पदी लागता धन्य होवोनि गेलो भाग ६

भाग ६ ६-१-२१

भेटीला किती उशीर केला- महाराज

  स्वामी विवेकानंद ज्या वेळेस प्रथम रामकृष्ण परमहंस यांना भेटले त्यावेळेस देखील झाले असे की , रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना म्हणाले ," बाळ किती उशीर केलास भेटीला !"
    खरंतर विवेकानंदांचा शोध सुरू होता की देव कोणी प्रत्यक्ष पाहिला आहे का ?त्यावर रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले की , "जेवढा स्पष्टपणे मी तुला पाहत आहे त्यापेक्षा जास्त स्पष्ट मी देव पाहिला आहे". आणि तिथून विवेकानंदांच्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात झाली.
  नरेंद्रचे ही असेच काहीसे घडले. परंतु नरेंद्र चा प्रवास आक्रमक होता आणि तो विरुद्ध बाजूला जाऊन शोध घेत होता. अंतर्मनातून त्याचा शोध हा सद्गुरूंची भेट कशी आणि केव्हा होईल हाच होता.
    व्यंकटनाथ महाराजांनी ज्या वेळेला नरेंद्रला म्हंटले ," किती उशीर केला" , त्यावेळी नरेंद्र विचारांच्या दुसऱ्या टोकाला गेला आणि विपरीत अर्थ काढून गुरूंचा शोध घेऊ लागला.
     व्यंकटनाथ महाराजांनी नरेंद्रला पुरेपूर ओळखले होते आणि ते देखील त्याची आतुरतेने वाट पाहत होते.
     जसे ब्रह्मर्षी नारदानी वाल्या   कोळीच्या डोक्यातील राग व विचार काढून टाकले आणि त्याला साधनेला लावले त्याच प्रमाणे व्यंकटनाथ महाराजांनी हळूहळू करत नरेंद्रच्या डोक्यातील राग व विचार शांत करून त्याला साधनेची जाणीव देऊन भक्तिमार्गला लावले. 
  प्रत्यक्ष प्रसंग कसा घडला तो लक्षात घेण्यासारखा आहे. नरेंद्रची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्याला घडलेल्या चमत्कारामुळे झालेल्या जाणीवेचा विसर पडला आणि तो रोजच्या दैनंदिन विचारसरणीत वातावरणात आला.      
 प्रत्यक्ष त्यांची भेट झाल्यावर ह्या सर्व गोष्टींचा विसर पडला आणि तो त्याच्या सद्य विचारसरणीवर व स्वभावावर आला . त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाला ते ९-१० विद्यार्थी गेले होते . परीक्षा पास होत आपले शिक्षण संपवायचे हेच त्यांचे धोरण. परीक्षेत पास होण्यासाठी गंधाच्या गोळ्या मिळाल्या तर काय देवच पावला! त्या गंधाच्या गोळ्या मिळविण्यासाठी महाराजांकडे जायचं आणि त्यांना त्या गोळ्या मागायच्या, असं त्या सर्वांनी ठरविले. नंतर काय होते, काय घडते हे पाहायचे.
 जीवनात ह्यापूर्वी नरेंद्रने कोणत्याही महाराजांचे वा सत्पुरुषांचे दर्शन घेतले नव्हते. कोणत्याही महाराजांच्या सान्निध्यात-सहवासात तो आला नव्हता. नरेंद्र त्याच्याच विचारांमध्ये वावरत होता . त्यामुळे उद्धव मित्राला म्हटले, तू आमचा लिडर, तू जसा त्यांच्याशी वागशील तसे आम्ही वागू. तू जसे त्यांना वंदन करशील, तसे आम्ही वंदन करू. गंधाच्या गोळ्या सर्वांसाठी तू मागायच्या. आम्ही सर्व बरोबर राहू. 
  आम्ही नुसते त्यांच्या खोलीच्या दरवाज्यात पाउल ठेवताच ते म्हणाले, "काय, परीक्षा जवळ आली काय ? गंधाच्या गोळ्यांसाठी आले काय?" आम्ही सारेच हसलो. आमच्या मनातला उद्देश लक्षात घेऊन ते बोलत आहेत, याचं विशेष वाटलं. परंतु लगेच बुद्धी आपलं कार्य करु लागली. मित्राला जो तो हळूच कानात विचारु लागला की , तू महाराजांना कल्पना दिली होती काय? त्यावर तो नाही म्हणाला. मित्राने महाराजांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर डोकं टेकवून नमस्कार केला. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी केला. नरेंद्र म्हणाला मी ज्या वेळी पायावर डोकं टेकवले त्यावेळी त्यांनी माझ्याकडे सहजतेने पाहिले अन सरळ विचारलं, "बाळ, तुझं नांव काय?" मी म्हटलं -चौधरी. ते म्हणाले "ते आम्हाला माहीत आहे."तुझ पहिल नांव काय ? मी म्हटलं, नरेंद्र. "ते आम्हाला माहीत आहे. किती उशीर केलास रे " असा उलट प्रश्न त्यांनी मला केला.
   जणू ते नरेंद्रच्या भेटीची वाट पाहत आहेत व त्यानेच भेटण्यास खूप उशीर केला. त्यांचे ते प्रश्नोत्तर ऐकून नरेंद्रच्या स्वभावाप्रमाणे, विचारांप्रमाणे त्याच डोकं तडकलं आणि तो मित्राच्या बाजूला जाऊन बसला. व त्याने हा काय प्रकार आहे असे मित्राला विचारले. तो म्हणाला मला काही सांगता येणार नाही. 
  नरेंद्रने महाराजांना पहिल्यांदाच बघितले होते. मित्राच्या खोलीतला तो प्रकार यांच्या खोलीला लागून असलेल्या खोलीतच झाला होता. दर्शनाला बरीच मंडळी बसलेली होती. सर्वच सुशिक्षित व चांगल्या परिस्थितीतले दिसत होते. महाराज सिंहासनावर त्यांच्या गादीवर तक्याला टेकून रेलून बसले होते. मध्यम उंचीचे सावळ्या रंगाचे, डोक्यावर अत्यंत बारीक केस होते. काठाचे धोतर व झब्बा होता. तेजस्वी चेहरा होता. सर्व गोष्टींवर जणू आपलेच पूर्ण नियंत्रण आहे, अशा आत्मविश्वासाचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. येणार्‍या जाणार्‍यांच्या भवितव्यावर आपलेच नियंत्रण आहे, जणू हे ब्रह्मांड ह्यांचेच आहे अशा अधिकारात ते बसलेले वाटले. चेहर्‍यावरचे तेज गूढ ज्ञानाची ग्वाही देत होते. फार काय जणू नरेंद्रवर देखील त्यांचेच वर्चस्व आहे, त्याच्या मागील सर्व जन्मांविषयी त्यांना पूर्ण माहिती आहे, असे विचार नरेंद्रच्या मनांत येऊ लागले. 
  सर्वच गोष्टींमध्ये त्यांची सहजता होती. कुठेही सायास प्रयास करून त्यांना कांहीही करण्याची गरज भासत नव्हती. हे सर्व ब्रह्मांडाचे आपणच सर्वे सर्वा आहोत अशा सिद्धतेने ते बसलेले व वावरताना दिसत होते. त्यांनी डोळे मिटले आहेत असे पाहून मित्राच्या कानात नरेंद्र कुजबुजला. काय हा माणूस आपल्याला बनवतो रे. म्हातारा आहे पण व्यवस्थित बनवतो आहे. तुझं नाव काय सांगितल्यावर म्हणतात माहीत आहे. पुन्हा पहिलं नांव विचारलं, आणि सांगितल्यावर म्हणतात माहीत आहे, किती उशीर केलास रे, असे तेच म्हणतात. अरे तू यांना वेळ दिली होती काय ? तो म्हणाला मी काहीच सांगितलं नाही. मग ते कस म्हणतात किती उशीर केला म्हणून. 
  " चला उठा , हा माणूस आपल्याला मूर्ख बनवतो आहे. चला निघून जाऊ येथून, तो आपल्या सर्वांना मूर्ख बनवीत आहे. सर्व मित्रांनी नरेंद्रला बसवून ठेवलं. तेवढ्यात मंद स्मित करीत त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाले एक एक जण या मी तुम्हाला गंधाच्या गोळ्या देतो, त्या तुम्ही मोजा. नंतर माझ्या जवळ येऊन किती भरल्या ते मला सांगा आणि पायावर डोकं ठेवून नमस्कार करा. तुमच्या परीक्षेचा निकाल त्याच क्षणाला तुमच्या कानात मी सांगतो.
  नरेंद्रची वेळ आल्यावर तो त्यांचे कडे गेला . त्यांना निरखून पाहिलं. गादीवर टेकून रेलून बसले होते ते. त्यांना त्याने सांगितले की माझ्या ५६ गोळया भरल्या. ते माझ्याकडे पहातच होते. माझ बोलणे झाल्यावर त्यांनी सहजतेने डोळे बंद केले. जणू ते ध्यानस्थ बसले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. तोच कानामध्ये स्पष्ट शब्दात ऐकू आले ," तू बी. कॉम. सेकंड क्लास मध्ये पास होशील." आवाज ऐकता क्षणीच नरेंद्रने मान वर करुन सर्व बाजूंना पाहिले. त्याच्या जवळ कुणीच नव्हतं. महाराजांचे तोंड आणि त्याचे कान यांच्यात तीन फुटाचे अंतर होते. नमस्कार करण्यापूर्वी ज्या अवस्थेत ते होते त्याच स्थिर व शांत अवस्थेत ते होते. कानातलं बोलणं ऐकल्यावरही ते तसेच होते. खोलीतले बाकी सारे लोक तसेच स्थिर बसलेले होते. ते हे सर्व पाहात व ऐकत होते. मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. तोच त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, " आम्हीच तुझ्या कानात बोललो. जे तू ऐकले ते मीच बोललो. तोच तुझ्या परीक्षेचा निकाल आहे". नरेंद्राला जसे सांगितले तसेच इतर सर्वांना सांगितले होते. या सगळ्या प्रकारामुळे नरेंद्राच्या मनामध्ये प्रश्नांच काहूर निर्माण झाले. त्यांच्यावर विश्वास बसण्यापेक्षा हा म्हातारा काही तरी खेळ खेळतो आहे, आपल्याला फसवतो आहे हीच भावना नरेंद्राच्या मनामध्ये प्रबळ झाली. कोणत्यातरी शक्ती यांच्याजवळ असतील, ज्या आपल्याला समजत नसतील. काहीच कळत नव्हतं. सर्वच अनाकलनीय वाटत होत. ते त्यांच्यापरी मला जवळ ओढण्याचा प्रयत्न करीत होते आणि नरेंद्र त्याच्या स्वभावानुसार वागत होतो. पूर्वी मनांत आलेल्या भावना त्याला अर्थशून्य वाटू लागल्या.
      आपल्यासारखाच दिसणारा माणूस परंतु सर्व सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे हे नरेंद्रला मान्य होत नव्हतं. माणसा जवळ सार्वभौम सामर्थ्य कसे असणार , त्यामुळे तर त्याला असे वाटले असेल . त्यांच्या प्रश्नोत्तरा मुळे आणि नरेंद्रच्या मनातील बेसुमार वाढलेल्या शंकां मुळे मनुष्य रूपातील सर्व सामर्थ्य असणारा माणूस हा देव कसा असणार हा आपल्याला फसवणाराच असणार असे मनातून वाटू लागले 
  परंतु या सर्वांनी नरेंद्रच्या मनाचा ठाव त्यांनी घेतलेला असणार आणि म्हणूनच ते सतत म्हणत होते की , " उद्या सकाळी आठ वाजता मी तुझी वाट पाहतो."
   नरेंद्रमध्ये परिवर्तन करण्याचा त्यांचाच निश्चय होता अन्यथा असे घडले नसते.

जणू काही हे जाणूनच ते पुढे बोलले. “बाळ उद्या सकाळी येशील नं.” नरेंद्रनेही हो असं म्हटल. नरेंद्रने त्याच्यापरी त्याचे बोलण्याच्या पद्धतीवरून दाखवून दिले होते की , मला काही तुमचे असामान्यत्व पटले नाही आणि मला उद्या तुमच्याकडे यायचही नाही. आणि मनातून त्याने तसे ठरवले. त्यावर ते म्हणाले , ” बर ये आम्ही वाट पाहतो.” ती सर्व मित्र मंडळी त्यांच्या खोलीच्या बाहेर आली आणि दाराच्या बाजूला त्यांची गादी होती तिथे जवळच उभा राहून नरेंद्र मोठ्याने बोलू लागला, “काय या म्हातार्‍याने आपल्याला बनवलं. कशाचे अंतर्ज्ञानी, योगी हे तर ढोंगी आहेत”. आपले बोलणे हे त्या गुरु महाराजांना स्पष्टपणे ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने तो बोलत होता. सर्व मित्रांनी त्याला ओढत ओढत दुसरीकडे नेलं व दूर नेल्यावर म्हणाले आता काय बोलायचे ते बोल.नरेंद्रच्या डोक्यात प्रचंड राग शिरला होता. ही व्यक्ती अंतर्ज्ञानी, योगी, नाथपंथी कशी मानायची हा त्याला मोठा प्रश्न पडला होता. जे कांही त्यांच्या भेटीपूर्वी मनात आले, जे कांही त्यांच्याबद्दल ऐकले व वाटले होते ते खरं आहे काय हा प्रश्न त्रास देऊ लागला. आम्ही सर्वजण आपापल्या ठिकाणी परत निघून गेलो होतो.
दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता ते माझी वाट पाहणार याची मला कल्पना होती. पण मी मनाशी पक्क ठरवल की, वाट्टेल ते झालं तरी त्यांच्याकडे जायचं नाही. दुसरे दिवशी प्रातर्विधी आटोपून नेहमीप्रमाणे नरेंद्र तयार झाला.खोलीच्या बाहेर पडला. घड्याळात सकाळचे ८ वाजले होते. आणि नकळत डोक्यातला राग शांत होऊन मनात विचार आला की , त्यांच्याकडे जाऊन तर पहावं , काय म्हणतात ते. मित्र त्यांच्याच बाजूला राहत होता, त्याच्याकडेही जाणे होईल. नकळतच नरेंद्र तेथे पोहचला. मित्राकडे न जाता सरळ महाराजांच्या खोलीत गेला. त्याला पाहून ते हसले आणि म्हणाले, “ये मी तुझीच वाट पाहत आहे”. तू तर येणार नव्हता न रे, मग काय झालं असं म्हणत हसत राहिले. जणू काही या गोष्टीची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्या नंतर नरेंद्र अगतिकपणे त्यांचेकडे रोजच जाऊ लागला. रोजच निरनिराळ्या गोष्टी सांगून ते नरेंंद्रच्या विचारसरणीला एक दिशा देत होते. रोज नकळत सहजतेने त्यांच्याकडे जाणे होऊ लागले तसा नरेंद्रच्या मनातील राग हळूहळू जाऊ लागला. त्यांच्या बद्दलचे आकर्षण वाढू लागले.
या प्रसंगानंतर त्यांच्या प्रतिमेने नरेंद्रच्या मनामध्ये कायमचे घर केले. मनातून ते जातच नव्हते. सततच त्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलचे निरनिराळे विचार आणि प्रश्न निर्माण व्हायचे. त्या प्रश्नांची उत्तरे शोधत शोधत दोघांनीही एकमेकांना ओळख द्यायची आणि ओळखायचे, हा प्रकार सुरू झाला. नरेद्रचा त्यांच्यावर अविश्वास नव्हता परंतु पूर्ण विश्वासही बसला नव्हता. श्रद्धा नव्हती परंतु आदरभाव निर्माण झाला होता व तो सारखा वाढत होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाढत होते. त्यांच्या भेटीची ओढ वाढू लागली. ते खोटे बोलत आहेत, फसवत आहेत, असे वाटणे मनातून गेले होते. हे सर्व खरेच काय असेल ते सारखे शोधून पाहायले जात होते. ते जे काही सांगतात ते अमान्य करण्यापेक्षा प्रांजळ बुद्धीने तपासून आपली खात्री करून घ्यावी आणि नंतरच आपले मत तयार करावे, असा बदल त्याच्यात होऊ लागला. त्यांच्या भेटी वारंवार वाढू लागल्या.
होत्या. होता होता पुढे बी.कॉमची परीक्षा आली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरेच नरेंद्र परीक्षेत सेकंड क्लासमध्ये पास झाला. ज्यावेळी त्यांनी सांगितले होते त्यावेळी तर परीक्षेची प्रश्नपत्रत्रका देखील तयार झाहली नव्हती. परीक्षा व दिलेल्या पेपर्सचे मूल्यांकन होणे तर दूरच होते. परीक्षेचा फॉर्म देखील भरलेला नव्हता. त्यामुळे नरेंद्रचे त्यांच्याबद्दलचे आकर्षण अधिक वाढू लागले. एवढे झाले तरी त्याच्या मनाचा ताठरपणा काही कमी झाला नव्हता. त्यांच्याशी तो पूर्णपणे समरस झाला नव्हता. पूर्ण विश्वास बसला नव्हता. अंतर्मनाची पूर्ण खात्री अजून व्हायचीच होती. त्याचा आपल्या बुद्धीवरचा विश्वास कमी होत नव्हता. आता त्यांच्याकडे ते नागपूरला असताना जवळ जवळ रोजच जाऊ लागले होते.

Leave a Reply