचेकडे लक्ष गेले. त्यांचे बोलणे ऐकू असतांना मॅनेजरने विचारले, साहेब तुम्ही स्वतः नरेंद्र चौधरी आहात काय? होय म्हणताच तुम्हीच चार्टर्ड अकाऊंटंट आहात काय? होय म्हटले, तुम्ही अकोल्यामधलेच आहात ना? त्यांचे प्रश्न ऐकून मनात विचित्र विचार येऊ लागले. मॅनेजरला तर नरेंद्रच्या  नावाची ऑफिशियल इंटिमेशन आली होती. ऑडिट सुरू करण्यापूर्वीच ओळख पत्र  दिले होते. तरी यांना हे प्रश्न का पडले म्हणून नरेंद्र विचारात पडला. तोच ते मॅनेजर पुन्हा यस सर म्हणाले व फोन नरेंद्रच्या हाती दिला.

नरेंद्र थोडा भांबावून गेला होता.

आपल्याबद्दल कोणी काही शंका घेते आहे का? कोणाचे  काही आक्षेप आहेत काय? असे निरनिराळे विचार मनात आले. त्यावर नरेंद्र म्हणाला मी म्हटले मला नाही बोलायचे. त्यांना गरज असेल तर तुम्ही येथे या असे सांगा असे मी म्हटले. माझा आवाज फोनवरुन तिकडे गेला असावा. मॅनेजरने त्यांच्या सांगण्यावरून मला खूपच गळ घातली. मी विचारले कोण आहे? ते म्हणाले जेलर. बुलढाण्याचे जेलर आहेत. त्यामुळे भिती अधिकच वाढली. सरकारी यंत्रणात केंव्हा काय होईल कोण जाणे.

मी फोन घेतला. हॅलो म्हणताच समोरुन आवाज आला मी तुम्हाला वंदन करतो, आपणच नरेंद्र चौधरी ना. मी म्हटले हो. व्यंकटनाथ महाराजांचे आपण पट्टशिष्य आहात असे मला कळले, तेच नरेंद्र चौधरी आहात ना? मी म्हटले मी पट्टशिष्य नाही पण नरेंद्र चौधरी आहे.

          बस बस आमचे काम झाले. आपण महाराष्ट्र बँकेच्या ऑडिटसाठी आलात ही माहिती आम्हाला आहे. आपण ऑडिट सहा वाजेपर्यंत करणार आहात काय? बँक मॅनेजर बँक सहा वाजता बंद करणार तोपर्यंत आपण बसणार काय? मी म्हटले हो. मला त्यापेक्षा अधिक वेळ लागेल. ते म्हणाले ठीक आहे. ते म्हणाले आपण कोठे उतरले, आपल्यासोबत कोण कोण आहे ही सर्व माहिती मजजवळ आहे. आपल्याला कोण कोण भेटले याची माहिती मजजवळ आहे. मी माझ्या माणसाला पाठवितो. सहा वाजता तो आपणास भेटेल, आपण माझ्याकडे यावे अशी हार्दिक विनंती करतो आणि आपल्या प्रतीक्षेत आम्ही सर्व आपली वाट पाहतो.

          या संभाषणानंतर मी फारच अस्वस्थ झालो आणि कुठून हे लचांड आपल्यामागे लागले, कोणत्याही परिस्थितीत पुढच्या तीन दिवसात काम संपणार नव्हते. बुलढाणा शहरात ज्या जेलरला एवढी माहिती मिळाली तो मला कुठूनही हुडकून काढणार या विवंचनेत होतो. शेवटी मनात विचार केला की, हा माणूस सहा नंतर पुढे आपल्याला सहज पकडू शकतो तेव्हा लवकरच आपल्या खोलीवर जाऊन आपण कुठेतरी निघून जावे या उद्देशाने बँकेचे काम करून लवकर म्हणजेच साडेपाच वाजता मी रुमवर गेलो.

          तिथे जाताच वाट पाहत असलेला माणूस उठून उभा राहिला. त्याने नमस्कार केला. म्हणाला नरेंद्रभाई, मी पाच वाजेपासूनच येथे बसलो आहे. जेलर साहेबांनी मला सक्त ताकीद दिली आहे की ते तुमचे गुरूबंधू आहेत त्यांना काहीही करा, कसेही करा पण त्यांना माझ्या घरी घेऊन या. माणूस अतिशय सज्जन आहे. वाईट प्रवृत्तीचा नाही. हे खूप मोठे अधिकारी आहेत. आम्हाला याच गावात राहायचे आहे. तेव्हा गुरुबंधू म्हणून तुम्हीच आम्हाला संरक्षण द्या. त्यांचा उद्देश काय? ते कशासाठी बोलावतात हे काहीच कळले नाही. आपल्याला गुरूबंधू बोलवायला आला आहे ही काहीतरी महाराजांचीच योजना असावी असा विचार करून शेवटी जे होईल ते पाहू या मनाच्या निर्धाराने त्यांच्याकडे गेलो.

          सरकारी क्वार्टर्समध्येच ते जेलर राहत होते. माझ्या गाडीने मी ड्रायव्हींग करीत आत गेलो. आत जाताना प्रत्येक क्षणाला जाणवत होते की कोणत्याही परिस्थितीत गाडी रिव्हर्स घेऊन पळून जाऊ शकणार नाही.

          थोडे आत गेल्यावर तेथे सर्व मंडळी बाहेर आली. माझी गाडी थांबविली. माझे चरण स्पर्श करीत हात जोडून ते उभे राहिले महाराज चला पुढे. सर्व मंडळी वयाने माझ्या पेक्षा बरीच मोठी होती. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व कडक सोवळ्यात अत्यंत अदबीने हात जोडून उभे होते. पुढे चालू लागल्यावर दुतर्फा पोलीस होते. पोलिसांची लांबलचक रांग होती आणि सर्वांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. तो मी त्यांच्या घरात शिरेपर्यंत.

          आत गेल्यावर त्यांनी पाय धुतले आणि एक आसन ठेवले होते. त्यावर बसण्याची विनंती केली होती. सर्वांनी उभ्या उभ्या वेदोक्त शांतिपाठ म्हटला. माझी आरती केली पुन्हा पायावर डोकेठेवून पुन्हा नमस्कार केला आणि माझ्यासमोर, आपापल्या आसनावर उभे राहिले. मी म्हटले ते आता बसतील, ते आता बसतील. तर ते माझ्याकडे पाहात होते. मी बसा म्हटल्यावर पुन्हा नमस्कार करुन बसले. घरात बर्‍याच बायका मंडळी होत्या. पडद्यामागून त्या सर्वकाही पाहात होत्या.

          जेलरनी बोलावयास सुरुवात केली. आम्हाला असे कळले की 20 वर्षाच्या वरचा कालावधी झाला असेल, आपण व्यंकटनाथ महाराजांच्या सान्निध्यात व सहवासात आहात. व्यंकटनाथ महाराजांचे जे चरित्र आम्ही वाचले ऐकले ते केवळ अलौकिक अतार्किक असे महान आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आहे. अशा नाथ महाराजांच्या सहवासात एखादा रेडा जरी 20 वर्ष राहिला तरी तो ज्ञानी होईल. यावर आमचा विश्वास आहे. असे बोलून हजर असलेल्या 10 ते 12 जणांनी पाच पाच मिनिटे महाराजांवर आणि त्या अनुषंगाने माझ्यावर बोलले.

          मी बाकी खुर्चीवर बसल्यापासून बाहेर पडेपर्यंत सततच गुरूंचा धावा करीत होतो. मी कुठे आणि कसा फसलो हेच मला कळत नव्हते. महाराज मला वाचवा या पलीकडे मी काहीच म्हणत नव्हतो. ऑफिसमधल्या पेहरावात मी होतो. सगळ्या लोकांनी माझ्याकडून तीर्थ आणि प्रसाद मागून घेतला व ग्रहणदेखील केला.

          नंतर जेलर साहेब बोलू लागले. तोच माझा हात बाजूला जो टेबल होता, त्या टेबलावरील कव्हर घातलेल्या पुस्तकावर पडला. लगेचच ते जेलर म्हणाले धन्य झालो आम्ही. आपला हात त्या पुस्तकावर पडला. आपल्याला अतिशय कळकळीची विनंती आहे ते पुस्तक हातात घ्यावे आणि दोन्ही हातांनी निघेल ते पान काढावे. तेथून सुटकेच्या अपेक्षेने ते म्हणतील ते करू लागलो. पुस्तकांचे पान काढले आणि ते म्हणाले जिथे तुमची नजर पडेल त्या पुस्तकातील दोन ओळी आपण मोठ्यानी वाचाव्यात. कार्यक्रम संपविण्याच्या दृष्टीने त्या दोन ओळी वाचल्या. त्यावर ते म्हणाले त्याचा अर्थ खाली दिला आहे तो आपण वाचावा आणि त्या ओळींना अनुसरून आम्हाला जीवनाचे मर्गदर्शन होईल असे बोधप्रद काही तरी सांगावे.

          हे तर मला केवळ अशक्यच होते. कोणताही अभ्यास नाही. त्यांच्या अफाट कल्पना. अतिशय तेजस्वी प्रखर व्यक्तिमत्त्वाच्या सावलीत मी बराच काळ काढला एवढेच. जे काही घडले असेल ते गुरूंनाच माहीत. गुरूंनीच हा परीक्षेचा प्रसंग योजलेला दिसतो असे वाटू लागले. त्या सर्व वयोवृद्ध लोकांनी माझे काहीच ऐकले नाही. शेवटी त्यांनीच मार्ग काढला या दोन ओळीवर आम्ही प्रत्येक जण आपापला विचार पाच मिनीटे आपल्या समोर मांडतो. त्यानंतर आपण समारोप करावा एवढीच आपणाला प्रार्थना.

          डोके गरम होऊन गेले होते. कोणताही विचार करणे अशक्य होते. एकच ध्यास मनातून अखंड चालला होता. महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. ते काय बोलत होते त्याकडे लक्ष नव्हते. त्यावर ते अभ्यासपूर्ण बोलत होते. ते पुस्तक कोणते, लेखक कोण, त्यात काय हे मला काहीच कळत नव्हते. आतून मला एवढेच भासत होते, अरे हा दासबोध आहे. पण भांबावल्यामुळे मला काहीच सुचत नव्हते सर्वांनंतर आता माझी वेळ आली. आता मला गती नव्हती.

मी बोलू लागलो. तुम्ही सगळे वयोवृद्ध तपोवृद्ध तुमचा अभ्यास माझ्यापेक्षा खूप जास्त आहे. मी एक सामान्य व्यावहारिक माणूस आहे. आपला माझ्याबद्दल काही तरी गैरसमज झाला आहे. मी आपला क्षमाप्रार्थी आहे. माझ्या या बोलण्याकडे त्यांनी अतिशय सौजन्य पणे दुर्लक्ष केले. आता कांहीतरी बोलल्याशिवाय हे लोक आपल्याला सोडणारच नाही ही खात्री पटली. त्यामुळे इलाज नसताना मी बोलू लागलो.

          माझ्या गुरुंनी मला गोष्टींच्या माध्यमातून शिकवले. त्याच पद्धतीने मी या दोन ओळींचा खुलासा करण्याचा प्रयत्न करतो. सर्व प्रथम त्यांना सांगितले व्यक्तिशः तुम्ही सर्व लोेकांनी जे काही विचार मांडले ते माझ्यासारख्या व्यावहारिक, प्रापंचिक आणि कदाचित कोणतेही ज्ञान नसलेल्या मला समजू शकत नसतील. माझी ती पात्रता नाही. तरी पण माझ्या अंतर्मनाला तुमचा कोणाचाच विचार पटला नाही. सर्वांचेच विचार, मला पूर्णतः चुकीचे वाटतात. अध्यात्म आपण सांगता तसे नाही. त्यावर त्यांनी लगेचच एकच गोंगट केला. आम्ही जे सांगतो तेच बरोबर आहे असे ते म्हणू लागले.

          मी म्हटले तुमचे बोलणे जसे मी शांतपणे ऐकून घेतले तसे तुम्ही माझे बोलणे शांतपणे ऐकावे व ते बरोबर आहे किंवा नाही ते मला उद्या सकाळ नंतर सांगा. ते म्हणाले आम्ही याचा सखोल अभ्यास केला आहे. आम्ही जे सांगितले त्या व्यतिरिक्त कोणताही विचार आम्हाला पटूच शकणार नाही. तथापी त्यांनी माझे बोलणे ऐकले आणि समारोप म्हणून बोलताना पुन्हा म्हणाले, नाथ महाराजांचे पट्ट शिष्य नरेंद्र चौधरी यांनी जे काही वक्तव्य केले ते आम्हाला कोणालाच पटले नाही. ते म्हणतात सकाळपर्यंत वाट पहा. तथापी जे आज आम्ही सांगतो तेच आम्ही सकाळी सांगू , असे म्हणून तो विषय थांबला.

          त्यानंतर त्यांनी माझी आरती केली. नमस्कार केला, आणि माझी सुटका झाली. काय प्रसंग निर्माण करून सदगुरूंनी मला त्यात ढकलले, नरेंद्र कसा घडला हे कदाचित त्यांना पहायचे असेल.

          दुसर्‍या दिवशी विशेषच घडले. त्यांचा माझा फोनवर संपर्क झाला नाही, मला पाहत ते गावभर फिरत राहिले. जे गृहस्थ मला घेण्यासाठी आले होते, त्यांना मी कोठे आहे वगैरे सांगायचे नाही, माझी ओळखही द्यायची नाही. खरेतर मी त्यांच्याच घरी जाऊन आमच्या गुरूंचे भजन करीत बसलो होतो. पण त्या सर्वांचा त्या गृहस्थाशी संपर्क झाला. त्यांनी सांगितले की पहाटे चार वाजता आम्हा सगळ्यांनाच कुठल्या तरी एका शक्तीने पुन्हा तेच सांगितले. त्यांनी आम्हाला जे सांगितले तेच बरोबर आहे याबद्दल आमची खात्री पटली आणि आम्ही कसे चुकलो हे त्या शक्तीने सांगितले. कसेही करुन त्यांना सांगा आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येतो, पण नंतरचे तीन दिवस त्यांचा माझा कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. मी काम आटोपून सरळ अकोल्याला घरी परत आलो. अशा तर्‍हेने गुरूंनी माझी परीक्षा पाहिली व त्या लोकांना काहीतरी विशेष जाणीव त्या शक्तीने दिली.

          त्यानंतर काही कालावधी नंतर महाराजांचा कार्यक्रम बुलढण्यात होता त्यासाठी मला तेथे जावे लागले. महाराज म्हणाले येथील जेलर बद्दल आम्हाला सर्व माहीत आहे. तुझा झालेला प्रकार आम्ही असतांनाच झाला होता. तू सांगितल्या नंतर सर्वांचीच कानउघाडणी केली.  

Leave a Reply