पदी लागता धन्य होऊन गेलो भाग ७

भाग ७ ७-१-२०२२

नरेन्द्राला घडविण्याचा गुरूंचा प्रयत्न
गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटले आहे की , “ईश्वरू होय जरी कोपिता गुरु रक्षील परिएसा। परी गुरु कोपेल एखाद्यासी कोणी न रक्षे तयासी।।”
म्हणजे सद्गुरु केल्यानंतर ब्रह्मा-विष्णू-महेश यापैकी कोणीही देव कोपला तरी तो कोप गुरु दूर सारू शकतात त्याचा कोणताही विपरीत परिणाम शिष्यावर होणार नाही. सद्गुरूंनी शिष्याला दिलेले केवढे हे अभय आहे. देवाला राग येईल असे वागले गेले, देवाशी दुर्व्यवहार , गैरव्यवहार केला तर सद्गुरु त्यातून मार्ग काढून शिष्याचे रक्षण करू शकतात परंतु त्यासाठी शिष्याने गुरुजवळ पूर्ण शरणागती पत्करणे आवश्यक आहे.
याचाच अर्थ असा की आपल्या प्रारब्धात नशिबात जे काही असेल ते बदलून गुरु शिष्याच जीवन सुकर करू शकतात, जीवनातले योग बदलवू शकतात.
ब्रह्मर्षी नारदांनी वाल्या कोळी चे जीवनच बदलून टाकले त्याच प्रमाणे व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रच प्रारब्ध , पूर्वसंचित विचारात घेऊनच की काय त्याच्या स्वभावात पूर्ण परिवर्तन करून त्याला सदभक्त करायचे ठरवले होते. आणि म्हणूनच त्याच्या वागण्याचा, स्वभावाचा, विचारांचा ,जीवनाच्या योगांचा, विचार न करता त्याच्यात प्रयत्न पूर्वक आमूलाग्र बदल करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत होते.
गहिनीनाथ आपल्या ज्ञानाचे स्थानांतरण करायला निवृत्तीनाथांची वाट पाहत होते. जणू तशीच वाट महाराज नरेंद्रची पाहत होते असे ज्यावेळी त्यांनी कार्याची आज्ञा केली त्या वेळेपासून वाटू लागले. भेट झाल्या नंतर नरेंद्रात सर्व स्थित्यंतरे करायची व जी काही योजना असेल त्याप्रमाणे त्याला घडविण्यात त्यांना जो काही वेळ लागणार होता त्याला मी उशीर करीत आहे, असेच नंतर नंतर नरेंद्रला वाटू लागले.
अनेक घटनांच्या माध्यमातून त्यांनी नरेंद्रला घडविण्याचे योजले होते. हे कार्याची आज्ञा केल्यावर जाणवायला लागले. पूर्वजन्मीची ओळख त्यांनी निरनिराळ्या वेळी दिली. नरेंद्र काय आहे , कोण आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न अगदी सहजतेने करीत होते. परंतु नरेंद्र बौद्धिक भूमिका सोडायलाच तयार होत नव्हते. त्यांच्या मनामध्ये सदैव खरे काय अन् खोटे काय याचे काहूर असायचे.त्याच्या या अवस्थेची त्यांना पुरेपूर जाणीव होती. ते सदैव नरेद्रला बुद्धीच्या कलानी धक्केही देत होते. सांभाळतही होते. व ज्ञानही देत होते. खरे तर तेच हे करू जाणे.
प्रत्येक नाथांनी अयोनी संबंधातून अवतार घेतल्यानंतर 12-12 वर्षे तपःश्चर्या केली आहे. पंच माहाभूतांचे शरीर धरण केल्यामुळे जन्मत: आलेली मलीनता घालवितांना गुरूंना किती परिश्रम घ्यावे लागतात, हे त्यांच्या चरित्रावरून लक्षांत येईल.
नरेद्रांचे गुरूदेखील असाच अविश्रांत प्रयत्न करीत होते. ते नेहमीच त्यांना म्हणायचे की , दगडाची मूर्ती घडविताना टाकीचे घाव घालावे लागतात व ते दगडालादेखील सहन करावे लागतात. जर दगड हतातून निसटला किंवा भंगला तर दुसरा दगड घेऊन त्याला तयार करणे हेच गुरूच कार्य आहे. ते नरेंद्रांना घडविण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करित होते.ही तर पूर्व जन्मीचीच पुण्याई की , असे गुरू लाभावे व त्यांनी नरेंद्रांना यथायोग्य घडवावे.
नरेंद्र त्यांना म्हणत असत की , महाराज माझ्याबरोबरचे लोक काही न करता आनंदात आहेत, मजेत आहेत. मी तुमच्या सान्निध्यात राहून का त्रासात आहे . त्यावर ते म्हणत असत की तुला जीवनात त्रास वाटत असेल तर तू आम्हाला सोडून जा. परंतु त्यांनीच जे घडविले होते त्याप्रमाणे हे शक्य नव्हते. त्यांच्याच सान्निध्यात खरे तर त्यांनीच ठेवून घेतले व त्यांना पूर्णपणे घडविले. महाराजांना सोडून जाण्याची नरेद्रांचे मनाची तयारी नव्हती. त्यांनी सांगितलेली साधना उपासना करवत नव्हती व सोडवत देखील नव्हती. केली की डोक्यात अनेकविध विचारांचा त्रास होत असे व सोडले की मन अस्थिर व अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे ते सांगतात त्याप्रमाणे साधना उपासना सुरूच रहायची.
ज्या ज्या घटनांनी त्यांनी नरेंद्रांना घडविले त्यांचा उल्लेख पुढे क्रमांकाने करीत आहे. आपण त्याचे मनन करावे म्हणजे महाराजांचा सूक्ष्म विचार व घडविणे लक्षांत येईल.
उच्च शिक्षणासाठी महाराजांनीच मार्गदर्शन केले
बी.कॉमचा निकाल अतिशय कठीण लागला असे सर्वच जण ओरडत होते. नरेद्र बी.कॉम झाले. महाराजांनी हे फार पूर्वी सांगितले होते. आता पुढे काय करावे. शिकावे की नोकरी उद्योग करावा. काय करावे हे विचार नरेंद्रचे मनामध्ये होते. म्हणून व्यंकटनाथ महाराजांना पत्र पाठवून त्यांनी मी आय.ए.एस. करू की आय.एफ.एस. करू की सी.ए. करू वगैरे अनेक पर्याय पत्र पाठवून विचारले होते. पत्राचे उत्तर त्यांनी ताबडतोब पाठविले आणि सी.ए. कर, सी.ए.चा कोर्स तुला साधेल. कॉमर्स फॅकल्टीचे शिक्षणच मुळात नरेंद्रच्या इच्छेविरुद्ध सुरू होते. त्यामुळे शिक्षणात गोडी नव्हती. परंतु उच्चस्तरीय शिक्षण करावे या विचारांनी त्यांना पत्र पाठविले. सी.ए. होण्यात नरेंद्रला रस नव्हता आणि कोर्ससाठी लागणारे, आर्थिक पाठबळही नव्हते.
प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांना नरेंद्रनी विचारले, महाराज तुम्ही मला सी.ए. करायला सांगितले. सी.ए. म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे काय? ते म्हणाले नाही रे बाळ आम्ही कुठे तुझ्या एवढे शिकलो. सहावी सातवीचे आमचे शिक्षण आम्हाला कुठे इंग्लिश येते. परंतु व्यापारी लोक पैसा आला की लिहितात खर्च झाला की लिहितात. नफा तोटा काढतात आणि शेवटी हे सर्व तपासले आणि बरोबर आहे म्हणून सही करायची, हाच तो कोर्स आहे नं. त्यांनी ऑडिट प्रोसीजरच नरेंद्रला समजावून दिली. तू सी.ए. होशील, असे ते म्हणाले.
बी.कॉमची परीक्षा पास झाल्यावर उच्च शिक्षणासाठी नरेंद्र दूर जाणार, त्यांच्या नेहमीच्या जाण्या-येण्याच्या मार्गापासून दूर जाणार, हे लक्षात घेऊन की काय ते त्यांना एकदा म्हणाले, “बाळ वेळ मिळेल तेव्हा, दासबोध, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग हे मिळाले तर वाचून पहा”. असे ते अगदी सहजपणे बोलले. सर्व काही आपोआप होईल, असे म्हणाले. त्यांचे हे म्हणणे समजण्याच्या योग्यतेचे देखील आपण झालो नव्हतो असे नरेंद्रला वाटले. त्यानंतर नजीकच्या कालावधीतच अकस्मात एका परिचित व्यक्तीकडून नरेंद्रला सी.ए.च्या कोर्ससाठी ऑफर आली. आणि खरेच, त्यांचा सी.ए. चा कोर्स सुरू झाला. सी.ए.च्या शिक्षणासाठी ते धुळ्याला गेले. आणि सी.ए.च्या चार वर्षाच्या कोर्सला 1958 साली सुरुवात झाली. नागपूरला असताना सहजतेने आणि ओघाने महाराजांचे दर्शन व्हायचे व त्यांच्याशी विविध विषयांवर विचारविनिमय करता यायचा. परंतु सी.ए.च्या कोर्सला गेल्यावर महाराजांशी संपर्क जवळ जवळ तुटला. परंतु त्यांचे बोलणे आठवायचे व मध्येच त्यांना पाहिल्यासारखा भास व्हायचा. स्वप्नामध्ये ते दिसायचे. कोर्समुळे नरेंद्र आता निरनिराळ्या प्रकारच्या लोकांच्या सहवासात यायला लागले आणि निरनिराळे विषय हाताळले जाऊ लागले.
महाराज आपल्याला घडविण्याचा प्रयत्न करीत आहे असे त्पांना सतत वाटायचे. प्रत्यक्ष बोलणे या बाबतीत तसे यावेळी काही झाले नव्हते. आपल्यात आमूलाग्र बदल करण्याची त्यांना गरज भासत होती हे लक्षात येत होते.
त्यांच्या सान्निध्यात आलेल्या अनुभूतींवरून त्यांच्या सान्निध्यात राहण्यात आनंद वाटत होता, परंतु नरेंद्र त्यांच्यापासून व आप्तेष्टां पासून, खूप दूर शिकण्याच्या निमित्ताने राहत होते. पण ही त्यांचीच योजना असावी असे जाणवायचे. त्यांना कुठेही जाणे शक्य होते व त्याप्रमाणे ते नरेंद्रजवळ जात असत
सांगितलेल्या ग्रंथांचा अभ्यास म्हणजे ब्रह्मांडाचे ज्ञानच ते देणार होते. ब्रह्मांडाची उत्पती , देवतांची कार्य पद्धती , नाथपंथाची कार्य पद्धती ह्याचे ज्ञान ज्याचा उलगडा गुरुचरित्रात केला आहे ते ज्ञान नरेंद्रला त्यांचे कडून मिळणार होते ह्या सर्वाला अवधी लागणार होता म्हणून की काय त्यांनी सी ए चा कोर्स करावयास संगीतला असावा. आणि सहज पणे म्हणाले की ह्या ग्रंथांचे वचन कर. सर्व कांही आपोआप होईल असे म्हणाले होते.

Leave a Reply