पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 150

व्यंकटनाथ महाराजांनी केवळ नरेंद्रच्या इच्छेसाठी  त्याच्या आजोबाला सर्वांसमोर जिवंत उभे दाखवले. जालिंदर नाथांनी देखील आपला शिष्य राजा गोपीचंद यांच्या इच्छे खातर,त्याच्या बहिणीला अग्निसंस्कार  झाल्यावर,पुन्हा त्याच देहानिशी जिवंत केले आणि  ती तिचा  उर्वरित संसार करू लागली 
नाथपंथ

स्मशानात राख झालेले प्रेत जीवंत केले

गतप्राण झालेल्या जीवाला नाथांनी पुन्हा त्याच देहांनिशी जिवंत केले ते देखील, काही कालावधीनंतर मेलेल्या जीवाला ,ज्याचे शरीर पंचतत्वात विलीन झाले आहे त्याला, पुन्हा त्याच देहांशी जिवंत करणे असे इतिहासात दुसरे उदाहरण नाही.

     व्यंकटनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने मेलेल्या जीवाला ज्याचा अग्निसंस्कार झाला आहे शरीराची रख झालेली आहे व ती देखील अस्तीसह विसर्जित केलेली आहे, त्या जीवाला त्याच शरीराने सर्वांसमोर उभे केले आणि सर्वांनी ते प्रत्यक्ष उभे असलेले पाहिले.

  नाथ संप्रदायाचे हे वैशिष्ट्य त्यांचे पंचमहाभूतांवर आणि ब्रम्हांड तत्त्वांवर प्रभुत्व असल्याचे दाखवते.

     हे प्रभुत्व नाथांनी अजून वेगळ्या पद्धतीने समाजापुढे ठेवले आहे ते केवळ एवढ्यासाठीच की नाथांना सर्वच शक्य  आहे, अशक्य काहीच नाही. त्यांच्या मनात येईल ते, ते प्रत्यक्षात घडवून दाखवतात.

        जर नाथांच्या शिकवणुकीवर त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून श्रद्धा, भक्तीयुक्त  अंतःकरणाने  जीवनाचा क्रम ठेवला तर निश्चितच त्या जीवाचा उद्धार होईल. तो असंख्य तऱ्हेने  कष्टप्रद जीवनातून मुक्त होऊन, सुखावह जीवन जगू  शकेल. ज्यांना शुद्ध अंतकरणाने भक्ती भावाने त्यांची सेवा करणे जमत नसेल त्यांनी शुद्ध मनाने शंका कुशंका न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून जर जीवन क्रम ठेवला तरी त्याच्या जीवनाचा उद्धार होईल.

     व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रने गुरुवर दाखवलेल्या श्रद्धेमुळे पूर्ण विश्वासामुळे  केवळ नरेंद्रच्या इच्छेसाठी त्याच्या  आजोबाला सर्वांसमोर जिवंत उभे दाखवले.

   जालिंदर नाथांनी देखील आपला शिष्य राजा गोपीचंद यांच्या इच्छे खातर, त्याची गुरुवर असलेली अपार श्रद्धा लक्षात घेऊन. गोपीचंदाच्या बहिणीला अग्निसंस्कार झाल्यावर, पुन्हा त्याच देहानिशी जिवंत केले आणि त्यानंतर ती तिचा उर्वरित संसार करू लागली 

     अशक्य ते तुम्हा नाही नारायणा हे जे म्हणतात ते हे नवनाथ म्हणजे नारायणाचेच  पार्षद ,यांनी ही युक्ती खरी करून दाखवली

       प्रत्यक्ष जीवनात घडलेली ही घटना अनेक तऱ्हेने त्याचे ज्ञान आपल्याला देऊन जाते. नाथ पंथातील गोपीचंदराजाचे हे कथानक आपल्याला अनेक तऱ्हेचे ज्ञान देऊन जाते.

गोपीचंद राजा, गुरुच्या आज्ञेनुसार बद्रिकाश्रमास तपश्‍चर्या करण्यासाठी निघाला तो वाटेने जातांना गुरूंनी सांगितल्या प्रमाणे भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत होता. राजा जोगी झाल्याची बातमी ऐकूनलोक हळहळत होते. जेथे तो जाई तेथे लोक त्याला आस्थेने वागवीत असत. त्याला राहण्याविषयी आग्रह करीत असत.परंतु त्याला कशाचेही प्रलोभन नव्हते. तो सर्वांकडे दुर्लक्ष करून पुढेपुढे जात असे. भिक्षा मागत मागत तो गौडबंगाल वरून कौलबंगालास गेला. तेथे पौलपट्टन नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती. तेथील तिलकचंद राजा तिचा सासरा होता तो गोपीचंदाप्रमाणेच वैभव संपन्न होता. मोठ्याराजघराण्यामधली चंपावती सून होती. ती नणंद, जावा, दीर यांना सन्मान देवून राहत असे. तिचे सासू सासरेही मोठे प्रबळ होते.

गोपीचंदाची हकीकत समजली तेव्हा ते सर्वजण गोपीचंदाला नांवे ठेवू लागले. ते म्हणू लागले गोपीचंद भ्याड आहे. राज्याचा त्याग करुन भीक मागणे बरे नाही. क्षत्रिय कुळात जन्म घेउन भीक मागणयापेक्षा मरण उत्तम. याने जन्माला येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले. कुळाला काळिमा मात्र लावला याने आमच्या तोंडालाही काळे ङ्गासले. लोकांमध्ये आमची पण फजीती केली आता स्वतः काळे तोंड घेवून फिरत आहे त्यापेक्षा हा जन्मतःच मेला असता तरी चांगले झाले असते.

अशा प्रकारची पुष्कळ वाईट बोलणी ऐकून चंपावतीला फार वाईट वाटू लागले नणंद, जावा तिला असे बोलू लागल्या.

इकडे गोपीचंद फिरत फिरत त्याच नगरात आला आणि हरी गोविंदाचे गुण गाऊ लागला. तो गोसावी झाला होता तरीही मोठा तेजस्वी दिसत होता. चंपावतीच्या काही दासी अकस्मात तेथे गेल्या. त्यांनी त्याला ओळखले आणि त्यांनी घरी जाऊन ही बातमी प्रथम चंपावतीला सांगितली. घरांत तिलकचंद राजा व बाकी सर्व जण वाटेल तसे बोलू लागले. तिकचंद राजा म्हणाला आता गडबड करुन काय उपयोग.तो घरोघर भीक मागेल व हा आपला अमुक अमुक म्हणून लोक म्हणतील व त्यामुळे आपला दुर्लौकिक होईल. त्याला गावात आणून अश्वशाळेत ठेवावा तेथे त्याला जेवायला घालून त्याला गावातून बाहेर पाठवावे म्हणजे आपला दुर्लौकिक होणार नाही.

राजाच्या या योजनेनंतर दासींनी गोपीचंदाला जावून सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी राजाने तुम्हाला बोलावले आहे.

हे ऐकून गोपिचंद म्हणाला, ‘आम्ही गोसावी झालो आहोत, आम्हाला जगातील लोक हे आई बाप, बहीण, भावासारखे आहेत. तरीपण तो चंपावतीला भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या बरोबर गेला . घरी नेल्यावर गोपिचंदाला भीक मागतो म्हणून अश्वशाळेत नेऊन बसविले. त्याला राजवाड्यात नेलेच नाही. ज्याला आज पर्यंत राज सन्मान दिला जात होता त्याला अश्वशाळेत ठेवून जेवण देखील तेथेच दिले. चंपावतीची भेट झालीच नाही, ती नंतर भेटायला येईल म्हणून सांगितले.

एर्‍हवी गोपीचंदाला ही वागणूक अपमानास्पद वाटली असती. पण आपण आता बैरागी झालो आहोत, आपल्याला शत्रुमित्र सारेच सारखे आहेत. अन्न हे परब्रह्म आहे, अन्नाचा अवमान करू नये अशा विचारांनी तो अश्वशाळेतच आनंदाने भोजन करु लागला.

गोपीचंदराजा अश्वशाळेत जेवायला बसला म्हणून त्याला राजवाड्यातील स्त्रिया व इतर सर्वच पाहू लागले. हे सर्व चंपावतीस मुद्दामून आणून दाखविले. गोपिचंदराजा, निर्लज्जपणे सोयर्‍याकडे अश्वशाळेत भोजन करीत बसला म्हणून चंपावतीला सर्वचजण बोलु लागले. तिच्या तोंडावर त्याची खूपच निंदा केली त्यामुळे ती पार दुःखी झाली. परिणामतः तिने आपल्या जिवावर उदार होउन, पोटात खंजीर खुपसून घेऊन आपला देह त्याग केला.

गोपीचंदाने दासींना चंपावतीला भेटायला आणायला सांगितले पण त्यांनी तिला आणले नाही. आम्ही तिला रात्री घेउन येउ व तुम्हास भेटवू. तुम्ही आता उद्या जावे असे सांगितले.

ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल या आशेवर त्याने राहाण्याचे कबूल केले. मग दासी तेथून राजवाडयात गेल्या व चंपावतीला पाहू लागल्या. पण त्यांना तिचा मृतदेहच दिसला. हे पाहून त्या हतबुद्ध झाल्या. त्यांनी ही गोष्ट लगेच सर्वांना सांगितली तेव्हा घरची सगळी मंडळी घाबरुन गेली. तिला पाहून सर्वांनी रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले व तिच्या भावास, गोपिचंदास, शिव्या देऊ लागले भावामुळे चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व नगरात पसरली.

राजवाडयात चाललेली रडारड, गोंधळ ऐकून गोपीचंदाने अश्वरक्षकांना काय चालू आहे म्हणून विचारले. आपला भाऊ, गौडबंगालाचा राजा गोपीचंद, राज्य सोडून बैरागी झाला आणि गावोगावी भीक मागत फिरत आहे ह्या दुःखामुळे, चंपावतीने पोटात खंजीर खुपसून जीव दिला असे त्याला कळले.

हे ऐकून गोपीचंदाला खूपच वाईट वाटले. माझ्यामुळे येथे अनर्थ घडला म्हणून त्याला अतीशय वाईट वाटले.

चंपावतीचे प्रेत दहन झाले तर जगात माझी व नाथपंथाची अपकिर्ती होईल म्हणून बहिणीचे प्रेत उठवावे व आपल्या सामर्थ्याचा प्रताप प्रत्यक्षच दाखवावा असे गोपिचंदाच्या मनात आले. ह्यांना नाथपंथाचा तडाखा दाखवायचा असे त्याने ठरविले.

म्हणून तो स्मशानात गेला प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला मी सांगतो ते कृपा करुन ऐका तुम्ही प्रेत दहन करु नका मी माझ्या गुरुला जालिंदरनाथाला आणून प्रेत उठवतो. मी येथे असता बहिणीचे प्राण वाया जाउ दिले तर नाथपंथाचे सामर्थ्य कसे कळेल.

परंतु त्याच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही उलट त्याची ते चेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होतच नाही. गोपीचंद म्हणाला, माझ्या गुरुचे सामर्थ्य एवढे आहे की ते काहीही कर शकतात.त्यांची किर्ती वर्णन करता करता कोणीही थकून जाईल. माझ्या गुरूने आपला शिष्य कानिफनाथा साठी सर्व देव पृथ्वीवर खंचून आणाले.मी स्वतःत्याला घोडयाच्या लिदीत, खोल खड्डयांत पुरुन टाकले होते. तो त्या खड्डयातून तब्बल अकरा वर्षानंतर बाहेर निघाला. तो पुरला त्यावेळी जसा होता त्यापेक्षा बाहेर आल्यावर जास्त चागला होता. त्याचा शिष्य कानिफनाथ आला होता त्यानेच त्याला काढले. तुम्ही फक्त्त चार दिवस प्रेत ठेवा मी गुरु जालिंदरनाथांना आणून बहिणीला जीवंत उठवितो.

पण त्याच्या बोलण्यावर कुणाचाच विेशास बसत नव्हता. कोणीही हे मान्य करीत नव्हते. प्रेत चितेवर ठेवले आणि ते पेटविणाार इतक्यात गोपीचंद चितेवर बसून म्हणू लागला, मलाही भस्म करून टाका माझे भास्म झाल्या शिवाय जालिंदरनाथांचा कोप तुम्हाला कळणार नाही. माझे भस्म झाले तर तो हे संपूर्ण नगर पालथे घालून तुम्हा सर्वांची राखरांगोळी करून टाकली.

गोपीचंदाचे हे बोलणे ऐकून तिलकचंद रागाने म्हणाला गुरुच्या सामर्थ्याची एवढी पौढी गातो आहेस, एवढा त्यांच्यावर विेशास आहे, तर आम्हाला चंपावतीला जिवंत करून दाखव. आम्ही चार दिवस वाट पाहतो.

मग प्रेत उठविण्यासाठी प्रेताचा डावा हात काढून, गोपिचंदा जवळ दिला. तो घेवून गोपीचंद गुरूला आणण्यासाठी गौडबंगालला जायला निघाला. तो बराच लांब गेल्यावर, लोकांनी ते प्रेत दहन करून टाकले.

गोपीचंद सुमारे पाच कोस गेला असेल नसेल इतक्या अवधीत हा सर्व प्रकार जालिंदरनाथांच्या लक्षात आला. गोपीचंद जर आला तर घोटाळा होईल म्हणून, जालंदरनाथ स्वतः तिकडे जायला निघाले. निघतांना त्याने प्रयाणास्त्राची विभूती कपाळाला लावली पृथ्वीवर नैषध राजपुत्रावाचून त्या अस्त्राची कोणाला माहिती नव्हती. हे अस्त्र जालिंदरास मिळाले होते. त्याची विभूती कपाळाला लावल्या बरोबर क्षणार्धात तो शंभर कोस पोहोचला व गोपीचंदाला भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालिंदरनाथांचे दर्शन घेवून, सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून चंपावतीस उठविण्याचे गुरुने आशवासन दिले आणि त्याच्यासह पौलपट्‌टणातील राजवाड्यात तो आला. तिथे सर्व लोक शोक करीत होते.

राजवाड्यात, जालिंदरनाथांना पाहताच राजा तिलकचंद पुढे झाला. त्याने जालिंदरनाथाचे स्वागत केले व त्यांच्या पाया पडून त्याना कनकासनावर बसविले. स्वतः त्यांच्या पुढे नम्रपणे उभा राहिला. तिलकचंद राजाच्या वागण्यातला उथळपणा जालिंदरनाथांच्या पूर्णपणे लक्षांत आला. जालिंदर म्हणाला राजा चंपावती या घरात लुप्त झाली. हे या घराला शोभत नाही. तिलकचंदाला यामुळे भावनिक जाणीव झाली. जालिंदरनाथांनी गोपीचंदाकडून तिचा हात मागून घेतला.त्यावर संजीवनी मंत्र म्हणून भस्म त्या भुजाला लावले आणि चंपावतीला हाक मारली. हाक मारताच, चंपावती लगेचच पूर्वीच्याच शरिराने समोर आली व जालिंदरनाथाच्या पाया पडली. हे केवळ नाथांनाच शक्य होते, इतर कोणीही केल्याची उदाहरणे नाहीत.

केव्हढे अचाट सामर्थ्य या नाथपंथियांनी मिळविलेले होते. चिता जळून राख झालेल्या व्यक्तिला केवळ तुटलेल्या हातावर संजीवन प्रयोग करून त्याच शरीराने प्रत्यक्ष समोर जिवंत ऊभे केले.

हे पाहून सर्व उपस्थित मंडळी नम्रतेने नाथांच्या पाया पडली. पण त्यांच्या वागण्यात पश्चात्ताप दिसत नव्हता. त्यांना विशेष महत्त्व वाटले असे जाणवले नाही म्हणून जालिंदरनाथ उठून जायला निघाले. तेव्हा तिलकचंद राजा भानावर आला व पुनःपुन्हा त्याच्या पाया पडू लागला, त्यांना प्रार्थना करू लागला व म्हणाला महाराज मी पतित आहे. राज्यवैभवाने उन्मत्त होऊन मी गोपीचंदाला क्षुद्र मानले, त्याला हिणविले. पण आता आपण माझ्या गैरवर्तणूकिची मला क्षमा करावी. मी आपल्या शिष्याचा अपमान केला आहे पर्यायाने तो आपलाच अपमान केला आहे,

आपण या बालकाचे आपराध पोटात घालावे, मला क्षमा करावी व आपली कृपा माझ्यावर करावी. असे बोलून त्याने नाथाच्या पायावर वारंवार मस्तक ठेविले व क्षमा प्रार्थना केली. नाथ महाराजांना घरी राहण्याची तो प्रार्थना करु लागला. तिलोकचंदाचा पश्चात्ताप पाहून, त्याचा आग्रह पाहून जालिंदरनाथाने तेथे एक रात्र राहण्याचे ठरविले. जालिंदराच्या आज्ञेप्रमाणे तिलकचंदान चंपावती कडून स्वयंपाक करविला. तिला तिच्या भावासह आपल्या पंक्तीस जेवायला बसविले.नंतर जालिंदरनाथांनी तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले व आपले उच्छिष्ट देऊन तिला अमर केले.

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi