पूर्वसंचिताचा जीवनावर प्रभाव

माणसाच्या जीवनाकडे पाहिले तर असा प्रश्न पडतो, की त्याच्या सद्यजीवनाचा संबंध हा त्याच्या गतजन्माच्या कृतींशी आहे का?

सद्यजीवन हे स्वतंत्र आहे का, पूर्वजन्माचा संबंध असतो का, जीवनात घडणार्‍या घटनांचा पूर्वजन्मीच्या कृतींशी काही संबंध असतो का, सद्यजीवनात येणारे अडसर जे प्रारब्ध म्हणून संबोधले जातात ते प्रारब्ध बदलू शकते का, माणूस जन्माला येतो तो मागील जन्माशी कसा संबंध जोडून येतो, माणूस मेल्यानंतर काय होते, ह्या सर्व गोष्टींचे विवेचन आता पाहू.

या सर्व विवेचनापूर्वी हे लक्षात घेणे जरूर आहे, की प्रत्येक जीवाचा जीवनप्रवास हा काही एकाच वेळी सुरू झालेला नाही. कुणाचे जीवन केव्हा अन् कसे सुरू झाले, हा विषयच वेगळा आहे. त्या बाबतीत येथे काही सांगणे हे शक्य होणार नाही, परंतु अशी कल्पना करणे योग्य राहील, की स्वतंत्र जीवाचा जीवनप्रवास ज्या वेळेपासून सुरू झाला तेव्हापासून साठलेले जे चांगले अथवा वाईट कर्म आहे त्याला प्रारब्ध म्हणता येईल? साठलेल्या कर्माला पूर्वसंचित असेच म्हटले आहे. मागील जन्माचे जे कर्म त्याला प्राक्तन म्हणून संबोधले जाते. हातून घडलेल्या कर्माच्या फळाला नशीब असे संबोधले जाते. आकस्मिक योगाने घडलेल्या गोष्टींना दैवयोग अथवा योगायोग म्हटले आहे.

जीवनात घडणार्‍या घटनांवरून कर्मदोष कसे समजू शकतात? पूर्वसंचिताचा जीवनावर कसा आणि काय प्रभाव पडतो, तसेच जीवनात घडणार्‍या घटनांवरून कर्मदोष कसे समजू शकतात, हे समजून घेण्यासाठी आपल्या प्राचीन इतिहासातील काही उदाहरणांचा ऊहापोह करणे आवश्यक आहे.

वाल्मीकी ऋषींचा जीवनप्रवास

भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासातील वाल्मीकी ऋषींची गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. वाल्मीकी ऋषी हे पूर्वाश्रमीचे वाल्या कोळी होते. वाटमारी किंवा रस्त्यावरून जाणार्‍याला धर, पकड, मार आणि लूट हा त्याचा व्यवसाय. पाप-पूण्याचा विचार न करता प्रपंचासाठी हा सर्व उपद्व्याप चालू होता. अनेक दिवस असे चालू होते.

ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात ही गोष्ट आली. वाल्याचे प्रारब्ध व पूर्वसुकृत चांगले, पूर्वजन्मीचे संचित चांगलेच. सर्व योग चांगले असताना कोणत्या मोहामुळे, कोणत्या कारणामुळे तो जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकला,त्याचे जीवन असे का झाले, हा प्रश्न नारदमुनींना पडला. हे समजून घेण्यासाठी आणि त्याला जाणीव करून देण्यासाठी म्हणून ते ब्राह्मणाचे रूप घेऊन च्या समोर उभे राहिले.

वाल्याने आपल्या नित्यकर्म पद्धतीप्रमाणे त्या ब्राह्मणाला लुटण्यासाठी पकडले तोच तो ब्राह्मण वाल्याला म्हणाला, ‘‘तू मला मारू नकोस. तुला जे पाहिजे ते मी देतो. पण तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे.’’ ब्राह्मणाने त्याला विचारले, ‘‘तुझ्या ह्या व्यवहारातून जे काही पाप तुझ्या वाट्याला येत असेल त्यात तुझ्या बायकोला पापाचा अर्धा हिस्सा मान्य आहे का? तू तिला हे विचार. जर तिला हे मान्य असेल तर तू जे म्हणशील ते मी तुला देईन.’’त्यावर

तो म्हणाला, ‘‘तिला हे मान्यच आहे.’’ परंतु प्रत्यक्ष तिच्याशीच बोलण्याचे ठरले होते, म्हणून घरी जाऊन तिला विचारले. विचारताक्षणीच ती म्हणाली, ‘‘ह्यांच्या कृतीतून घडणार्‍या पापाशी माझा काय संबंध आहे? हे जे काही घरी आणतात त्याच्यावर मी माझा प्रपंच चालविते.’’

पत्नीचे हे उत्तर ऐकून वाल्या कोळी विचारात पडला. तो विचारांच्या भोवर्‍यात इतका अडकला, की त्याला काय करावे हे काहीच सुचले नाही. मनाच्या उद्विग्नतेत गेल्यावर त्याला उपरती झाली आणि तोच त्या ब्राह्मणाला (नारदमुनींना) विचारू लागला, ‘‘मी आता काय करू? हे सर्व तर मी पत्नीसाठी, कुटुंबासाठी करीत होतो.’’ त्यावर नारदमुनी म्हणाले, ‘‘तू आता ‘राम राम’ असा जप करीत राहा. सर्व काही आपोआप होईल.’’ ब्राह्मणाच्या वचनावर विश्वास बसला, परंतु ‘राम राम’ म्हणता येईना. शेवटी त्या ब्राह्मणाने म्हणजे नारदाने सांगितले, ‘‘तू मरा मरा म्हण.’’ ते म्हणणे वाल्याला सोपे गेले आणि ‘मरा मरा’ सतत म्हणता म्हणता ‘राम राम’ आपोआप होऊन त्याचे तप सुरू झाले. तो त्या तपानुष्ठानात इतका तल्लीन झाला, की किती कालावधी त्यात गेला हे कळलेच नाही. वाल्या कोळी पूर्णपणे एका वारुळात लुप्त झाला.

वाल्याचा तो वाल्मीकी ऋषी झाला. त्यांची तप:साधना इतकी प्रखर झाली, की त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मापूर्वीच संपूर्ण रामायण लिहिले. जे जीवन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जगले ते वाल्मीकी ऋषींनी रामजन्माच्या कितीतरी आधी जसेच्या तसे लिहिले आहे.

हे कथानक म्हणजे भारतीय इतिहासाचेच एक उदाहरण आहे, एक दाखला आहे. भारतीय संस्कृतीचा हा परिचय आहे. भारतीयांना हे मान्य आहे किंवा नाही हा प्रश्नच नाही. हीच आपली परंपरा आहे. हीच आपली संस्कृती पिढ्यान्‌पिढ्या आहे. ह्या सर्व घडलेल्या गोष्टी आहेत. अनेक वाङ्‌मयांतून ह्याचे दाखले मिळतील. त्याच्याबद्दल शंका काय घेणार?

वाल्या कोळीच्या जीवनावरून हे स्पष्ट होते, की एक सामान्य जीव जो वाल्या कोळी म्हणून जगत होता- त्याच्या जीवाच्या जीवनाचा पूर्वेतिहास,म्हणजे त्याचे प्रारब्ध ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात आले. ब्रह्मर्षी नारदमुनी म्हणजे अखण्ड ‘नारायण नारायण’ म्हणत म्हणत स्वर्ग, मृत्यू, पाताळ ह्या तिन्ही लोकांत संचार करणारा भगवान विष्णूचे परमभक्त आणि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, त्रिकाल ज्ञानी. माणसाच्या जीवाचा जीवनप्रवास हा अखण्ड असतो हे ते जाणत होते. जीव म्हणजे आत्मा. ज्या वेळी माणसाच्या जिवाची गर्भस्थापना होते त्या वेळी हा बीजरूपी पिंड म्हणून प्रस्थापित होतो. हा पिंड आपला पूर्वेतिहास घेऊन येत असतो. आपल्या कर्माचे गाठोडे तो बरोबर आणीत असतो. जसे त्याचे कर्म असेल त्याप्रमाणे त्याच्या जिवाच्या जीवनाचा चरितार्थ चालतो. त्याप्रमाणेच त्याच्या जीवनात घटना घडू लागतात. म्हणजेच माणसाच्या जिवाचा जीवनप्रवास हा अखंड असतो.

[box style=”alert”]वाल्याचा हा इतिहास ब्रह्मर्षी नारदमुनींच्या लक्षात वाल्याच्या पूर्वसंचितामुळेच आला. वाल्याचे प्रारब्ध चांगले असताना त्याचे प्रत्यक्ष जीवन असे का, म्हणून ही उठाठेव नारदमुनींनी केली. वाल्याने प्रत्यक्ष जीवनात जे ऋषिकार्य केले तसे घडत नव्हते, म्हणून कोणत्या कर्मदोषांमुळे जीवनामध्ये तो लुटारू झाला. ह्याचा आढावा ब्रह्मर्षींनी घेतला आणि आपल्या तप:सामर्थ्याने वाल्याच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडविले.[/box]

mrMarathi