पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 127

नाथपंथामध्ये नाथांच्या दर्शनाला जायला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा अथवा बंधनं नसतात. नाथांचे द्वार हे भक्तांसाठी सदैव उघडे राहायला पाहिजे. नाथांनी आपल्या इच्छेनुरूप पाहिजे तसे नियम ठेवणे योग्य नाही हे मच्छिंद्रनाथांनी दाखवून दिले,

10-06-22 नाथांचे द्वार दर्शनासाठी सदैव उघडे राहील

             देवाचं  द्वार भक्ताला सदैव उघडे असावे.  कोणीही केव्हाही देवाच  दर्शन घेऊ शकला पाहिजे. भक्ताला देवदर्शनाला जायला कोणत्याही प्रकारचा मज्जाव नसतो.

             त्याच प्रमाणे नाथपंथामध्ये देखील नाथांच्या दर्शनाला जायला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा अथवा बंधनं नसतात. नाथांचे द्वार हे भक्तांसाठी सदैव उघडे राहायला पाहिजे. नाथांनी आपल्या इच्छेनुरूप पाहिजे तसे नियम ठेवणे योग्य नाही हे मच्छिंद्रनाथांनी दाखवून दिले, आणि नगनाथांना दर्शनार्थींना द्वार सदैव उघडे ठेवण्यास सांगितले. हीच पंथाची शिस्त आहे असे सांगितले.  

                भक्ताला जे काही कथन करायचं असेल ते देवाजवळ किंवा नाथांजवळ दर्शन घेऊन सांगण्यास कोणतेही बंधन नाहीत. दोघांचेही हे कार्य आहे की दर्शनार्थीला पाहिजे तेव्हा येऊ द्याव आणि त्याचं मनोगत त्याला पाहिजे त्या पद्धतीने सांगता यावं.

                मच्छिंद्रनाथांनी नाथपंथात हा नियम शिकवण्यासाठी कसे प्रयास घेतले ते पहा.

              नागनाथ म्हणजेच अविर्होत्र नारायणाचा अवतार आहे.हे जाणून शंकराने त्याला नाथ पंथाची दीक्षा द्या असे दत्तात्रेयांना सांगितले, दत्तात्रेयाने ते लगेच कबूल केले. नंतर नागनाथासह दत्तात्रेय सहा महिने एकत्र  राहिले. त्या सहा महिन्यांत नाथाला सर्व विद्येत आणि चौसष्ट कलातही दत्तात्रेयाने निष्णात केले. मग दत्तात्रेयाने सर्व शस्त्रास्त्र विद्यातही त्याला निपुण केले व नंतर बद्रिकाश्रमात नेऊन तपश्‍चर्येला बसविले त्याला नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्षे तप केले. मग सर्व देवांनी त्याला अनेक वर दिले.

          हे झाल्यावर सर्व जण आपापल्या स्थानी परत गेले. नंतर दत्तात्रेयाने नाथाला तीर्थयात्रेला जाण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नागनाथ दत्तात्रेयाच्या पाया पडून लगेच तीर्थयात्रेस निघाला. दत्तात्रेयही गिरनार पर्वतावर निघून गेले.

          नागनाथ तीर्थयात्रा करीत करीत बाले घाटास पोहोचला तेथे तो अरण्यात राहिला. निरनिराळया गावातील लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. त्या लोकांनी त्याला तेथे राहाण्याचा आग्रह केला आणि अनेक लोकही तिथे येऊन राहिले, त्या वस्तीचे नांव वडवळ असे ठेवले. एक दिवस मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत वडवळ गावी आले.

          गावात आल्यावर नागनाथाची किर्ती ऐकून ते नाथाच्या दर्शनाला गेले. परंतु शिष्यांनी दारातच त्याला आत जाण्यास मनाई केली. ते म्हणाले,‘‘नाथबाबा पुढे जाऊ नका. आम्ही आधी आत जाऊन सांगतो व मग तुम्हाला दर्शन घडवतो. त्याच्या परवानगी शिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही.

          शिष्याचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला राग आला. देवाच्या किंवा साधूच्या दर्शनाला जायला परवानगी कशाला पाहिजे. मच्छिंद्रनाथाने रागाने एकदम त्या शिष्यांच्या थोबाडीत मारल्या त्याबरोबर दुसरे सातशे शिष्य पहिल्याच्या मदतीला आले. परंतु त्या सर्वांना मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्राच्या साह्याने जमिनीला चिकटवून टाकले व सगळ्यांनाच तो थोबाडीत मारू लागला. तेव्हा त्यांनी रडून-ओरडून आकांत केला.

          नागनाथ मठामध्ये ध्यान लावून बसला होता. ही गडबड ऐकून तो बाहेर आला. ध्यानात विघ्न आल्यावर नागनाथाला फार राग आला होता त्यातून त्याने शिष्याची अवस्था समक्षच पाहिली. मच्छिंद्रनाथ त्यांना थोबाडीत मारत होता हेही त्याने पाहिले.

          तेव्हा त्याने प्रथम गरुडबंधनविद्या जपून स्वर्गात गरुडाचे बंधन केले व नंतर विभक्तास्त्राच्या साह्याने आपल्या शिष्यांना मुक्त केले. शिष्य मुक्त होताच ते नागनाथाच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. त्या सर्वांचे चूर्ण करण्याचा विचार मच्छिंद्रनाथाच्या मनात आला. त्याने लगेच पर्वतास्त्राची योजना केली नागनाथाने वज्रास्त्राचा जप केला म्हणून त्या दोघांनी परस्परांवर विविध अस्त्रांचे प्रयोग केले. शेवटी नागनाथाने सर्पास्त्राची योजना करुन मोठमोठे सर्प उत्पन्न केले. ते सर्प मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली. परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथाच्या गरुडास्त्राचा प्रभाव नाहीसा झाला.

          सर्पाच्या दंशांनी मच्छिंद्रनाथास अगदी मरणोन्मुख करून टाकले. शेवटी त्याने गुरूचे स्मरण केले. ‘‘हे देवा दत्तात्रेया आता वेळ न घालवता धावून ये.’’ मच्छिंद्रनाथाने दत्तात्रेयाचे नाव घेतल्यामुळे नागनाथास आश्‍चर्य वाटले व संशयात पडला. त्याच्या मनात आले आपल्या गुरुचे स्मरण करणारा हा कोण? कोणाचा शिष्य? मग तो मच्छिंद्राजवळ गेला आणि त्याने त्याची चौकशी केली तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नांव सांगून म्हटले माझा गुरू दत्तात्रेय, त्याचा मी शिष्य आहे. माझ्या नंतर जालिंदर मग भर्तृहरी त्यामागून रेवण. या नाथपंथाच्या आरंभीचा मीच आहे. म्हणजेच मी दत्तात्रेयाचा मोठा मुलगा आहे.’’

          मच्छिंद्रनाथाने आपली हकिगत सांगितल्यावर नागनाथाचे हृदय उचंबळून आले. त्याने लगेच गरुडाचे बंधन सोडून गरुडास्त्राचा जप केला. त्या बरोबर गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन गेले आणि विष शोषून ते अदृश्य झाले. गरुडाचे काम होताच तो दोघा नाथांना नमस्कार करून स्वर्गात परत गेला. नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला, ‘‘वडील बंधू पित्यासमान असतात. म्हणून तुम्ही मला गुरूच्या ठिकाणी आहात. मला क्षमा करावी.’’

नंतर तो त्याला मठात घेऊन गेला. मच्छिंद्रनाथ महिनाभर तिथे राहिला. एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथाला विचारले, ‘‘तू दाराशी सेवक ठेवून लोकांना आत जाण्यास प्रतिबंध का करतोस. भाविक लोक मोठ्या भक्तिभावाने दर्शनासास येतात. परंतु तुझे शिष्य त्यांना आत जाऊ देत नाहीत. त्यामुळे ते निराश होऊन परत जातात. तंटा होण्याचे मूळ कारण हेच आहे.’’

हे ऐकून नागनाथ म्हणाला, ‘‘मी निरंतर ध्यानस्थ बसतो. लोक येतात आणि माझ्या ध्यानात व्यत्यय येतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले.’’ यावर मच्छिंद्रनाथाने त्याला सांगितले, ‘‘हे चांगले नाही. लोक पावन व्हावयास आपल्याकडे येतात व ते दारातून परत जातात तेव्हा आतापासून मुक्तद्वार ठेव.’’

                     भगवान भोलेनाथांची भेट

याच संदर्भात एक प्रसंग असा घडला. नरेंद्रनाथमहाराज सी.ए. ची प्रॅक्टिस करीत असताना दिल्लीला गेले होते. तेथे काम झाल्यावर वेळ होता म्हणून भगवान भोलानाथ महाराजांच्या दर्शनासाठी गेले. तेथे गेल्यावर कळले की, त्या दिवशी ते महाराज फक्त विदेशी लोकांनाच भेटतात. भारतीयांना त्या दिवशी विना पूर्व परवानगी भेटतच नसत. तेथे गेल्यावर बाहेर फाटकावरच त्यांच्या सेवकांनी अडविले व आत जाता येणार नाही, असे म्हणाले. भोलेनाथमहाराजांना कोणी दर्शनार्थी आला आहे. एवढेच सांगितले. त्यावर त्यांनी दुसरे दिवशी येण्यास सांगितले. म्हणून त्यांना पुन्हा निरोप दिला की, ‘‘तुम्हाला आताच दर्शन द्यावे लागेल.’’ हा निरोप महाराजांकडे गेल्यावर त्यांनी दर्शनास अनुमती दिली. ज्या वेळी दर्शन झाले त्यावेळी ते स्वतः म्हणाले, ‘‘हमे जब संदेशा मिला तो पता चला की आज हमे तो दर्शन देना नही है हमे तो दर्शन लेना है . क्या आप नाथपंथी है? आपके गुरू बहूत सामर्थ्यशाली है . वे आये और हमे आपके बारेमे सबकुछ बताके चले गये.’’ त्यावर नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, ‘‘यह नाथपंथ है | किसी तरह की पाबंदी नही रखना, जो जबभी दर्शनके लिये आये तब उसे दर्शन देना, यही नाथपंथकी मर्यादा है.’’ त्यांनी ते मान्य केले. दोघांची बर्‍याच वेळ चर्चा झाली व तेथे असलेला प्रसाद त्यांनी स्वतः मागून नरेंद्रनाथांकडून घेतला व इतरांना नाथांचा प्रसाद म्हणून त्यांनी तो वाटला.

     नाथपंथाचे व्यवहार पूर्वी प्रमाणेच आजही सुरू आहेत.  

.

Leave a Reply