पदी लागता धन्य होऊन गेलो भाग ८

भाग ८ स्वतः रामदासस्वामींनी नरेंद्रवर कृपा केली ८-१-22


खरंतर , दासबोध, गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामाचे अभंग या ग्रंथांचा आणि नरेंद्रचा कधी संबंध आलाच नव्हता. या ग्रंथाबद्दल त्यांना काहीही माहीत नव्हत. परंतु सीए च्या कोर्सला सुरुवात झाल्यावर हळूहळू तसे योगे घडत गेले. दासबोधाच्या माघ्यमातून रामदास स्वामींनी प्रचिती दिली.
एक दिवस एका कंपनीमध्ये ऑडिटसाठी नरेंद्र गेले होते. ऑडिटर म्हणून त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या मदतीसाठी कंपनीच्या सेक्रेटरीचा पी.ए. असायचा. तो स्टेनोदेखील होता. नरेंद्र ऑडिट करीत राहायचे. तो टाइप करीत राहायचा आणि टाईप करताना मोठमोठ्यांनी श्लोक म्हणायचा. ते श्लोक ऐकून नरेंद्रच सर्व लक्ष त्या श्लोकाकडे जायचे आणि गाण्याची फर्माईश करावी तसे त्याला अजून म्हण अजून म्हण असे ते विनवीत राहायचे. तो देखील ते म्हणत राहायचा. एकदा त्याला विचारले, हे श्लोक कुणाचे आहेत. त्याचे काही पुस्तक आहे का? त्यावर तो म्हणाला, हे तर रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आहेत. कोणत्याही दुकानात पुस्तक मिळेल. त्याच दिवशी संध्याकाळी नरेंद्रने मनाच्या श्लोकाच पुस्तक विकत आणल. संपूर्ण मनाचे श्लोक एका बैठकीत वाचून काढले. त्या श्लोकांचा त्यांचे मनाला विलक्षण आनंद झाला. कुतूहल जागे झाले. त्या पुस्तकांच्या मागे दासबोध ग्रंथ विक्रीची जाहिरात होती. ती वाचून तो ग्रंथ मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेजारीच एक वृद्ध गृहस्थ राहत होते ते नरेंद्रला म्हणाले, माझ्याजवळ दासबोध आहे , तुला देऊ का वाचायला? नरेंद्र म्हणाले , “द्या पण मी तो सावकाश वाचीन. परत करायला वेळ लागेल.” त्यावर ते म्हणाले सात दिवसात पारायण होते. नरेंद्रनी आपली बाजु स्पष्ट केली. ” मला पारायण नाही करायचे. नुसते पुस्तक वाचायचे आहे. त्याला कदाचित वेळ लागेल.” हो नाही करत त्या गृहस्थाने हातपाय धुवून सोवळे नेसले. आपल्या देव घरातील ते पुस्तक दिले. म्हणाले, “शुद्धता आणि पवित्रता राख आणि वाचन झाले की मला आणून दे”. त्यांचे हे म्हणणे नरेंद्रला मान्य नव्हतें. त्या ग्रंथाबद्दलची त्यांची आस्था आणि श्रद्धा पाहून त्पांना विशेष वाटले. तरी पण स्वतःच्या मनाचा विचार करुन त्यांना नरेंद्र म्हणाले की, ” मी कोणतीही शुद्धता आणि पवित्रता पाळणार नाही. तुमची इच्छा असेल तर मला द्या. मी हा ग्रंथ शुद्ध आणि पावित्र्याने ठेवू शकणार नाही”. त्या वृद्ध गृहस्थाला काय वाटले माहित नाही त्यांनी तो ग्रंथ घेऊन जायला सांगितले. वाचन झाले की परत कर म्हणाले. नरेंद्रने देखील वाचायला सुरुवात केली. पारायणाला नव्हे. रात्री अंथरुणावर झोपता झोपता ते ग्रंथ वाचू लागले. शुद्धतेचा आणि पावित्रतेचा कोणताच संबंध ठेवला नव्हता. आपल्या मनाला पटेल त्या योग्य या भूमिकेतून वाचन सुरु होते. पुस्तकाच्या आरंभीचे पान वाचण्यात आले.
” ग्रंथमाजी ग्रंथ। लोक पुसती कवण ग्रंथ। येथे विषद केला गुरु शिष्यांचा संवाद.। हा आहे ग्रंथराज ॥”
अशाच काहीशा त्या ओव्या होत्या. ग्रंथराज हा शब्द वाचताच नरेंद्रचे डोके तडकले आणि त्यांनी दासबोध रागाने भिरकावून दिला, फेकून दिला. मनामध्ये विचार आला. ३०० ते ४०० वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आणि ४०० वर्षांपूर्वी रामदास स्वामी या ग्रंथाला ग्रंथराज म्हणतात. जणू कांही नंतरचे सर्व ग्रंथ याच्या खालच्या स्तराचे. म्हणजे नंतरची प्रजा, आम्ही सारे हे मूर्ख आहोत आणि ते फक्त हुशार. नरेंद्रच्या मनांतला, केवढा हा ताठा आणि अहंकार ! या मानातल्या विचाराने त्यांनी तो ग्रंथ फेकून दिला आणि विचार करीत पडले. एक-दोन मिनिटांचा अवधी गेल्यावर त्यांचे मन शांत झाले. कुणीतरी कानामध्ये संवाद करीत होते, “अरे तुला नाही पटले तर फेकून दे ,परंतु संपूर्ण ग्रंथ वाचल्याशिवाय तू ग्रंथाला कसे दुषण देणार. संपूर्ण ग्रंथ वाच. नाही पटले तर फेकून दे.” कुठली तरी शक्ती अंतर्मनाशी संवाद करीत होती. ते अंथरुणातून उठले. पुस्तक हातात घेतले ते मस्तकाला लावले आणि पुढे वाचायला सुरुवात केली. पुढे मूर्खाची लक्षणे वाचतांना जी शक्ती कानात बोलली त्याचे त्यांना प्रत्यंतर आले.
“संपूर्ण ग्रंथ वाचल्याविणा । ग्रंथास देई जो दूषण । तो एक पढतमूर्ख ॥”
हे समर्थांचे त्या ग्रंथातील विधान त्यांचे मनाला खरोखरच पटले. खरेच आहे. संपूर्ण विषय जाणून घेतल्याशिवाय तो चुकीचा आहे की बरोबर हे सांगणे सर्वथा चुकीचे आहे हे त्यांना पटले. आपले वागणे मूर्खपणाचे नाही काय? या अनुभूतीनंतर प्रत्येक शब्द आणि ओळ ही मनाच्या कसावर तपासून ते पुढे पुढे गेले. संपूर्ण दासबोधाचे पारायण केवळ सात दिवसांत करतात, पण तो संपूर्ण वाचायला नरेंद्रला जवळ जवळ दोन महिने लागले. दोन महिन्यांनंतर ग्रंथाबद्दल विलक्षण आकर्षण वाटू लागले. तो पुन्हा वाचावा असे वाटू लागले. ग्रंथाचे दुसरे वाचनदेखील त्यांनी पहिल्याच पद्धतीने केले. परंतु दुसरे वाचन १५ दिवसात पूर्ण झाले. दुसर्‍या वाचनानंतर त्यांना मनात इच्छा निर्माण झाली, या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे सात दिवसात पारायण करावे. त्याप्रमाणे नरेंद्रने आयुष्यातील पहिले पारायण सात दिवसांत केले. दासबोध वाचनानंतर नरेंद्रच्या मनाच्या अवस्थेत आणि विचारसरणीत विलक्षण परिणाम झाला होता. आपल्याला खूप काही ज्ञान आहे. आपल्याला खूप काही ज्ञान मिळत आहे. आपलीही आध्यात्मिक वाट मोकळी होत आहे असे जाणवत होते. महाराज सहजतेने म्हणाले होते की सर्व काही आपोआप होईल , याचे त्यांना प्रत्यंतर येत होते. वाचनाचा योगदेखील सहजतेने आला व मनातील स्थित्यंतरदेखील सहज होतांना दिसले. नरेंद्रला घडविण्यासाठी गुरू स्वतः किती प्रयत्नशील होते ते पहा. ही तर केवळ त्यांचीच कृपा म्हणून असे स्थित्यंतर लगेचच झाले. अन्यथा अश्या स्थित्यंतरासाठी जन्म जातो.गुरूंच्या स्वतःच्या प्रयत्नांमुळे हे स्थित्यंतर त्यांनी लगेचच घडविले.
पुढे नरेंद्रच्या जीवनात त्यांना सज्जनगडला जाण्याचा योग आला. तेथे गेल्यावर तर त्यांना विलक्षण अनुभूति आली.जणू रामदासस्वामी स्वतःच त्यांच्या बरोबर वावरत होते व तेथील माहिती ते स्वतःच सांगत होते. तेथील कार्य करणारे वरिष्ठस्वामी नरेन्द्रांना माहिती देत होते. नरेद्राने त्यांच्या जवळ इच्छा व्यक्त केली की मला जे कुलपात रामदासस्वामींचे त्यांना मिळालेले वल्कल, मच्छिंद्रनाथांचा सोटा वगैरे जे ठेवले आहेत ते हतात घेऊन त्यांना वन्दन करायचे आहे. त्यासाठी ते काहीही आर्थिक सहाय्य संस्थेला देण्यास तयार होते. परंतू असे आजपर्यंत घडले नाही व ते नियम बाह्य आहे त्या मुळे हे कदापि शक्य नाही असे तेथील सर्वच अघिकार्‍यांनी सांगितले. परंतू नरेन्द्राला ते हातात घेऊन दर्शन घ्यायचेच होते. त्यांनी शेवटी रामदासस्वामींच्या समाधी जवळ बसून प्रार्थना करण्यास सुरवात केली. जवळ जवळ ते तिथे पाऊण तास डोळे मिटून ध्यान करित बसले. दरम्यान कुणी येऊन गेले वगैरे त्यांना काहीचच माहित नव्हते. पाऊण तासानंतर तेच जेष्ठस्वामी त्यांच्या जवळ आले व म्हणाले की गेल्या पाऊण तासापासून मी तुम्हाला शोघत आहे. येथे देखील दोन वेळा येऊन गेलो पण तुम्ही कुठेच दिसले नाही. चला लवकर मी तुम्हाला त्या पिंजर्‍यात घेऊन जोतो. तुम्ही मनसोक्त दर्शन घ्या. त्यावर नरेन्द्र त्यांना म्हणाले तुमचा म्हणजे रामदासस्वामीचाच नियम आहे तो मी कसा तोडणार. त्यावर ते म्हणाले अम्हाला अतीशय अस्वस्थ व बेचैन वाटत आहे. तुम्हाला ते दर्शन घडविल्या शिवाय आम्ही स्वस्थ होऊ शकणार नाही. त्यांची विनंती मान्य करून नरेंद्र त्या पिंजर्‍यात गेले व सर्वच गोष्टींचे दर्शन त्यांना घेता आले. रामदासस्वामींनी दिलेली केवढी ही प्रचिती ! सज्जन गडावर जोपर्यंत ते होते तोपर्यंत रामदासस्वामी स्वतः त्यांच्या बरोबर होते व सर्व माहिती स्वतः देत होते

 या विषयावर नरेंद्राला मिळालेले ज्ञान त्यांनी अत्यंत सुलभ शब्दात नवनाथ बोधामृत व योगेश्वरानंदांच्या छायेत या पुस्तकातून प्रकाशित केले आहे. त्यावरून गुरुचरित्राच्या दुसरा अध्यायात सांगितलेल्या ब्रह्मांडा विषयीच्या विज्ञानाचे आकलन स्पष्ट होते.
  गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रम्हांडाची जडणघडण, वेदांच स्वयं प्रकाशित होण, पंचमहाभूते ,चारही वेद व त्यांचे वैशिष्ट्य हे जे सांगितले आहे ते स्वतः रामदास स्वामींनी दासबोधाच्या माध्यमातून नरेंद्रला सांगितले
 या विषयावर नरेंद्राला मिळालेले ज्ञान त्यांनी अत्यंत सुलभ शब्दात नवनाथ बोधामृत व योगेश्वरानंदांच्या छायेत या पुस्तकातून प्रकाशित केले आहे त्यावरून गुरुचरित्राच्या दुसरा अध्यायात सांगितलेल्या ब्रह्मांडा विषयीच्या विज्ञानाचे आकलन स्पष्ट होते.
   गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे गुरु शिष्याला ज्ञानदेत आपल्या बोधामृताने त्याच्यात परिवर्तन करित त्याला आपल्याजवळ आणण्याचा ते आटोकाट प्रयत्न करित असत. तेच व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रच्या बाबतीत केले 
    नरेंद्र दूर आहे महाराजांच्या जवळ नाही हा नरेंद्र चा व जगाचा विचार असेल परंतु सद्गुरु हे सदैव सर्वत्र उपस्थित असतात याची अनुभूती शिष्य नेहमीच घेतो
    दासबोधाच्या पठाणाने नरेंद्राच्या बुद्धीमध्ये व अंतर्मनामध्ये परिवर्तन घडले व स्वतः रामदास स्वामींनी दिलेल्या प्रचितीमुळे नरेंद्र आता पूर्वीच्या विचारसर्णीचा राहिला नव्हता त्यातून गुरुचरित्राच्या तीन वेळच्या पारायणाने, नरेंद्रला आलेल्या अनुभूती मुळे, तो भावनेने, मनापासून, अंतकरणापासून सद्गुरूंच्या म्हणजे व्यंकटनाथांच्या जवळ जाऊ लागला.

म्हणजे सद्गुरु व्यंकटनाथांनी केलेली योजना फलद्रूप होऊ लागली व बुद्धीच्या कसावर जगणारा नरेंद्र आता अनुभूती आणि अंतर्मनाच्या संकेतांवर वागू लागला.

        गुरुचरित्राच्या पारायणामुळे विचारसरणीत बदल झाला

काही कालावधी गेल्यावर मनामध्ये विचार येऊ लागला की गुरूचरित्र हा प्रासादिक ग्रंथ आहे, असे म्हणतात. आपण गुरुचरित्राचे पारायण करुन पहावे. आयुष्यात प्रथमच गुरुचरित्राच्या पारायणास सुरुवात केली. पारायणास सुरुवात केली, ती जीवनात विशिष्ट हेतू साध्य व्हावा या एकमात्र उद्देशाने केली आणि तो खरोखरच साध्य झाला. उद्देश साध्य झाल्यावर हा योगायोग होता काय असे वाटू लागले. म्हणून पुन्हा वेगळ्या उद्देशाने पारायणाला सुरुवात केली. पारायण पूर्ण होताच हाही उद्देश साध्य झाला. मनाची खात्री करण्याकरिता साधारणतः जे सहज शक्य नाही ते प्राप्त व्हावे या उद्देशाने तिसर्‍यांदा मनामध्ये एक कठीण ध्येय ठेवून पुन्हा पारायणास सुरुवात केली. मला मोठ्या गावात सी.ए.चा कोर्स करता यावा, कोर्स करीत असताना मला मानधन मिळावे. सत्प्रवृत्त आणि आध्मात्मिक लोकांच्या भेटी होत होत मी गुरुंच्या सान्निध्यात जावे या उद्देशाने गुरुचरित्राचे तिसरे पारायण सुरु केले. १९५८ ते १९६२ सालच्या दरम्यान सी.ए.साठी एवढ्या सहजतेने अ‍ॅडमिशन मिळत नसे. त्यानंतर एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी जागा बदलणे सहज शक्य होत नसे. कोर्स करणार्‍याला डिपॉझीट म्हणून पैसे द्यावे लागत. त्याला पैसे मिळत नसत. गुरुचरित्राचे पारायण झाल्यावर लवकरच नरेंद्रला नाशिकच्या एका फर्मनी बोलावले. त्यांचेकडून पैशाची कोणतीही अपेक्षा न करता त्या फर्मने नरेंद्रलाच दर महा १०० रुपये खर्चाला दिले. हे तर त्यावेळी अशक्य वाटत असे. त्यांनी वस्तुतः धुळे सोडले आणि नाशिकला कोर्स सुरू केला. नाशिकला निरनिराळ्या लोकांच्या सहवासात आले. गुरूचरित्राच्या पठणाचा तीनवेळा अनुभव घेतला. हा ग्रंथ प्रासादिक आहे हे पटले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही ग्रंथांचे सहजतेने वाचन, पारायण झाले व विचारांना वेगळीच कलाटणी मिळाली.
गुरुचरित्राच्या तीन वेळच्या पारायणाने, नरेंद्रला आलेल्या अनुभूती मुळे, तो भावनेने, मनापासून, अंतकरणापासून सद्गुरूंच्या म्हणजे व्यंकटनाथांच्या जवळ जाऊ लागला. म्हणजे सद्गुरु व्यंकटनाथांनी केलेली योजना फलद्रूप होऊ लागली व बुद्धीच्या कसावर जगणारा नरेंद्र आता अनुभूती आणि अंतर्मनाच्या संकेतांवर वागू लागला.
नरेंद्रचे पूर्वीचे विचार गेले व आता तो नव्याने आध्यात्माकडे, जीवनाकडे पाहू लागला .

Leave a Reply