
30-06-22 ज्ञानेश्वरांचे विचार
रामदास स्वामी जे मारुतीचा अवतार समजले जातात ते म्हणाले की जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अन्न पाण्याची व्यवस्था परमेश्वराने केली आहे जीवन कशा पद्धतीने व्यथित व्हावे याची त्याने योजना केलेली आहे त्याच्या नामस्मरणाने भजन पुजन उपासनेने जर आपण आपले जीवन ठेवले तर जीवाचा उद्धार लवकर होईल जगी पाहता देव हा अन्नदाता तया लागली तत्त्वतः सार चिंता तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मना सांग पां रे तुझे काय जाते
परंतु माणसाला जीवनामध्ये पोटभर अन्न मिळवण्याची अभिलाषा नसते त्याच्या अपेक्षा अभिलाषा या कितीतरी पट जास्त आहे नुसते जेवायला मिळाले म्हणून स्वस्त बसला नामस्मरण करत बसला असं जीवनात होऊ शकत नाही तो सदैव आपलं जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठी पैसा मान मरातब ख्याती अहम मान्यता अहंकार जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अहोरात्र झटत राहतो. केवळ ईश्वर साधना आराधना करून आपलं जीवन कृतार्थ करावं ही कोणाचीच कल्पना नसते ती केवळ साधू संतांची महात्म्यांची असते
त्यामुळे काम क्रोध मद मोह लोभ मच्छर या षडरिपू मध्ये अडकून आपलं जीवन अधिकाधिक कष्टप्रद दुःखी अशांत अस्थिर करून सोडतो. शेवटी त्याचे त्यालाच कळत नाही की माझे भोग असे का ? माझं जीवन असे का ?
रामदास स्वामी म्हणतात
मना त्वा चिरे पूर्व संचीत केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले
मानवाने जीवनात कोणत्या विचार बुद्धीने वागावे याबाबती ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर मार्गदर्शन केले आहे. आळंदीचे संत ज्ञानेश्वर कोणाला माहित नाहीत? ज्ञानेश्वरांच जीवन पाहिलं तर ते अत्यंत खडतर असं होतं. कर्मांनी विचारांनी आणि ज्ञानांनी ते खरोखरच ज्ञानेश्वर होते.
मुळात ते विष्णूचा अवतार होते त्यांच्या जन्माची कहाणी इतिहासाला धरून पाहिली तर लक्षात येईल की स्वतः विष्णू ने ज्ञानेश्वर म्हणून जन्माला येण्याचे द्वापार युग संपता संपता घोषित केले होते. तसेच शंकराने देखील निवृत्तीनाथ म्हणून जन्माला येईल असे त्याच वेळेस घोषित केले होते
म्हणजे ज्ञानेश्वरांचे जे जीवन तेच विष्णू अवताराचे जीवन. विष्णूनेच ज्ञानेश्वर म्हणून अवतार धारण केला होता
संपूर्ण वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पांचही महातत्त्वावर त्यांचं प्रवृत्व होतं अस असतांना देखील त्यांनी आपला जीवन प्रवाह समाजाच्या दृष्टीने खडतर ठेवला.
समाजात राहून समाजाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. माणसाला माणूस म्हणून पहा, माणूस म्हणून रहा आणि माणूस म्हणून जगा हे त्यांचे सांगणे होते. माणूस कसा असावा हे त्यांनी त्यांच्या जीवनचरित्रावरून निरनिराळ्या तऱ्हेने समजावून सांगितले. परंतु त्या वेळेचा काळ आणि त्यावेळेसचे समाजातील मानव त्यांना ओळखू शकले नाही व समजू शकले नाही. त्यांचा अवतार मानव कल्याणासाठी होता कलियुगात माणसाची जी दैना अवस्था झाली आहे ती कशाप्रकारे चांगली होऊ शकते यावर त्यांनी निरनिराळ्याप्रकारे प्रकाश टाकला
ज्ञानेश्वर म्हंटल की वारकरी पंथ समोर येतो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुणण्याची गणना कोण करी हे ते सतत सांगत आले जन्मो जन्मी ईश्वराचं नाव घेत रहा, घेतचरहा आपोआप केव्हातरी कोणत्यातरी जन्मात जीवाचा उद्धार होईल हेच त्यांना सांगायचे होते
रामदास स्वामींनी हे वेगळ्या शब्दात असे सांगितले अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे तदनंतरे
सामान्यतः कोणत्याही जीवाचा उद्धार एका जन्मात अथवा चालू जन्मात होईल ही कल्पनाच भ्रामक आहे
आपल्या चित्तवृत्ती प्रवृत्ती सदाचार लक्षात घेतले तर आपल्यालाच लक्षात येईल की द्वापार युगात जसे जनसामान्यांचे जीवन होते तसे आपले नाही त्रेतायुगात जसे होते तसे आपले जीवन नाही आणि सत्य युगाची आपण कल्पना करतो आणि वाटच पाहत राहतो.
कुठे पंचवीस तीस फुटाचा धडधाकट उंच पुरा ईश्वर भक्त असा सामान्य माणूस आणि कुठे पाच सहा फुटाचा कलियुगातला फाटक्या अंगाचा माणूस?
आपल्या जीवनात आपल्याला असंख्य प्रश्न आहेत. जीवनासंबंधी आहेत, शरीरयष्टी संबंधी आहेत स्वास्थ्या संबंधी आहेत कौटुंबिक वातावरण आणि समाजातील जीवनाचे प्रश्न आहेत.
जो तो आपल्याच उद्देशाने प्रेरित होऊन स्वार्थात आणि मोहचक्रात अडकलेला आहे
जीवनात जशी जमेल तशी ईश्वर भक्ती करून असंख्य गोष्टींची कामना आपण परमेश्वराकडे करतो सदैव आपले प्रारब्ध पूर्वसंचित नशीब यांची आपल्याला आठवण येते
जीवनातील यशापयश व आपल्या मनोकामना या आपली मनःशांती हिरावून घेतात
धीर गंभीरपणे शांत प्रवृत्तीने स्थिर विचारांनी जीवनाकडे पाहण्याचा व जीवनात काही करण्याचा आपल्याला वेळच मिळत नाही.
संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी मानवी जीवनाबद्दल हे कांही विचार मांडले आहेत. त्याच प्रत्येकाने मनन चिंतन करण्याची गरज आहे.
हे १० विचार अतिशय सुंदर आहेत. आपण अवश्य वाचा त्याच्यावर मनन करा चिंतन करा आणि नव्या विचाराने आणि नव्या उमेदीने आपल्या जीवन प्रवाहाकडे पहा. आणि नंतर ठरवा की आपण आपल्या जीवनात किती आणि का दुःखी व्हावे आपण कर्म करणे हे एकमेव एक साधन आहे
१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
हे सर्व विचार ज्ञानेश्वरांनी आपल्या खडतर जीवनाच्या अनुभवा नंतर सर्व जीवांच्या उद्धारासाठी मांडले आहेत.
अभ्यासू वृत्तीने खरं पाहिलं तर हे विचार ज्ञानेश्वर म्हणण्या ऐवजी भगवान विष्णू ने स्वतः मांडले आहेत असे समजणे योग्य राहील. ब्रह्मांडामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय अशी कार्याची विभागणी झाली आहे. यामध्ये स्थितीचे कार्य विष्णूकडे आहे त्यामुळे जन्मापासून मृत्यू काळापर्यंत आपले जीवन भगवान विष्णूच्या योजने प्रमाणेच चालणार आहे. हे लक्ष्यात घेऊन आपण कोणत्या विचारधारांनी आपल्या जीवनाकडे पाहून आपला जीवनाचा प्रवाह ठेवावा हे ज्याचे त्याने आपल्या विवेकाने ठरवावे
हे सात्वीक जीवन सारांश आपणांस आपल्याच जीवाचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी समर्पीत करीत आहे.