पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 10


शिष्याने सद्गुरु पाहून त्यांचे गुरुत्व पत्करावे १०-०१-२२

       नरेंद्रच्या मनातले गुरु विषयीचे किल्मिष अजून पूर्णपणे गेले नव्हते. गुरुंची ओळख पटली तरी अंतर्मनाची पूर्ण खात्री व्हायची होती. गुरुंना पारखून घेणे सुरू होते गुरूदेखील शिष्याला पारखत होते.
गुरुंशी मनमोकळेपणाने विचार विनिमय करण्याचा नरेंद्रचा मानस होता. तो सद्गुरूंनी पुरेपुर ओळखला होता. 

नरेंद्रनी विचारले , महाराज, मागे तुम्ही मला दासबोध, गुरुचरित्र वाचायला सांगितले होते. त्यानंतरच्या काळात मी , तुम्ही सांगितलेले दोन्ही ग्रंथ वाचले. त्या संदर्भात मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. तुमची परवानगी असेल तर मी विचारतो. त्यावर ते म्हणाले की मी तुझ्यासाठीच थांबलो आहे. काय विचारायचे ते बिनधास्त विचार. नरेंद्र म्हणाले की , मी दासबोध तीन वेळा वाचला. गुरु चरित्राचेदेखील तीन वेळा पारायण केले. गुरुचरित्राच्या प्रत्येक पारायणानंतर मला अपेक्षित असलेले फळ मिळाले. पण माणसाने गुरू का करावा, गुरू करणे आवश्यक का आहे? गुरु केल्याने काय होते? वगैरे गोष्टींवर बुद्धी आणि भावनेच्या कसावर दासबोधामध्ये चांगल्या प्रकारे उहापोह केला आहे.
मला जर तुम्हाला गुरू करायचे असेल तर तुम्ही रामदासस्वामींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू आहात किंवा नाही आणि तुमचा मी सत्शिष्य आहे किंवा नाही हे आधी निश्चित व्हायला हवे आहे. तुम्ही यथार्थ सद्गुरू आहात, हे मी कसे ओळखावे ?
माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत कुणी संत, महाराज , विभूती संपर्कात आली नाही. जो काय सहवास घडला तो तुमचाच घडला. कोणत्याही तर्‍हेचा तुमचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. पण माझे मन मला आवरत नाही म्हणून तुम्हाला सरळच विचारतो की, तुम्ही सद्गुरू अहात हे कशावरून समजावे. तुम्ही भोंदू कशावरुन नाही. मी कसे तुम्हाला समजून घ्यावे. त्यांनी नरेंद्रचे हे बोलणे पूर्णपणे ऐकून घेतले. खोलीचे दर बंद केले. खोलीमध्ये ते आणि नरेंद्र दोघेच होतो. पहाटे ४ वाजेपर्यंत नरेंद्रशी बोलत होते. त्यांनी नरेंद्रच्या मनाचा पूर्ण वेध घेतला होता. जणू काही दोघांची अनेक जन्मापासून ओळख असल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन ते दाखवीत होते. त्यांच्याशी बोलता बोलता हळूहळू नरेंद्रचे मनदेखील हेच आपले सद्गुरु आहे, हे मानू लागले.
ते म्हणाले, मासा जसा पाण्याच्या बाहेर तडफड तडफड करीत राहतो आणि पाणी नाही मिळाले तर मरुन जातो अशी साधकाची परिस्थिती झाल्यावर आम्हाला त्याच्यासमोर उभेच राहावे लागते. आणि ओळख देऊन कार्य करावे लागते. सूर्योदय झाला हे मनाला सांगावे लागत नाही. अंतर्मनाला तत्क्षणीच ते कळते अशा निरनिराळ्या प्रकारांनी त्यांनी नरेंद्रला सांगितले.
कितीही झाले तरी नरेंद्रचे वाणिज्य शाखेतील उच्चतम शिक्षण झाले होते, माझे. ते सी.ए. पास झाले होते. व्यावहारिक कुशाग्र बुद्धी बाजूला ठेवणे त्यांना शक्य नव्हते. तरीही त्यांनी अत्यंत सावधानतेने म्हटले मला तुमचा अनुग्रह घ्यायचा आहे. केव्हा घेऊ ? त्यावर त्यांनी देखील नरेंद्रची परीक्षा घेतली. त्यांनी त्याचे निरीक्षण केले. त्यांच्या चेहर्‍याच्या हाव भावावरून हे नरेंद्रला समजत होते. महाराजांनी आपले विचार त्यांच्या चेहर्‍यावरून व्यक्त करीत, अत्यंत मिस्कील भाव दाखवून मला म्हणाले, आम्हाला कुठे देवगांवला जायला तिकीट काढावे लागते. आम्ही तर फुकटच जातो. मी पुन्हा देवगांवला जातो आणि त्या लोकांना थांबवितो. त्यांना सांगतो मी उद्या येतो आणि सकाळी तुला अनुग्रह देतो. हे त्यांच्याशी बोलणे चालू असताना नरेंद्रने मनातून निरनिराळे १५ निकष ठरविले. हे १५ निकष, महाराजांकडून अनुग्रह झाल्यानंतरच, बरोबर घडले आहेत किंवा नाही हे ठरणार होते. अनुग्रह पूर्ण झाल्यानंतर त्या १५ गोष्टींपैकी किती चुकतात हे अनुग्रहानंतरच कळणार होते. त्यापैकी एक जरी चुकीची निघाली तर नरेंद्र सरळ त्यांना सरळ म्हणणार होता की , “तुम्ही माझे गुरु नाही मी तुमचा शिष्य नाही. हिंदू धर्माच्या तत्त्वांप्रमाणे जे काही व्हायचे असेल ते होईल, पण नरेंद्र मात्र जगाला ओरडून ओरडून सांगणार की , हा म्हातारा भोंदू आहे, योगी नाही व अंतर्ज्ञानीही नाही. अशा परिस्थितीत झालेला अनुग्रह सर्वथा अयोग्य असून तो मला मान्य नाही.” हे सर्व नरेंद्रनी मनाने निश्चितपणे ठरविले होते.
त्यानंतर २ ते ३ महिन्यांच्या अवधीनंतर देवगांवला म्हणजे महाराजांच्या निजस्थानी नाथषष्ठीचा कार्यक्रम होता म्हणून नरेंद्र तेथे गेला होता. नाथषष्ठीच्या अदल्या दिवशी आन्हिकाला जाण्यापूर्वी त्यांनी नरेंद्रकडे पाहिले आणि पुन्हा त्याच मिस्कील भावानी माझ्याकडे पाहत म्हणाले, आज तुला अनुग्रह घ्यायचा आहे न. या बोलण्यान पुन्हा नरेंद्रच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यांनी महाराजांना म्हटले , मला काही सध्या अनुग्रह घ्यायचा नाही. कधी अनुग्रह घ्यायचा हे अजून निश्चित झाले नाही. जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला निश्चित सांगेल. त्यावेळी इतरही लोक हे बोलणे ऐकत होते. त्यांना कदाचित नरेंद्रचे बोलणे बरोबर वाटले नसेल.
दुसर्‍या दिवशीची गोष्ट आहे, आन्हिकाला जाण्यापूर्वी महाराज पुन्हा स्वतः होऊन मला म्हणाले, “आज आला रे, तुझा दिवस”. आज तू अनुग्रह घ्यायचा ठरवला आहेस ना. नरेंद्रने म्हटले हो. महाराज त्यावर म्हणाले ,”काल तर तू म्हणत होता माझे ठरले नाही अजून”. पुढे ते म्हणाले, माझे आन्हिक झाले की मी या खोलीत येतो. त्यांच्या गादीची ती खोली होती. येथे येऊन मग तुला अनुग्रह देतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आन्हिक झाल्यावर खोलीत आले. त्यांच्या नेहमीच्या गादीवर ते बसले. नरेंद्र खाली बसले. त्यांच्यात चार ते साडे चार फुटाचे अंतर होते. ते खूपच उंच आसनावर बसले होते. मनातून जाणवले हे इतक्या उंचीवर आहेत आपले कसे होणार.
त्यावर ते निग्रही आवाजात बोलले, आता तू एकही शब्द बोलू नको. आम्ही जे सांगतो ते कर आणि त्यांनी अनुग्रहाला सुरुवात केली. बंद खोलीत आम्ही दोघेच होतो. अनुग्रह पूर्ण झाल्यावर गादीवरुन खाली उतरले. अगदी माझ्या मांडीला मांडी लावून बसले. म्हणाले, बाळ आम्हीच तुला विचारतो. ज्या काही तू १५ अटी ठरविल्या होत्या. त्यातील एक जरी पूर्ण झाली नसेल तर ती आम्हाला सांग. आम्ही कुठे चुकलो हे आम्हाला दाखव. मग आम्हीच तुला म्हणतो मी तुझा गुरु नाही. तू माझा शिष्य नाही. खरे तर हा माझ्या मनातला विचार होता. जो मी त्यांना कधीच सांगितला नव्हता. तरी पण त्यांनी स्वतः होऊन मला असा प्रश्न विचारला. उत्तरादाखल मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. महाराज माझी पूर्ण खात्री झाली आता तुम्ही जे म्हणाल ते मी करीत राहील. अशा तर्‍हेने दिनांक ०४ फेब्रुवारी १९६३ च्या नाथषष्ठीला नरेंद्रचा अनुग्रह झाला. त्या वेळी ते २६ वर्षांचे होते. वयाच्या १७-१८ वर्षी ते प्रथम सान्निध्यात आले. तेंव्हापासून ८ वर्षे ते नरेंद्रला सतत घडवत होते. नरेंद्र म्हणतात की , “खरे तर महाराजांनीच मला अनुग्रहा योग्य केले अन्यथा हे माझ्या जीवनात कधीच घडले नसते”.

Leave a Reply