पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 126

आपले योग,भोग,प्रारब्ध हे कर्माच्या माध्यमातून सहज बदलता येतात. प्रवाह पतीतासारखे जीवन घालवणे हे कर्महीन माणसाच्या बाबतीत शक्य आहे. मी माझे दैनंदीन जीवन कर्माच्या माध्यमातून उन्नत करू शकतो ह्याची जाणीव झाल्यावर किंवा गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्यावर जीवनातील योग,भोग,प्रारब्ध हे सर्व बदलू लागतात.
कर्माच्या माध्यमातून योग भोग बदलण्याच मार्गदर्शन नाथ शक्तिपिठातून होते

09-06-22         ☼ आपले प्रारब्ध काय आहे? ☼     जीवाचा भोग, प्रारब्ध

 प्रारब्ध ह्याचा अर्थ जे जन्मोजन्मीचे संचित कर्मफळ आहे ते. गर्भ ज्या वेळी प्रस्थापित होतो त्याच वेळी त्या गर्भात सूक्ष्मरूपाने पिंड असतो. जे गुणदोष, सुख, शांती, समाधान, कष्टप्रद जीवन आदी योग आई-वडिलांचे असतात. तेच व तेवढेच योग बालकांचे असतात असे नाही, तर त्यांचे जे जन्मोजन्मीचे संचित कर्मफळ आहे त्याप्रमाणे ते प्रस्थापित होते.

आपल्या जीवनातल्या आपल्या चित्तवृत्ती- प्रवृत्तीमध्ये बदल करणे हे सोपे नाही, किंबहुना ते तर केवळ अशक्यच आहे. आपले योग, भोग, प्रारब्ध बदलणे हे केवळ अशक्य आहे. जे योग, भोग आपल्या वाट्याला आले आहेत ते भोगावेच लागतात. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात ‘काय करणार, हेच तर माझं नशीब आहे. माझं हे नशीब बदलणं शक्य नाही. काय करणार, माझा हा जन्म असाच जाणार,’ असे म्हणत राहतो.

वाल्या कोळ्याचा जीवनप्रवाह प्रारब्धाप्रमाणे सुरू झाला होता. त्रिकालज्ञानी ब्रह्मर्षी नारदमुनी मध्ये पडले आणि स्वत:हून ब्राह्मणाचा वेष घेऊन वाल्या कोळ्याला त्याचे पूर्वसंचित लक्षात घेऊन त्याला भेटून, त्याला विवेक आणि ज्ञान दिले आणि पुढील कुकर्मापासून वाचविले. एवढेच नाही, तर त्याच्यावर कृपा करून त्याला आत्मज्ञानी केले आणि अलौकिक कार्य त्याच्याकडून करवून घेतले. हा त्याचा दैवयोग होता.

माणसाचे असले योग, भोग सहसा टळत नाहीत. ‘प्रारब्ध माझे सहसा टळेना’ ह्याची अनुभूती प्रत्येक जण घेत असतो. तो आपले दुःख वा भोग दाखवीत नाही, पण मनाने त्यातच तो गुरफटलेला असतो. यातून त्याला बाहेर पडता येत नाही. त्याचे दैनंदिन जीवन त्या प्रारब्धासह सुरू असते आणि त्यानुसारच ते संपते.

    माणसाचे आचारविचार, स्वभाव, योग, भोग- हे सर्व त्याने केलेल्या पूर्वजन्मीच्या कृतींशी, कर्मांशी प्रत्यक्षरीत्या संबंधित असतात. श्रीसमर्थ रामदास स्वामींनी तर म्हटलेच आहे की, ‘अनंत जन्मींचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे| मुख्य परमात्मा आतुडे तद्नंतरे|’ म्हणजे ह्याच एका जन्मातल्या आपल्या कृतींनी वा कर्मांनी आपले पूर्वसंचित तथा पूर्ण व्यक्तिमत्त्व बदलणे शक्यच नाही. आपले आचारविचार, स्वभाव आदी बदलणे अतिशय धीम्या गतीने होत असून, अनेक जन्म घालविल्यानंतर आपल्या आचारविचार, प्रारब्धात बदल होऊ शकेल. आपण कल्पना करतो व अपेक्षा बाळगतो, की ह्याच जन्मात आपण हर प्रयत्न करून सर्वकाही बदलून टाकू. पण हे केवळ अशक्य आहे. आपली विचारसरणी, आपले आचार, आपली स्वाभाविक प्रवृत्ती हे कितीही प्रयत्न केले तरी एका जन्मात बदलू शकत नाहीत. स्वभावात बदल होत नाही. विचारांत बदल होत नाही म्हणून तर जीवनात अनेक वेळा अप्रिय घटना घडतात. आपल्या विकासाला मर्यादा येतात. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,

    हे आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच प्रत्येक जन्मात थोडा थोडा बदल होत होत केव्हातरी तो जीव पूर्णपणे सदाचारी, सद्प्रवृत्त, सात्त्विक, अध्यात्मप्रवण असा पुण्यात्मा जन्माला येतो. म्हणजेच अनेक जन्मांचे सुकृत जमा करीत करीत केव्हातरी असा माणूस जन्माला येऊ शकतो. त्यानंतर तो जसे प्रयत्न करेल त्याप्रमाणे त्याला ईश्वरी कृपेचा परमलाभ घेता येईल. ‘ह्याचि देहीं ह्याचि डोळां, झालो मी परमेश्वर वेडावेल्हाळा,’ हे तर केवळ अशक्य आहे. समाजामध्ये अनेक लोक स्वत:ला आध्यात्मिक, सामर्थ्यसंपन्न भासवितात. अनेक प्रकारचे चमत्कार करून दाखवितात. पण ही मंडळी पूर्णपणे सदाचारी, सद्प्रवृत्त, सात्त्विक, अध्यात्मप्रवण असा पुण्यात्मा घडवू शकत नाहीत. मानवी जीवनात आपले शरीर तथा आपले मन हे दिनप्रतिदिन कसे विकसित होते, कसे घडते, कशामुळे घडते किंवा बिघडते, हे आपल्याला कळतही नाही. दिनप्रतिदिन करीत करीत आपला जीव देहत्यागापर्यंत कसा पोचला, आपल्या जिवात काय परिवर्तन झाले, हे आपलेच आपल्याला कळतदेखील नाही. केवळ भौतिक प्रगती व भौतिक आनंदावरच आपण आपल्या जीवनाचे मूल्यमापन करतो.

    आयुष्यभर आपला समज हाच राहतो, की मी माझ्या जीवनाला आकार देतो, मी प्रयत्न करून ते घडवितो. माझ्या जीवनात होणारे सर्व बदल मीच करतो. पण माझे शरीर कसे चालते? कोणाच्या सत्तेने चालते? कोणाच्या प्रभावाखाली ते सतत असते? कोणत्या तरी अज्ञात प्रभावाच्या आपल्यावर होणार्‍या परिणामाप्रमाणेच ते चालते, ह्याचा आपण कधी विचारही करीत नाही.

     तुकाराम महाराज ह्या बाबतीत म्हणतात, ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्तें, कोण बोलविते हरीविण | देखवी, दाखवी एक नारायण | तयाचे भजन चुको नये|’ आजच्याही विद्वज्जनांना न सुटणारी कोडी तुकाराम महाराजांनी अति सहजतेने सोडविली आहेत. पण आपल्याला वाटणार्‍या आजच्या प्रगत युगात आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीचे विस्मरण झाले आहे. आपल्याला त्याचे एवढे महत्त्व वाटत नाही. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फारच भौतिक झाला आहे. आध्यात्मिक पद्धतीने आपले जीवन सुसह्य होऊ शकते, हे आपण सहजतेने विसरायला तयार आहोत. जीवाचा त्याग करेपर्यंत मानसिक समाधान, आत्मिक समाधान मिळण्यासाठी जीव नुसता तडफडत असतो; पण ते न मिळताच आयुष्याचा कालावधी संपतो. ह्याची जाणीव ही ज्याची त्यालाच असते. इतर लोक निर्वाणानंतर त्याचे केवळ गुणगान करीत असतात.

    आपल्या जीवनात अनेक तर्‍हेच्या प्रारब्धाचे, भोगाचे अनुभव आपण सहजतेने घेतो. आपल्याला बर्‍याच वेळा ह्या गोष्टी कळतात, जाणवतात, परंतु त्याचा योग्य अर्थ काढायला आपण पुरेसा वेळ देत नाही, विचार करीत नाही व समजून घेण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करीत नाही किंवा बर्‍याच वेळा काय उपाय करावे, हे कळतच नाही. शेवटी हा आपला योग, हेच आपले नशीब, हेच माझे प्रारब्ध- जे कधी बदलणार नाही, असे मानून आपण ह्या बाबतीत निष्क्रिय होतो.

     आपले योग,भोग,प्रारब्ध हे कर्माच्या माध्यमातून सहज बदलता येतात. प्रवाह पतीतासारखे जीवन घालवणे हे कर्महीन माणसाच्या बाबतीत शक्य आहे. मी माझे दैनंदीन जीवन कर्माच्या माध्यमातून उन्नत करू शकतो ह्याची जाणीव झाल्यावर किंवा गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्यावर जीवनातील योग,भोग,प्रारब्ध हे सर्व बदलू लागतात आणि जीवन उन्नत होऊ लागते. ह्याची अनुभूती सदगुरूंचे सर्व शिष्य घेत असतात.

अनुभवाविन ज्ञान नसे हो , अनुभव हाच गुरू । त्यास्तव योगी व्यंकटनाथा आपण नित्य स्मरूं – ।। 1

कसा सांगु मी अनुभव ज्याचा, त्याने तो घ्यावा । जन्मा येउनि शुष्क राहणे मार्ग न हा बरवा.- ।।   2

Leave a Reply