पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 130

‘महाराजजी मंदिरके सामने एक साधू बैठता है, लेकीन वो लोगोंको बहूत तकलीफ देनेके हेतूसे, करणीबाधा करनेके हेतूसे,तथा लोगोको हैरान करने के लियेही बैठता है| हमने उसे बहुतबार यहॉंसे निकालनेकी कोशीश की, लेकीन वह वाम विद्याओंसे भय दिखाता हैं | उसको रोकना या उसे लोगोसे दूर करना बहूतहि कठीन जाता है | आप कृपा करके लोगोके हितमे उसका कुछ बंदोबस्त किजीएँ |’

14-06-22         मारोतीने दर्शनास पाठविले

     पांच चिरंजीवांमध्ये मारुती पण आहे. मारुतीने ज्यावेळेला पहिल्यांदा अवतार घेतला तेव्हापासून ते चिरंजीव आहेत. सदैव अहोरात्र ब्रह्मांडामध्ये या भूमीवर त्यांचा वास असतो सर्व युगांमध्ये मारुतीचे महात्म्य आहे.

    मारुतीची उपासना सकाळ संध्याकाळ नाथशक्तिपीठात होत असते. मच्छिंद्रनाथांची गोरक्षनाथांची आणि हनुमंतांची बऱ्याच वेळा भेटी झाल्या आहेत. मारुतीची उपासना करीत असतांना सज्जनगडावर स्वतः रामदासस्वामींनी नरेन्द्रनाथांना दर्शन देवून आशीर्वाद दिला होता. मारुतीची उपासना सुख शांती व समाधान देते.

    मारुती हे दैवत शक्ती युक्ती बुद्धी भक्ती धैर्य यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.नाथ पंथांमध्ये  हनुमानाचे महात्म्य विशेष आहे.

देवगावला एक दिवस एक तरुण पॅन्ट शर्ट घातलेला, अचानक महाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्या खोलीत  दाखल झाला. दाखल झाल्याझाल्या दोघांची दृष्टादृष्ट झाल्यावर महाराजांनी त्यांना ओळखलं. त्या  गृहस्थाने महाराजांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला व थोडा वेळ एकमेकांकडे पहात बसले. काहीतरी सांकेतिक भाषण त्यांचे झाले संभाषण झाल्यावर महाराजांनी त्यांना विचारले कुठून आलात. त्यावर त्यांनी सांगितलं वरच्या गच्चीवरून खाली आलो. आता परत तसाच जातो आहे. म्हणून त्यांनी नमस्कार केला. तेवढ्यात त्यांच्या पॅंट मधून मारुतीची शेप्टी बाहेर आली. महाराजांनी विचारले काय खाणार. त्यावर ते म्हणाले आज एकादशी आहे . म्हणून महाराजांनी त्यांना शेंगदाणे दिले. त्यांनी खाल्ले आणि सरळ तिसरा मजल्याच्या गच्चीवर जाऊन त्यांनी उंच उडी मारली आणि अदृश्य झाले.

 हनुमंताच्या काही अनुभूती खाली देत आहे.

एक दिवस अचानक एक गृहस्थ घरी आले. पूर्वी त्यांना कधीच पाहिले नव्हते किंवा कोणताही संबंध त्यांच्याशी आला नव्हता. घरी आल्यावर ते नरेन्द्रनाथांना नमस्कार करू लागले. म्हणून नरेन्द्रनाथ  त्यांना म्हणाले की, महाराजांची गादी आत आहे, आत जाऊन दर्शन घ्या. त्यावर ते उत्तरले की महाराज मी आपल्याच दर्शनाला आलो आहे. महाराज म्हणाले मी तर सी.ए. आहे आणि मी व्यवसाय करीत असतो. त्यावर ते म्हणाले मला माहीत आहे, पण मी अपल्याच दर्शनाला आलो आहे. मी महाराज नाही तुम्ही मला महाराज म्हणून का म्हणता ? त्यावर ते म्हणाले मला प्रत्यक्ष मारोतीने आपला चेहरा दाखविला व आपल्याला भेटण्यास सांगितले. आपल्या घराचा  पत्ता त्यांनीच दिला येथे कसे पोहोचायचे हे देखील त्यांनीच सांगितले त्याप्रमाणे मी येथे आलो. आपण माझा प्रश्न सोडवावा. त्यासाठीच मी येथपर्यंत आलो आहे.

महाराज म्हणाले आपण काय उपासना करता ? त्यावर ते म्हणाले मारूतीची उपासना करतो व इतर देवांचीदेखील पूजा करीत असतो. त्यावर महाराज म्हणाले, आपण नंतर या त्यावेळी आपल्या प्रश्नाचा विचार करू. ते बर म्हणाले व जाऊ लागले. त्यांना महाराजांनी विचारले आपण केव्हा याल? त्यावर ते लगेचच म्हणाले जेव्हा मारूती राया आज्ञा करेल तेव्हा येईन. असे म्हणून ते निघून गेले.

15 दिवसांनी ते पुन्हा आले. त्यांना विचारले की आज कसे आले त्यावर ते पुन्हा म्हणाले की आज पहाटे मारूतीरायाने सांगितले की आज तू अकोल्याला महाराजांकडे जा. म्हणून आज आलो.

महाराज त्यांना म्हणाले, तुमचा प्रश्न बिकट आहे. शिवाय तो तुम्हाला घातक ठरणारा आहे. तेव्हा तुम्ही तो नाद सोडून द्यावा. त्यावर ते म्हणाले आपण सांगाल ते मी करतो, पण मला हे सोडायचे नाही. साध्य करणे फारच अवघड आहे. त्यात जीवाला घोका आहे. ते काहीच बोलले नाही म्हणून त्यांना विचारले की तुमचे गुरू कुठे असतात? त्यांच्याकडे जाऊन या त्यांना विचारा ते म्हणतील तसे करा. त्यावर ते म्हणाले मी गुरूंकडे जाऊन त्यांना विचारून आलो आहे. ते 101 वर्षाचे बैरागी आहेत. त्यांनी देखील तुमच्याकडेच पाठविले आहे.

नरेन्द्रनाथ महाराजांनी त्यांना उपासना सांगितली. त्याच्या वेळा सांगितल्या. त्यावर ते म्हणाले ते रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साधना करीत असतात. त्या वेळा सोडल्या तर त्यांच्या जीवाला धोका आहे ते जीवित राहणार नाहीत त्यामुळे त्यांना त्यावेळेत दुसरे काहीच करता येत नाही. महाराज म्हणाले, तुम्ही आता येथे आला आहात तेव्हा ही भीती सोडून सांगितली ती उपासना करा. परंतु त्यांच्यावर झालेल्या प्रयोगाची त्यांना एवढी भीती बसली होती की ते त्या बदल करू शकत नव्हते. बाकीच्या वेळी ते सांगितलेली उपासना करू लागले.

उपासना करता करता एक दिवस त्यांना रात्री 11 वाजता झोप लागली व झोपून उठले ते सकाळचे 6 वाजले होते. त्यांच्या पोटात धस्स झाले व दुसर्‍याच क्षणाला त्यांना जीवनाचा धीर आला. आपण मेलो असतो याचा धक्का बसला तर आता वेळ टळली आता आपण मरत नाही याचा आत्मविश्वास आला. त्या नंतर त्यांनी रात्री 11 ते सकाळी 6 वा पर्यंत मरणाच्या भीतीने उपासना करणे बंद केले व विश्वासाने जीवन जगू लागले.

         दुष्ट प्रवृत्ती टाळण्यासाठी मारूतीने दिलेले संरक्षण

पंथ कार्य करतांना हनुमानजी कसे सहाय्यभूत होतात याचे एक उदाहरण पहा. हिमालयातील वास्तव्यात अनेक शिष्यांसमवेत असतांना नित्यनियमाने उपासना आदि सुरू होते. अनेकविध घटना घडत होत्या. उत्तरकाशीला आमचे अनुष्ठान सुरू होते. विेशेश्वराच्या शेजारी हनुमानाचे एक मोठे मंदीर आहे. तिथेच आमचा अनुष्ठानाचा ठिय्या होता. दररोज ठराविक पद्धतीने अनुष्ठान सुरू होते.एक दिवस मंदिराचा एक विश्वस्त नरेंद्रनाथ महाराजांजवळ आला व म्हणाला, ‘महाराजजी मंदिरके सामने एक साधू बैठता है, लेकीन वो लोगोंको बहूत तकलीफ देनेके हेतूसे, करणीबाधा करनेके हेतूसे,तथा लोगोको हैरान करने के लियेही बैठता है| हमने उसे बहुतबार यहॉंसे निकालनेकी कोशीश की, लेकीन वह वाम विद्याओंसे भय दिखाता हैं | उसको रोकना या उसे लोगोसे दूर करना बहूतहि कठीन जाता है | आप कृपा करके लोगोके हितमे उसका कुछ बंदोबस्त किजीएँ |’ नरेंद्रनाथ महाराज बोले, ‘कुछ देर रूकिये,जब हमारा हवन शुरू होजायेगा तब वो स्वयं ही यहॉंसे भाग जाएगा |’ तो साधु रोज तिथे येवून त्याला हवे असणारे कृत्य करीत होता आणि आपल्या विद्येचा उपयोग करून सर्वांना घाबरविण्याचा प्रयत्न करीत होता.नरेंद्रनाथमहाराज तो आला की त्याच्याकडे पहायचे पण तो आपली जागा सोडत नव्हता व त्याची करणी थांबवत नव्हता.त्यानंतर दहा दिवसांनी हवनाला सुरुवात झाली.हवन सुरु असताना,तो साधू काहीतरी यंत्र हातात घेऊन सर्वांना दाखवत होता व घाबरविण्याचा प्रयत्न करीत होता. नरेंद्रनाथमहाराजांनाही ते यंत्र दाखवून काहीतरी विचित्र कृती करीत होता. हवनाला बसलेले काही ब्राह्मण थोडे घाबरले व नरेंद्रनाथमहाराजांना म्हणाले, ‘महाराज, तो साधू भिती दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे.’ त्यावर महाराज म्हणाले, ‘तुम्ही आहुती टाका, त्याच्याकडे लक्ष देऊ नका.’ हवन चालू असतांना, एकाएकी काय घडले कुणास ठाऊक साधूच्या हातातील यंत्र जमिनीवर पडले आणि त्यावर त्याचाच पाय पडला. असे कसे झाले म्हणून तो साधू घाबरून गेला व आपले सामान गुंडाळून पळून गेला आणि पुन्हा त्या ठिकाणी दिसलाच नाही.

पंथ कार्य करताना हनुमंत कसे पाठीशी असतात हे लक्षात येईल.

Leave a Reply