पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 129

यमाला ताकीद देऊन, शंकराच्या दूतांशी आणि शंकराशी युद्ध करून विष्णू कडून मेलेले सात जीव परत आणले. विष्णूच्या सांगण्याप्रमाणे त्या सात जीवांना पूर्वीचेच देहरूप देऊन जिवंत केले. रेवणनाथांनी पंचमहाभूतांची आणि ब्रह्मांडाची सर्व तत्त्वे बाजूला सारून त्यांनी मुलांना पूर्वीच्याच देहाने व पूर्वीच्या प्रारब्धाने जिवंत केले.

13-06-22  योगेश्वरानंद रेवणनाथांचे आग्रहाचे प्रतिपादन- शिकवणूक

     रेवणनाथांनी पूर्वी मेलेली सहा मुलं आणि आता  मेलेल एक मुल असे सात मुलं, यमाला ताकीद देऊन, शंकराच्या दूतांशी आणि शंकराशी युद्ध करून विष्णू कडून सात जीव परत आणले आणि विष्णूच्या सांगण्याप्रमाणे त्या सात जीवांना पूर्वीचेच देहरूप देऊन जिवंत केले. म्हणजे रेवणनाथांनी पंचमहाभूतांवर आणि ब्रम्हांडावर आपली पूर्ण सत्ता असल्याचे दाखवून दिले ब्रह्मांडाची सर्व तत्त्वे बाजूला सारून त्यांनी मुलांना पूर्वीच्याच देहाने व पूर्वीच्या प्रारब्धाने जिवंत करून आणले हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.

   यमावर सत्ता आणि शंकर विष्णू आदींवर आपल्या सामर्थ्याची सत्ता ही केवळ रेवणनाथ आणि इतर 8 नाथ अशा नवनाथां मध्ये सापडते. हे केवळ अतर्क्य आणि मनामध्ये विविध प्रश्न निर्माण करणारे आहेत.

 ज्या रेवणनाथांनी आपल्या सामर्थ्याचा  प्रताप दाखवून सरस्वतीची सातही मेलेली मुले जिवंत आणून दिली त्या रेवणनाथांनी  कलियुगातल्या सर्व लोकांना उद्देशून आग्रहाचे प्रतिपादन केले आहे ते लक्षात घेऊ.

हे योगेश्वरानंद पूर्वीचे चमसनारायण होते. त्यांचे मूळ कार्य व अवतारीकार्य लक्षात घेऊन त्यांनी आपल्या जीवन चरित्रावरून दैनंदिन जीवनावरून कलियुगातल्या सर्व लोकांसाठी विचाराधीन काही तत्त्वे मांडली आहेत. त्या तत्त्वांचा कलियुगातील लोकांनी आपल्याला मिळालेल्या जीवनसंधीचा उपयोग हा जीवन सुखावह करण्याकरिता न करता आपला जो जीवन पिंड आहे तो उन्नत करण्याकरिता करावा. या जन्मात जीव मुक्त होणार नाही. जोपर्यंत जीव मुक्त होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म होत राहणार. ह्या जन्मात मिळालेले सुख पुढच्या जन्मी मिळणारच नाही. सुख ही भ्रामक कल्पनाच आहे. हरतर्‍हेचे दु:ख भोगीत जन्म जाणार. तो जाऊ नये, पण जीव उन्नत व्हावा यासाठी त्यांनी विचाराधीन ठेवलेली तत्त्वे अंगिकृत करा. त्यांचे प्रतिपादन असे आहे.

विराट पुरुषांच्या मुखापासून सत्त्व प्रधान ब्राह्मण भुजांपासून सत्वरजप्रधान क्षत्रिय मांड्यांपासून रजतमप्रधान वैश्य आणि चरणापासून तम प्रधान क्षुद्र अशी गुणांनुसार चार वर्णांची उत्पत्ती झाली आहे. तसेच त्यांच्याच मांड्यांपासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे चार आश्रम उत्पन्न झाले आहेत. जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणार्‍या भगवतांचे भजन करीत नाहीत. उलट त्यांचा अनादर करतात, ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात.

पुष्कळशा स्त्रिया आणि शूद्र इत्यादी भगवतांच्या कथा आणि त्यांचे नाम संकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत. आपल्या सारख्यांनी त्यांना कथा कीर्तनाची सोय उपलब्ध करुन देऊन त्यांच्यावर दया करावी.

ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जन्माने, वेदाध्यायाने तसेच उपनयनादी संस्कारानी भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोचले आहेत. तरीसुध्दा वेदातील अर्थवादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात.

त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते. मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात. ते गोड शब्दांनी फुलून जातात आणि त्या गोड फल स्वरूप वाणींची चटक लागलेले ते मूर्ख स्वतः ही स्वर्ग सुखाची वाखाणणी करू लागतात.

रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात. त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते. सापासारखा त्यांचा क्रोध असतो. असे हे ढोंगी घमेंडखोर पापी भगवंताच्या प्रिय भक्ताची खिल्ली उडवितात.

ते स्त्रियांच्या सहवासात राहून गृहस्थाश्रमामध्ये सर्वांत अधिक सुखी तेच असल्याचे सांगतात. ते अन्नदान, यज्ञविधी, दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचार्‍या पशुंची हत्या करतात.

धन, वैभव, कुलीनता, विद्या, दान, सौंदर्य, सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीने ते आंधळे बनतात. असे ते दुष्ट भगवंतपे्रमी संतांचा इतकेच नव्हे तर ईश्वराचासुद्धा अपमान करतात.

भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणार्‍यामध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहेत. हे वेदांनी सांगितलेले तत्त्व ते मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याचे सांगतात.

जगात मैथुन, मास आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्यांची स्वभाविक प्रवृत्ती असते. म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करीत नाहीत. तर विवाह यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञांच्या द्वारे जे त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे ती लोकांच्या उच्छृंखल प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे.

धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय. कारण धर्मामुळेच परमतत्त्वाचे ज्ञान त्यापासून साक्षात्कार व त्यामुळेच परमशांती यांचा लाभ होतो. परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामभोगासाठी करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे हे ते पाहत नाहीत.

सौत्रामणी यज्ञामध्येसुध्दा मद्याचा वास घेणे एवढेच विधान आहे. पिण्याचे नाही. यज्ञामध्ये पशुला फक्त स्पर्श करावयास सांगितले आहे. हिंसा नव्हे, तर तसेच धर्म पत्नीबरोबर मैथुनसुध्दा विषय भोगासाठी नव्हे तर संततीसाठी आहे. हा आपला विशुध्द धर्म जाणत नाहीत.

जे हे जाणत नाहीत ते गर्विष्ट वास्तविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निःशंकपणे पशुंची हिंसा करतात. परंतु मेल्यानंतर ते पशूच खातात.

हे शरीर मरणारे आहे. नाश पावणारे आहे व याच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत. तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर पे्रम करून दुसर्‍या शरीरात राहणाराही आपलाच आत्मा सर्व शक्तिमान श्रीहरीच आहे. हे न कळून त्यांचा द्वेष करतात म्हणून त्यांचा अधःपात होतो.

ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानीसुध्दा नाहीत ते धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थांनाच महत्त्व देतात. त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही. ते आत्मघातकच होत.

अज्ञानालाच ज्ञान मानणार्‍या या आत्मघातकी लोकांना कधीच शांती मिळत नाही. काळाने ज्यांचे मनोरथ धुळीला मिळवले आहे, असे हे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात.

जे लोक भगवंतांना विन्मुख झाले आहेत, ते अत्यंत परिश्रम करून मिळवलेले घर, पुत्र, मित्र आणि धन संपत्ती सोडून देऊन शेवटी नाईलाजाने घोर नरकात जाऊन पडतात. अशा विचारांचे चमसनारायण म्हणजे रेवणनाथ होते.

अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे अतुलनीय सामर्थ्याचे कृपा छत्र व सान्निध्य या पंथाला व पंथाच्या माध्यमातून समाजाला लाभले लाभले आहे. अशा योगेश्वरानंदनांच्या अनुभूती आजदेखील भाविक लोक घेऊन आपले जीवन कृतार्थ करीत आहेत.

     कलियुगातल्या लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा आत्मोन्नती व्हावी या उद्देशाने नाथांनी ह्या प्रमाणे उपदेश केला आहे.

Leave a Reply