पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 128

रेवणनाथ म्हणाले ‘‘मी येथे असतांना यमाने हा डाव कसा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्यालाच नाहीसा करून टाकतो.’’‘‘यमधर्मा मी स्वतः सरस्वती ब्राम्हणाच्या घरी असता तू त्याच्या मुलाचा प्राण कसा घेऊन गेलास.त्यांचे पहिली सहा मुले कोठे ठेवली आहेस, सातही मुले आणून दे नाही तर युद्ध कर.’’

यमाला मारून तुझी सातही बाळे घेऊन येतो, रेवणनाथ.

          माण देशात विटे नावाच्या गावात सरस्वती नावाचा ब्राम्हण राहत होता. त्याच्या पत्नीचे नांव जान्हवी असे होते. ती अत्यंत सुंदर होती. ती दोघे एकमेकांवर अगदी गाढ प्रेम करीत. त्यांना मुले होत पण ती आठदहा दिवसच जगत असत.

          अशा तर्‍हेने त्यांचे सहा पुत्र मरण पावले आणि नंतर झालेला सातवा पुत्र दहा वर्षे जगला. त्यामुळे आता मला भय नाही, असे जाणून सरस्वती ब्राम्हणाने मोठया थाटात बारसे करून ब्राम्हण भोजन घातले.

          त्याच दिवशी गावात रेवणनाथ आला होता तो भिक्षेसाठी फिरत असता ब्राम्हणाकडे गेला. त्याला पाहताच हा कोणी तरी अवतारी पुरुष आहे असे सरस्वतीला वाटले मग तो पाया पडला आणि त्याला जेवण करून जाण्याचा आग्रह केला. रेवणनाथाने त्याला सांगितले की, आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस. तेव्हा तू आमच्या पाया पडातोस हे योग्य नाही. हे ऐकून तो म्हणाला, ‘‘या प्रसंगी जातीचा विचार न करता तपश्‍चर्येचा, विद्वतेचा विचार करणे योग्य होईल.’’               

          ब्राह्मणाचा शुध्द भाव पाहून रेवणनाथाने त्यांचे म्हणणे मान्य केले. रेवणनाथाला मोठया सन्मानाने घरात जेवायला घेऊन. खूप आग्रह करून त्याला जेवायला घातले अन्य ब्राह्मण जेवत असतांनाही हा रेवणनाथा जवळून उठला नाही. जेवण झाल्यावर तो नाथाची प्रार्थना करू लागला महाराज आज आपण माझ्याकडे वस्तीला राहा आणि उद्या जा.

          त्याचा फारच आग्रह झाल्याने व त्याची मनापासूनची इच्छा पाहून रेवणनाथ राहावयास तयार झाला. नित्यकर्म उरकून नाथ झोपला तो ब्राम्हण त्याचे पाय चेपून सेवा करू लागला.

          परंतु मध्यरात्रीच्या सुमारास आई जवळ असलेल्या त्याच्या मुलावर सटवीने झडप घालून त्याचे प्राण कासावीस केले. तेव्हा मुलाची अवस्था पाहून त्याच्या आईने घाबरुन नवर्‍याला हाक मारली तेव्हा तो तिला म्हणाला काय व्हायचे असेल ते होऊ दे. आपण पूर्वी जन्मी केलेल्या पापाची ही फळे आहेत ती आपल्याला भोगायलाच हवीत त्या पापामुळे आता सुख कसे मिळणार मी उठून आलो तर नाथांची झोप मोडली तर ते वाईट.

          तिकडे यमदूतांनी आपले पाश टाकून मुलाचे प्राण घेतले मुलगा मरण पावलेला पाहून जान्हवीने दारुण शोक केला. तिने ती संपूर्ण रात्र रडूनच काढली सकाळ झाली तेव्हा नाथाला हुंदक्याचा आवाज ऐकू आला. तो ऐकून त्याने कोण रडत आहे म्हणून विचारले तेव्हा तो अति दुःखाने म्हणाला, ‘‘मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणून माझी बायको अज्ञानाने रडत आहे.’’

          हे ऐकून नाथ म्हणाले, ‘‘तुझ्या मुलाला माझ्या जवळ घेऊन ये.’’ तेव्हा सरस्वती आपल्या पत्नीजवळ गेला असतांना त्याला पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले. नाथाला ही गोष्ट सांगताच त्याला यमाचा राग आली. त्या रागाच्या भरातच तो म्हणाला, ‘‘मी येथे असतांना यमाने हा डाव कसा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्यालाच नाहीसा करून टाकतो.’’

          मग त्याने मुलाला जवळ आणण्यास सांगितले, ‘‘सरस्वतीने मुलाला आणून नाथासमोर ठेवले. त्या बालकाचे प्रेत पाहून नाथाला फारच दुःख झाले तुला हा एकच मुलगा आहे काय असे नाथाने विचारले त्यावर सरस्वती म्हणाली, ‘‘महाराज हा माझा सातवा मुलगा आहे. माझी मागची सर्व मुले जन्मल्यावर पाच सात दिवसातच गेली. हाच एवढा दहा वर्षे जगला. आम्ही कमनशिबी आमचा संसार सुरळीत कुठचा व्हायला प्रारब्धात होते ते घडले. हे ऐकून रेवणनाथ सरस्वतीला धीर देऊन म्हणाला, ‘‘तू तीन दिवस या प्रेताचे नीट रक्षण करून ठेव आता मी स्वतः यमाकडे जाऊन तुझी सातही बाळे घेऊन येतो.’’

          असे सांगून नाथाने अमरमंत्र भस्म त्या मुलाच्या अंगाला लावले व व्यानास्त्राच्या साहाय्याने तो ताबडतोब यमाकडे गेला. रेवणनाथ आलेला पाहून यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्याला आपल्या आसनावर बसवून त्याने त्याची षोडशोपचारांनी पूजा केली आणि हात जोडून येण्याचे कारण विचारले तेव्हा रेवणनाथ म्हणाला, ‘‘यमधर्मा मी स्वतः सरस्वती ब्राम्हणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलाचा प्राण कसा घेऊन गेलास. आता घडू नये ते घडले. तरी चिंता नाही परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे पहिली सहा मुले कोठे ठेवली आहेस, तिही आणून दे आणि जर हे घडून आले नाही तर तुला फार जड जाईल, युद्ध करावे लागेल हे ध्यानात ठेव.’’

          तो नाथाला म्हणाला महाराज, ‘‘माझे म्हणणे नीट काळजीपूर्वक ऐकून घ्यावे. विष्णू, शंकर व ब्रम्हदेव हे तिघेही या गोष्टीचे अधिकारी आहेत. हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो. याचा मुख्य शंकर असून आम्ही त्याची चाकरी करतो. त्यामुळे मारण्याचे वा तारण्याचे काम आमच्याकडे नाही. तेव्हा आपण कैलासाला जावे व शंकराकडून ब्राम्हणाचे सात पुत्र मागून घ्यावे. तेथेच त्यांच्या जवळ आहेत त्यांचे मन वळवून आपला कार्यभाग साधून घ्या मज दीनावर कोपू नका.’’

               ते ऐकून रेवणनाथ म्हणाला, ‘‘तू म्हणतोस त्याप्रमाणे ते काम शंकराचे असेल तर मी आता कैलासास जातो.’’ असे म्हणून रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे निघाला.

          कैलासाला शिवगणांनी त्याची विचारपूस करण्यासाठी त्याला दारात हटकून उभे केले आणि आपण कोण कुठले काम वगैरे विचारु लागले. तो म्हणाला, ‘‘मला रेवणनाथ म्हणतात. मी शंकराची भेट घ्यायला आलो आहे त्याने एका ब्राम्हणाचा मुलगा चोरुन आणला आहे, त्याला शिक्षा करून मुलाला घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे.’’

          त्यांचे ते बोलणे ऐकून शिवगणांना राग आला. ते म्हणाले, ‘‘बाबा तू जे बोलतो आहेस त्यावरून तुझा गुरू गंधर्व असावा असे वाटते. म्हणून तू आता येथे न थांबता परत जा. शिवगणांच्या या बोलण्याचा नाथाला फारच राग आला. तो म्हणाला, ‘‘माझा गुरू गंधर्व म्हणता काय, तर मग माझ्या गुरुचा प्रताप तुम्हाला दाखवतो. गंधर्वासारखे रानोमाळ फिरु नका.’’

          रेवणनाथाने स्पर्शास्त्राची मोजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले. त्या बरोबर ते द्वारपाळ व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीला खिळून बसले, पाय सुटेनात म्हणून ते सर्व जण हाताने पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा हातही जमिनीला चिकटले व सर्वजण ओणवे राहिले.

          नाथाच्या विपरीत करणीने गणांची झालेली बिकट अवस्था पाहून तेथील सर्व लोक घाबरून गेले. ते शिवापुढे हात जोडून म्हणाले, ‘‘गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वाररक्षकगणांना जमीनीला खिळवून ओणवे करून टाकले आहे व त्यामुळे ते ओरडत आहेत.’’

          ते ऐकून शंकराने त्याला शिक्षा करण्यासाठी आठही काळभैरवांना आज्ञा केली. या आज्ञेप्रमाणे काळभैरव शतकोटी गणांना घेऊन बाहेर पडले. त्यांना पाहून नाथाने स्पर्शास्त्राच्या सहायाने त्या गणांना ओणवे केले. परंतु भैरवानी त्या अस्त्रास जुमानले नाही त्यांनी धनुष्य हातात घेऊन बाणावर निरनिराळया अस्त्रांची योजना करुन बाण सोडले तेव्हा नाथानेही त्या विरुद्ध अस्त्रांची योजना केली. त्यामुळे भैरवाच्या अस्त्रांचा तत्काळ नाश झाला. अष्टभैरव जर्जर झाले. रेवणनाथापुढे भैरवांचे काहीच चालेना.

          तेव्हा दूतांनी हे वृत्त शिवाला सांगितले ते ऐकून शिव रागाने स्वतः रणभूमीवर आला. शंकराला आलेला पाहून रेवणनाथाने मनात विचार केला की शंकराशी फार युध्द करण्याचे काही कारण नाही. एकाच अस्त्राने त्याचा बंदोबस्त करावा असे मनात आणून मग त्याने वाताकर्षण मंत्र जपून ते भस्म शंकरावर फेकले तत्काळ शिवाचा श्‍वासोच्छ्वासच बंद झाला आणि तो नंदीवरुन खाली कोसळला. हातातली शस्त्रे गळून गेली. मुखातून भडभडा रक्त वाहू लागले आणि अष्टभैरवही बेशुध्द पडले.

          याप्रमाणे शंकराची व गणांची भयंकर अवस्था झाल्याची वार्ता विष्णूला कळली. तो लगेच धावून आला. त्याने लगेच नाथाला अलिंगन देऊन पोटाशी धरले व विचारले, ‘‘अरे तुला रागवायला काय झाले. यावर रेवणनाथाने विष्णूला सांगितले, मी सरस्वती ब्राह्मणाकडे असतांना शंकराने यमाला पाठवून त्याचा पुत्र मारला. म्हणून मी त्याचा प्राण घेऊन, संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलाला जिवंत करून घेऊन जाणार आहे आणि जर तुम्हाला प्राणाची पर्वा असेल, तर तुम्ही त्या ब्राह्मणाची सातही बाळे आणून द्या म्हणजे मी शंकराच्या प्राणांचे रक्षण करतो. रेवणनाथाची ही मागणी ऐकून विष्णूने त्याला सांगितले ती सातही बाळे माझ्या जवळ आहेत. मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो. पण देह मात्र तू निर्माण कर.’’ विष्णूचे हे म्हणणे रेवणनाथाने मान्य केले. मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकराला सावध केले. विभक्त अस्त्राचा जप करून सर्व गणांना मुक्त केले आणि स्थितीमंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांना पुर्ववत केले. मग सर्वांनी नाथाला नमस्कार केला. विष्णूने सातही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्याला निघायची परवानगी दिली.

माधवनाथांनी मुलाला जिवंत केले

              माधवनाथ महाराज आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमा प्रमाणे देवगावहून एक एक टप्पा पूर्ण करीत नागपूरहून हिंगणघाटला गेले तेथे घडणार्‍या घटनांची पूर्णजाणीव ते शिष्यांना बोलता बोलता संगत होते. १९३६ साली हिंगनघाट येथे समाधी घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना कडक शब्दांत सांगितले की, ‘‘आमच्या देह कलेवराला काहीही महत्त्व नाही तो कुठेही पडेल; पण माझी आत्मज्योत देवगावला व्यंकटेशात विलीन होईल. ज्याने त्याची सेवा केली, त्यांनी माझी सेवा केली, जो त्याला मुकला तो मला मुकला, मी त्याचा गुरू नाही व तो माझा शिष्य नाही.’’

              ते एवढे देखील बोलले की आमच्या देहाला अग्नि संस्कार झाल्यावर रक्षा वा अस्थी कोणीही कुठेही नेऊ नये.

              एवढे कडक सांगूनदेखील शिष्य संभ्रमातच होते. ‘समाधी इंदोर’ असे ते सारखे सांगत होते.

              घटना अशा घडल्या की, चंद्रपूर जवळ हिंगनघाट गाव आहे. तेथे महाराजांचा उत्सव सुरू होता. त्यांना सकाळच्या वेळी मंगलस्नान घालणे सुरू होते. अंगणामध्ये दोराला झोपाळा बांधला होता. त्याच्यावर ते ध्यानस्थ बसले होते व शिष्यलोक त्यांना स्नान घालीत होते. नेमके स्नान सुरू असतानाच यजमान शिष्याचा मुलगा झोपाळ्याच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूकडे झोपाळ्या खालून चालला होता आणी नेमके त्याचवेळी, वेळ गाठावी असे दोर तुटला व झोपाळा खाली पडला आणि तो लहान मुलगा चेंगरला गेला. त्याला लवकर बाहेर काढता आले नाही व बाहेर काढण्यापूर्वीच तो गतप्राण झाला. थोड्या वेळाने महाराजांनी डोळे उघडले व म्हणाले ‘‘कहॉं है वो बच्चा?’’ लोकांनी तो मेला हे न कळू देण्याचा प्रयत्न केला; परंतु महाराजांच्या ते ताबडतोब लक्षात आले. त्यांनी त्याला आपल्या खोलीत बोलावले, सर्वांना बाहेर काढले. ते व तो लहान मुलगा दोघेच खोलीत होते. थोड्या वेळाने दार उघडले आणि तो मुलगा धावत धावत घरात गेला. इकडे महाराजांनी सांगितले की, आमचे नियोजित कार्य झाले आहे आता  आम्ही समाधी घेत आहोत. असे सांगून त्यांनी पूर्व नियोजित योजने प्रमाणे वेळेत समाधी घेतली. त्यांनी प्रत्यक्षपणे प्राण हिंगनघाट येथे सोडले; पण ब्रम्हरंद्री प्राण ठेवून प्रत्यक्ष समाधी ही इंदोर येथेच घेतली.

              अशा तर्‍हेने कार्य करीत त्यांनी आपले पंथ कार्य पुढे व्यंकटनाथांवर सोपवून स्वत: समाधी घेतली आणि आपला कार्यावतर संपवला.

              अशा तर्‍हेने रेवणनाथांनी व माधवनाथांनी नाथपंथाचे वर्चस्व ब्रह्मांडावर व त्रिभुवनावर कायम ठेवले.

Leave a Reply