पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 148

रेवणनाथांनी आपल्या शिष्यांच्या मेलेल्या मुलांना जिवंत केले ज्यावेळेला शंकराशी युद्ध केल्यानंतर विष्णूशी युद्ध करायला गेला तेव्हा विष्णूने सांगितले की तुला ते जीव देतो परंतु त्यांना देहरुप देऊन त्याच प्रारब्ध बनवणं हे काम तुला करावे लागेल. यावरून हे लक्षात येतं की मरण पावल्यावर देखील आत्मा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हजर असतो परंतू त्यात बदल हे केवळ सद्गुरुच करूशकतात.

06-08-22           मेल्यानंतरहि आत्म्यावर गुरूंचीच सत्ता असते

           रेवणनाथांनी  यमाला ताकीद देऊन, शंकराच्या दूतांशी आणि शंकराशी युद्ध करून विष्णू कडून मेलेले सात जीव परत आणले. विष्णूच्या सांगण्याप्रमाणे त्या सात जीवांना रेवण नाथांनी पूर्वीचेच देहरूप देऊन जिवंत केले. रेवणनाथांनी पंचमहाभूतांची आणि ब्रह्मांडाची सर्व तत्त्वे बाजूला सारून त्यांचे प्रारब्ध बाजूला सारून, सर्व मुलांना पूर्वीच्याच देहाने जिवंत केले.

           हे केवळ अतर्क्य व असंभव आहे परंतु पंचमहाभूतांवर सत्ता असल्यावर सर्वच काही शक्य आहे देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे जेव्हा केव्हा देह धारण करून पृथ्वीवर अवतारायच आहे त्यावेळेला याच पंचमहाभूतांच्या साह्याने सर्वांनाच देह धारण करावा लागतो

           रेवणनाथांनी आपल्या शिष्यांच्या मेलेल्या मुलांना जिवंत केले ज्यावेळेला शंकराशी युद्ध केल्यानंतर विष्णूशी युद्ध करायला गेला तेव्हा विष्णूने सांगितले की तुला ते जीव देतो परंतु त्यांना देहरुप देऊन त्याच प्रारब्ध बनवणं हे काम तुला करावे लागेल. यावरून हे लक्षात येतं की मरण पावल्यावर देखील आत्मा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हजर असतो त्याला शरीराचे बाह्यरूप हे प्रत्येकाच्या कर्मयोगाप्रमाणे ब्रह्मांड तात्वानुसार अगतीकपणे दिले जाते. परंतू त्यात बदल हे केवळ सद्गुरुच करूशकतात. ब्रह्मा विष्णु महेश ह्या शक्तींना ते ब्रह्मांड तत्वा प्रमाणे करता येणे शक्य नाही. त्याला त्यांच्या कार्य मर्यादा आहेत. उत्पत्ती स्थिती लयांच्या मर्यादा आहेत. परंतू भगवान दत्तात्रेय जे ब्रह्मांडाचे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना जीवन मरणाच्या चक्रात पाहिजे तो बदल करण्याचे अधिकार आहेत. जे अधिकार भगवान दत्तात्रेयांना आहेत ते सर्व अधिकार त्यांनी प्रस्थापित केलेल्या नाथ पंथाला, नवनाथांना आहेत.

          ज्यांची पंचमहाभूतांवर त्रिभुवन वर सत्ता आहे तेच हे कार्य करू शकतात आणि त्यातून ज्या प्रारब्धाने जन्म झाला होता त्याच प्रारब्धाने पुन्हा जिवंत करणे हे कोणालाही शक्य नाही माणूस एकदा मेला की त्याचा तो कार्यभाग संपला परंतु हे जरी असले तरी उत्पत्ती स्थिती आणि लय या पलीकडे जाऊन हे कार्य रेवणनाथांनी केलं. मेलेले सहा मुलं व नुकताच मेलेला एक मुलगा असे सात मुलं जिवंत करून पुन्हा आणले. कथानक ऐकायला रम्य वाटते परंतु हे सहजतेने रेवणनाथांनी घडवले. हे सामर्थ्य भगवान दत्तात्रेयांच आणि नावनाथांच आहे.

          यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की मृत पावलेल्या जीवांवर देखील नाथांचे प्रभुत्व असते केवळ जिवंत असलेल्या भक्तांवर शिष्यांवर त्यांचा अधिकार नसून तो सर्वांवरच असतो. ब्रह्मांडात होऊन गेलेल्या आणि होणाऱ्या सर्वच गोष्टींवर त्यांच नियंत्रण असत. ब्रम्हा विष्णू महेश यांच्या कार्यक्षेत्रातून म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय बाहेर पडलेल्या जीवांचा आपल्याला हवा तसा उपयोग करणे हे नाथांना शक्य होते परंतु हे कोणत्याही स्वार्थ प्रेरित हेतूने नसून किंवा स्वतःचा मोठेपणा दाखवण्याच्या भूमिकेतून नसून जीवार असलेली सत्ता ही लक्षात येते आणि नाथ मेलेल्या जीवाला देखील पाहिजेत असेल तसे उभे करू शकतात

          नवनाथांनी आपला कार्यावतार आटोपल्यानंतर गृहस्थाश्रमातून कार्य करणाऱ्या निवडक सद्गुरूंवर कार्याचा पुढील भाग सोपवला. व्यंकटनाथ महाराज हे याच नाथ पंथाच्या अखंड परंपरेतले मच्छिंद्रनाथांपासून पंधरावे नाथ होते. ज्या घटना नवनाथांच्या काळात घडल्या तशाच घटना त्यांच्या जीवनप्रवाहात घडल्याची अनुभूती त्यांच्या शिष्यांनी घेतली आहे. शिष्यांना आलेल्या त्यांच्या अनुभूतीवरून असे सहजपणे म्हणता येईल की पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांवर त्यांचे प्रभुत्व होते आणि पंचमहाभूतांचा देह पाहिजे तेंव्हा पाहिजे तसा पाहिजे तिथे निर्माण करून तो पुन्हा पंचमहाभूतात लगेचच विलीन करण्याच्या त्यांच्या सामर्थ्यची अनुभूती त्यांच्या शिष्यांनी घेतली आहे

          माणूस मेल्यानंतर त्याच्या कर्म संचय याप्रमाणे तो कोणत्यातरी योनीमध्ये जन्म घेऊन जीवाचा पुढील प्रवास करत असणार. ज्ञानदेवांच्या उदाहरणावरून पहा एका रेड्याला सात रेषा ओलांडून त्यांनी त्या रेड्याच्या मुखातून ज्या जन्मात तो वैदिक होता त्या जन्मातील आठवण देऊन त्याला वेद म्हणायला सांगितले ज्ञाननाथ हे याच परंपरेतले पाचवे नाथ होते. हे त्यांनी सहजपणे करून दाखविले याही उदाहरणावरून हेच लक्षात येते की मेल्यानंतर देखील तो जीव जिथे कुठे असेल ज्या योनीत असेल अथवा योनी धारण करायची असेल अशाही अवस्थेतून त्याला पुन्हा आणून पुन्हा पुन्हा पाहिजे तसे कार्य त्याच्याकडून करून घेता येते. हेच ज्ञानेश्वरांनी नावनाथांच्या काळानंतर करून दाखवून दिले. थोडक्यात काय तर जीव जोपर्यंत मुक्त होत नाही, तो जोपर्यंत परमात्म्याशी एकरूप होत नाही परमात्म्यात तो विलीन होत नाही तोपर्यंत हे सर्व शक्य आहे

          पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात घडलेला एक प्रकार सांगतो

पंढरपूर म्हणजे नरेन्द्रनाथांचे आजोळ. म्हणजे आईचे, आई-वडील. आईचे भाऊ म्हणजे मामा हे सर्व लोक पंढरपूरला राहत असत. फार पूर्वी, नरेन्द्रनाथांची  आजी सद्गुरूंच्या दर्शनासाठी आली होती. त्यावेळी सद्गगुरूंनी तिला सांगितले होते की नरेन्द्र हाच, त्यांचा म्हणजे महाराजांचा खरा मुलगा आहे. ते म्हणाले, माझा मोठा मुलगा व बाकी सर्वे, हा सगळा लौकिक भाग आहे. पुढचे सर्व कार्य नरेन्द्रच करेल असे महाराजांनी तिला फार पूर्वी सांगितले होते. त्यामुळे आजीचा एक वेगळाच विश्वास नरेंद्रवर होता.

          परंतु हे आजीने नरेन्द्रला फार उशिरा सांगितले. पुढे एकदा ज्यावेळेस नरेन्द्र आजोळी गेले होते त्यावेळेस तिला या गोष्टीची आठवण झाली आणि ती नरेन्द्रला म्हणाली आमच्या उभयतांचे प्रकृतीमान लक्षात घेऊन आमच्या उत्तरार्धातील आयुष्य लक्षात घेऊन आम्ही काय करावे ते सांग. नरेन्द्रने तिला सांगितले, मी मंत्र सांगतो, तो आजोबांना सतत म्हणायला सांग. सगळं काही ठीक होईल.

          पुढे कालांतराने त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना देवाज्ञा झाली. जो काही मंत्राचा जप त्यांनी केला त्यामुळे त्यांना शांत मृत्यू आला. त्यांना आपल्या मृत्यूची अगोदरच कल्पना आली होती. मृत्यूसमयी त्यांचे काहीच हाल झाले नाहीत आणि घरातील सर्वांनाच एकदम घाबरल्या सारखे किंवा धक्का बसला असे काहीही झाले नाही. आपल्या पाठीशी काहीतरी शक्ती आहे असे त्यांना सतत भासत होते.

          आजोबा गेल्या गेल्या आजीच्या भेटीला किंवा आजोळी नरेन्द्र जाऊ शकले नाही. ते गेले ते त्यांच्या वर्ष श्राद्धालाच. नरेन्द्रला पाहिल्यावर आजीने साहजिकच सर्व गोष्टींचा खुलासा केला. नरेन्द्रचे सर्व मामा म्हणू लागले, बाबा, म्हणजे नरेन्द्रचे  आजोबा, गेल्यापासून आजी, खोलीच्या बाहेर कधी पडलीच नाही. आज वर्ष झाले, तिची प्रकृती जपणे, शरीराची हालचाल करणे हे गरजेचे आहे. ती काहीच हालचाल करीत नाही. आमचे कोणाचेच ती ऐकत नाही. नरेन्द्र, तुझे ऐकते, तू तिला सांग म्हणजे ती काहीतरी हालचाल करू लागेल.

          आजी म्हणाली, तुझ्या आजोबा बरोबर जन्म घालविला, आता त्यांना जाऊन एक वर्ष झाले. पण गेल्यापासून ते, स्वप्नातदेखील दिसले नाहीत. गेले ते मला मागे सोडून गेले. मला एकदा तरी त्यांना दाखव.

          नरेन्द्र म्हणाला तुलाच काय, मी सगळ्यांनाच बाबा दाखवितो. सगळे जण आजोबांना पाहू शकतील आणि जी काही प्रचिती घडेल ती संयम ठेवला तर पाहायला मिळेल. आजी म्हणाली, केव्हा दाखवतो आम्हाला. नरेन्द्र म्हणाला आज संध्याकाळी. पण जिथे ते दिसतील तिथे तुला यावे लागेल. ती म्हणाली माझा तुझ्यावर आणि तुझ्या गुरूंवर विश्वास आहे. तू नक्की दाखवू शकतो.

     तिला म्हटले संघ्याकाळी चंद्रभागेच्या वाळवंटात तुम्हा सर्वांनाच ते प्रत्यक्ष उभे असलेले दाखवितो. संघ्याकाळी, महाराजांच्या भजनाचा कार्यकम आपण करू त्यावेळी मी तुम्हा सर्वांना ते उभे असलेले दाखवितो.    

     सांगितल्याप्रमाणे संघ्याकाळी आम्ही सर्व लोक चंद्रभागेच्या वाळवंटात गेलो. बसण्यापुरती वाळवंटाची जागा साफ केली. भाजनासाठी महाराजांचा फोटो ठेवायचा म्हणून वाळवंटावर सतरंजी घातली. सतरंजीवर एक आसन टाकलं. आसनावर स्टूल ठेवला. स्टूलावर पुन्हा आसन घालून त्यावर महाराजांचा फोटो ठेवला. सर्वांनी मिळून स्वानंद सुधेच सांप्रदायिक भजन केले, आरती केली. आरतीला सुरुवात होताच सगळ्यांनी व्यक्तिगत रूपाने प्रत्यक्ष आजोबा उभे असलेले पाहिले आणि आरतीनंतर कृतकृत्य झाल्यासारखे घरी परत जाऊ लागले. थोडे दूर गेले असतील तोच, नरेंद्राने त्या सर्वांना ओरडून ओरडून हाक मारल्या. पण हाक त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हती.

          घरी परत जायचे म्हणून फोटो काढला, आसन काढले, स्टूल काढला, स्टूलाच्या खालचे आसन काढले, सतरंजीची घडी घालण्यासाठी सतरंजी एका बाजूने उचलली. ज्या ठिकाणी स्टूल होता त्या ठिकाणी महाराजांच्या पादुकांचे दोन ठसे व त्यावर न दबलेली ताजी फुलं, जणू नुकतेच ठेवली आहेत अशी आम्ही सर्वांनी त्या चंद्रभागेच्या वळवंटावर पाहिली. त्यावेळी आम्ही तीन-चार जणच शिल्लक राहिले होतो. बाकीचे सर्व निघून गेले होते. सगळ्यांनी दर्शन घेतले आणि घरी गेल्यावर ज्यावेळी सर्वांना हे कळाले त्यावेळी सर्वांनाच हळहळ वाटली.

          नरेंद्रचे आजी आजोबा हे काही व्यंकटनाथांचे शिष्य नव्हते. परंतु नरेंद्रची इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरूंनी वर्षापूर्वी गेलेल्या आत्म्याला सर्वांसमोर उभे केले, सर्वांनी त्यांना पाहिले. जणू ते प्रत्यक्ष उभे आहेत असेच सर्वांना वाटले.  केवढे हे विशेष आहे. सद्गुरूंनी आपला शिष्य नसलेल्या आत्म्याला मेल्या नंतर 1 वर्षांनी प्रत्यक्ष उभे केले होते. हेच ह्या नाथपंथाचे विशेष आहे.  

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi