पदी लागता धन्य होऊन गेलो

भाग 5 वा. ५-१-२२

जीवनांत बदल घडविणारा अनुभव

गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्याया मध्ये ब्रह्मांड उत्पत्ती व गुरुंच्या सेवेचे महत्त्व सांगितले आहे. नामधारक भक्त सद्गुरूंच्या दर्शनासाठी जात असताना अतिश्रम झाले म्हणून एका झाडाखाली झोपला आणि आणि त्याला गुरुंनी स्वप्नात दर्शन दिले
नामधारक जागा झाल्यावर अवतीभवती इकडे तिकडे गुरूंचा शोध घेऊ लागला पण ते त्याला दिसले नाही आणि त्यांच्या जवळ जाण्याचा त्याच्या जीवनाचा पुढील प्रवास सुरू झाला
केवढे साम्य आहे नरेंद्र चा मित्र उद्धव त्याच्या खोलीत झोपला आणि अनावधानाने गुरुंच्या गादीकडे असलेल्या भिंतीकडे पाय करून झोपला आणि गुरूंनी त्याला प्रसाद म्हणून थप्पड मारली आणि तेवढ्यातच नरेंद्र तेथे पोहोचला.
हा सर्व प्रकार उद्धवच्या बाबतीत झाला असला तरी तो प्रसंग नरेंद्र साठी होता आणि त्या प्रसंगाने नरेंद्र पूर्णपणे हादरून गेला होता.
सद्गुरूंनी ही थप्पड वस्तुतः उद्धवला मारली परंतु परिणामतः नरेंद्रच्या आचार- विचारांना मारली होती जेवढे शारीरिक कष्ट उद्धवला झाले तेवढेच मानसिक प्रश्न आणि कष्ट नरेंद्रला त्रास देऊ लागले एकाला शारीरिक त्रास तर दुसऱ्याला मानसिक त्रास अशा दोन गोष्टी त्यांच्या एकाच चमत्काराने घडल्या.
महाराजांनी आपलं अस्तित्व तेथे असल्याची साक्ष दिली होती ते प्रत्यक्ष दिसले नाहीत तरी परिणामतः ते तेथे होते हे मान्य करणे भाग आहे. परिणामतः नरेंद्रचा त्यांच्या जवळ जाण्याचा मार्ग सुरू झाला.

          प्रत्येक माणूस हा विशिष्ट धोरणांनी, विशिष्ट विचार प्रणालीने आणि विशिष्ट तत्त्वांनीच वावरत असतो. तीच त्याची जीवनशैली. तेच त्याचे जीवन वैशिष्ट्य. जीवनात तो नेहमी आपल्याच विचारांच्या दिशेने प्रवास करीत असतो. तेच त्याचे जीवन चारित्र्य.त्या त्याच्या मूळ विचारांमध्ये सहजा सहजी परिवर्तन होत नाही. तोच त्याच्या पिंडाचा गुणधर्म. जीवनांत घडणार्‍या गोष्टींचे आत्म्यावर संस्कार होत असतातव होता होता, अनेक जन्मांनंतर पिंडाच्या संस्कारात बदल घडायला लागतो. 

विचारांच्या ह्या परिवर्तनात बदल होण्यासाठी परमेश्वरी योजनाच असावी लागते. गुरूंच्या हस्तक्षेपा शिवाय हे शक्य होत नाही. गुरूच केवळ बदल करू शकतात.
म्हणतात ना, गुरू शिवाय ज्ञान नाही, गुरूशिवाय तरणोपाय नाही, गुरूशिवाय आत्मोन्नती नाही. नरेंद्रच्या जीवनाला कलाटणी मिळण्यासाठी, त्याच्या व्यक्ति विशेषांत फरक पाडण्यासाठी, नरेंद्राच्या सद्य विचारांना सुरूंग लावण्यासाठी, नरेंद्रचा उद्धार होण्यासाठी तर गुरू महाराजांची भेट होत नसेल ना, असे एक नाही अनेक विचारांचे काहूर त्याच्या मनामध्ये माजले होते.
ज्या महाराजांची नरेंद्रची भेट होणार होती ते नाथपंथी आहेत. त्यांचे गुरू चैतन्य श्री माधवनाथ. माधवनाथांचे गुरू विश्वनाथ महाराज, त्यांचे गुरू विठ्ठलनाथ महाराज, त्यांचे गुरू काशीनाथ. पुढची परंपरा म्हणजे परमानंद महाराज, चैतन्य श्री ब्रह्मानंद महाराज, चैतन्य श्री परमहंसजी, चैतन्य श्री गुप्तनाथ, चैतन्य श्री सत्यमलनाथ, चैतन्य श्री ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर महाराज), चैतन्य श्री निवृत्तीनाथ, चैतन्य श्री गहनीनाथ, चैतन्य श्री गोरखनाथ, चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ, चैतन्य भगवान दत्तात्रेय. ही त्यांची अखंड परंपरा आहे.
नवनाथांची सत्ता सर्व ब्रह्मांडावर, चराचरावर, सर्व जीव प्राणिमात्रांवर होती. ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी सर्वच देवता त्यांच्या आधिन होत्या. भूतप्रेत पिशाच आदी सर्व प्रकारच्या शक्ती त्यांना वश होत्या म्हणजे नवनाथांचे सर्व ब्रह्मांड तथा दैवी आणि पितर सर्वच शक्तींना ते आदरणीय तथा वंदनीय होते. अशा ह्या नाथपंथाचे ते महाराज, अखंड परंपरेने भगवान मच्छिंद्रनाथांपासून 15 वे नाथ होते. अशा थोर विभूतीची भेट होणार होती. मनाच्या कल्पना व वस्तुस्थिती ह्यात खूप अंतर होते. व्यवहारातील सतत वागणे, विचार, सभोवतालची परिस्थिती ह्यात खूपच अंतर होते. चालु किंवा सद्य जीवन हे वस्तुस्थिती भोवती होते. त्यामुळे भावनांना कोणतीही चालना नव्हती. मन विचार हे सद्य परिस्थितीनुसारच असणार, याचाच जीवनांवर विशेष पगडा होता. त्यामुळे परीक्षेत पास होणे हे उद्दिष्ट होते. त्यासाठी आपल्याला गंधाच्या गोळ्या मिळाल्या तर आपण विनासायास पास होणार, हे आकर्षण आणि म्हणून कळत नकळत तो महाराजांकडे आंतून ओढला गेला व त्यांची तो आतुरतेने वाट पाहत होता .ते योगी होते. कदाचित नरेंद्रला आकर्षित करण्याकरता आपल्याजवळ आणण्याकरता तर ही त्या महान योग्याची योजना नसेल ना असे वाटू लागले
जो प्रकार मित्राचा नरेंद्राने पाहिला अनुभवला त्यावरून त्यांचे अचाट सामर्थ्य असणार ह्याची कल्पना आली होती. कदाचित नरेंद्र आता विचारांनी इकडे तिकडे भटकू नये म्हणूनच की काय त्यांनी हा सगळा प्रकार केला तर नाहीना असे अनेक विचार मना मध्ये येऊ लागले. नरेंद्रची प्रत्यक्ष भेटी होण्यापूर्वी त्यांनी आपला अंतरंग ओळखला असावा असे नरेंद्रला वाटू लागले.
जर परमेश्वर स्वरूपी माणूस असेल तर पुढच्या घटना घडविण्याच्या द़ृष्टीने, ह्या घटनेचे काय प्रयोजन असेल असे मनांत येऊ लागले. नरेंद्रच्या व्यक्तिमत्त्वात तर बदल घडविण्याचा त्यांचा मानस नसेल ना. असे ही विचार त्याच्या मनांमध्ये येत होते.
परंतु त्याचे मूळ विचार आणि त्यात होत असणारा बदल नरेंद्राला जाणवत होता. खर तर तो विचारांनी, पूर्णपणे गोंधळून गेला होता .
महाराज केव्हा येतील आणि आपण केव्हा त्यांची भेट घेऊ आणि त्यांचे दर्शन घेऊन आपल्या जीवनाच्या भवितव्याचा अंदाज आपण कसा घेऊ शकू असे नरेंद्रला वाटू लागले
जीवनाची आत्तापर्यंतचि तळमळ लक्षात घेऊन आता आपल्या जीवनाला मार्गदर्शन मिळणार ही आशा मनात निर्माण झाली. सद्गुरु संस्था अस्तित्वात आहे हे आपल्या मनाची दखल घेत आहे आपला ठाव घेत आहे हे असे त्याला वाटू लागले
खरं तर अजून सद्गुरूंचे दर्शन झाले ही नव्हते परंतु मनामध्ये विचारांमध्ये प्रकृती मानामध्ये प्रचंड स्थित्यंतर होत असल्याचे तो अनुभवत होता
काय प्रचंड सामर्थ्य असेल त्या सद्गुरूंच?

Leave a Reply