नवनाथ बोधामृत

14 नवनाथ बोधामृत (contd . .)
लेखकः नरेन्द्रनाथ महाराज, पिठाधिश नाथशक्तिपीठ अकोला
visit web: nathshaktipeeth.org / contact 9130080931
नवनाथ बोधामृताची प्रत कानिफनाथ संस्थान मढी येथे उपलब्ध आहे

९. नाथ महाराजांचे दैनंदीन जीवन, पुजा व उपासना पध्दती
नाथ पंथीय गुरुच्या पूजेचा प्रकार काही वेगळाच आहे. साधारणतःपूजा म्हटली की देवाच्या निरनिराळ्या मूर्तीची पूजा होत असतांना आपण पाहतो. नाथपंथाच्या सर्व महत्वाच्या गोष्टी या सूर्य, ग्रह नक्षत्र,तारांगण यांच्या भ्रमणावर आधारीत आहेत. म्हणजे आज आत्ताची ब्रह्मांडाची काय परिस्थिती आहे. त्या प्रमाणे बदलत्या स्थितींच्या अस्तंगत रहायचे. आपण ब्रम्हांडाकडे पाहिलं तर पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांना सर्व महत्व आहे या प्रत्येकाच्या तत्वाचा मानवी जीवनाशी खोलवर संबंध असतो.

सदगुरु व्यंकटनाथमहाराज नित्य नियमाने अन्हिक करायचे. रोज सकाळी व संध्याकाळी अन्हिक करायचे. अन्हिक म्हणजे पूजा. त्यांची परंपरे प्रमाणे चालत आलेली पुजा कशी असायची, तर चौरंगावर पूजा करायचे. चौरंगाच्या समोरील भागात दोन्हीही कोपर्‍यात तेलाच्या समया असायच्या, त्या दोन समयांच्या बाजुला दोन तुपाचे निरांजन असत. मध्यभागी देवतांच्या आसनासाठी व्यवस्था असते देवता म्हणजे मुळ नवग्रहाची पौची याच्या सोबत दोन तुपाच्या दिव्याच्या मध्यभागी कापूर आरतीची योजना केलेली असते. उजव्या बाजूला दुध आदी नैवैद्य हे असे पुजा करणार्‍याच्या समोर मध्यभागी ताम्हण ठेवलेले असते व उजव्या हाताला पाण्याचा तांब्या असतो. कोणत्याही देवतेची मुर्ती या चौरंगावर नसते. ब्रम्हांडाचं मुळ स्वरुप हे नवग्रहांच्या पौचीवरुन व्यक्त केला जाते. गुरू महाराज सोवळं नेसायचे आणि आन्हीकाला सुरवात करायचे. आन्हीकापुर्वी रामानंदी लावायची. पौचीवर निरनिराळे कवच काही विशिष्ठ देवतांचे स्तोत्र, मंत्र आदी म्हणायचे. महाराज आन्हीक मोठ्याने करीत नसत. बराच वेळा तर ते दार लावून एकान्तात आन्हीक करीत असत. आन्हीक चालू असतांना गंध उगाळून तयार ठेवायचं, घड्याळासारखी दिसणारी वस्तु म्हणजे पौचीवर ठेवलेत्या गंध गोळीवर मंत्रांचे संस्कार व्हायचे. त्या गंधगोळीचा उपयोग कोणत्याही व्यक्तीवर, त्याच्या व्यक्तीमत्वात वा योगांत बदल करण्यासाठी वापर केला जायचा. शिवाय गुरूच्या इच्छेनुसार त्याचा पाहिजे त्या कारणासाठी वापर केला जायचा. या गंधगोळीचे अनुभव अनेक शिष्यांनी, भक्तांनी घेतले आहेत, आजदेखील घेत आहेत.पौचीवर होणारा अभिषेक हा पंथाचे दैवत, दत्ताचा असतो, रुद्राचा असतो, अथर्वशिर्षाचा असतो, शाबरी देवीचा असतो. अभिषेकामध्ये निरनिराळ्या देवतांचे स्तोत्र वा गीते वाचली जातात. आन्हिकाचा, त्या वातावरणाचा, सभोवतालच्या माणसांवर बराच मोठा परिणाम होत असतो. पुजेच्यावेळी केवळ शारीरीक उपस्थिती मुळे त्याच्यातले दोष, विकार हळू हळू कमी होवू लागतात.

नवग्रह म्हणजे प्रत्येक जीवाचा जीवनाचा लेख लिहीण्याची एक भाषा असे म्हटले तरी वावगे होणार नाही. ज्योतीष शास्त्राप्रमाणे, आपले सद्य जीवन आणि सद्यजीवनातील विविध अडचणी यांचा खुलासा ह्याच ग्रहांच्या माध्यमातून व्यक्त केला जातो. आपल्या चित्तवृत्तीत प्रवृत्तीला व्यक्त करून, त्याला आकार देऊन ते सततच प्रत्येक जीवावर संस्कार करतात. हे संस्कार योग्यतर्‍हेने घडविण्याचे कार्य सदगुरु करीत असतात. पुजेला बसलेल्या भक्तांना व शिष्यांना यातून स्फूरण येते याची प्रचीती (अनुभुती) आन्हीकाच्या कालावधीत घेतली जाते. सर्व देवतांनी, शक्तिंनी नाथ पंथाला अबाधीत वरदान दिले आहे. या सर्व शक्ती आन्हीकाच्या वेळेला सांकेतीक रूपाने उपस्थित असतात. पूजेसाठी केलेले गंध हे मुर्तीवर लावण्याचा जो प्रकार आहे तसा काहीच नसून पूजेसाठी उगाळलेत्या चंदनाचा उपयोग त्याची घट्ट गोळी करण्यात होतो व तिचा उपयोग नाथमहाराज त्यांच्या इच्छेला येईल अशा तर्‍हेने त्याचा उपयोग करतात. या गोळ्या म्हणजे एक प्रकारची दिव्य शक्तीच आहे अशी अनुभुती शिष्य घेत असतात पूजेच्या कालावधीत, गुरूमहाराज, सुक्ष्म रुपाने जणू ब्रम्हांडातून फिरुन येतात अशी अनुभुती शिष्यांना येते पूजेच्या वेळी झालेत्या तीर्थाचा उपयोग हा देखील विलक्षण परिणाम करणारा असतो.

हल्लीच्या भाषेत बोलायचे झाले तर पुजेच्या वेळी बसलेली प्रत्येक व्यक्तीची अंतर्बाह्य तपासणी आध्यात्मिक सामर्थ्याच्या माध्यमातून, त्याच्या नकळतच होते. त्याच्यामध्ये असलेत्या दोषांचे ज्ञान गुरूंना ताबडतोबच होते. गुरुंची संकल्पीत पूजा झाल्या नंतर शिष्य त्यांची पाद्य पुजा करतात आणि सांप्रदायिक पद्धती प्रमाणे गुरुंची आरती, कर्प्ाूर आरती, प्रार्थना आदी भाग सामूहीकरीत्या करतात. गुरू स्वतः तीर्थ व प्रसाद वितरण करतात व त्यांच्या इच्छेनुरुप त्यांना हवं ते अघटीत कार्य देखील अशा वेळेला सहजतेने करतात.

या दैनंदिन पुजेमध्ये सूर्य ही मुख्य देवता असते व त्याच्या अनुषंगाने बाकीच्या देवता असतात. नाथपंथा मध्ये सूर्याला अनन्य साधारण महत्व दिले आहे. सूर्यनारायण ही अशी एकमेव देवता आहे की जी जगाच्या पाठीवर सर्वजण तिच्या अस्तित्वाचं व गुणांचे दर्शन घेऊन अनुभुती घेतातात. सृष्टी मधील सगळे जीव व प्राणी यांचा सूर्य हा आत्मा आहे. सूर्य आपल्याला रोजच पूर्वेकडून उगवताना दिसतो, परंतु पूर्व हा ठोकळ मानाने म्हणण्याचा प्रघात आहे. शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर पूर्वेचा पट्टा, उत्तरेच्या टोकापासून दक्षिणेच्या टोका पर्यंत येतो. सूर्य हा एका टोका पासून दुसर्‍या टोका पर्यंत कणाकणाने पुढे पुढे सरकत सरकत पुर्वेचा पूर्ण पट्टा उजळून टाकतो सूर्य आणि पृथ्वी, सूर्य नक्षत्र आणि पृथ्वी यांची भ्रमण गती फार मोठी आणि निश्‍चित आहे. ज्या वेळी सूर्य आपला प्रवास उत्तर टोका कडून दक्षिण टोका कडे करतो त्यावेळेस त्याला दक्षिणायन म्हणतात व ज्या वेळेला तो दक्षिण टोका पासून उत्तर टोका पर्यंत जातो त्या वेळेस त्याला उत्तरायण असे म्हणतात. सूर्य संक्रमणाचा जर विचार केला तर १४ किंवा १५ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपासून तो दक्षिण टोका पासून एकेक कण पुढे सरकत सरकत पुर्वेची पूर्ण दिशा ओलांडून, तो उत्तर टोकाला यंतो. तो १६ जूलै रोजी उत्तर टोका पर्यंत पोहोचतो. १६ जुलैला त्याची भ्रमण गती फिरुन तो दक्षिण टोका कडे संक्रमीत होतो.तो पुन्हा आपला प्रवास उत्तर टोकापासून दक्षिण टोकाकडे पूर्व दिशेवरच सुरू करतो. १६ जुलै रोजी तो दक्षीण टोकाला पोहचतो. अशा प्रकारे १६ जुलैला होणार्‍या सूर्य संक्रमणाला कर्क संक्रमण म्हणतात. मकर संक्रांतीला होणार्‍या संक्रमणाला, मकर संक्रमण असे म्हणतात. या दोन्ही टोकाच्या संक्रमणाला सूर्य उपासनेमध्ये तसेच नाथपंथा मध्ये विशेष महत्व आहे. नाथपंथाच्या परिपाठा प्रमाणे ह्या दोन्हीही संक्रमणांना सूर्य संक्रमण हवन करण्याचा प्रघात आहे आणि या सूर्य संक्रमणाच्या हवनातून होणार्‍या विभूतीचा उपयोग हे नाथ पंथीय लोक आपली मंत्र साधना शक्ती शस्त्र अस्त्र विभूती आदी गोष्टींना विशेष उजाळा देऊन त्याचा उपयोग मानवी जीवनाच्या दैनंदिन जीवनासाठी आणि लोक कल्याणासाठी करतात. नाथ पंथीयांनी पंथीय तत्त्वांचा अंमल स्वतःपुरता मर्यादित ठेवला असला तरी त्याचा फायदा वा उपयोग हा जनसामान्यांसाठीच करतात. या व्यतिरिक्त अनेक विविध प्रकारची विशिष्ठ हवने होतात. सर्व हवनांचा मूळ उद्देश हा जनहित व जन कत्याण हाच असतो.

मकर संक्रांत आणि कर्क संक्रांत या दोन्ही संपूर्ण संक्रमणाला परंपरेनुसार व्यंकटनाथमहाराज हवन करीत असत आणि अनेक लोक अनेक ठिकाणाहून त्या हवनासाठी हजर राहत असत. नाथपंथाची ही हवन प्रक्रिया पंथ स्थापनेपासूनच म्हणजे अंदाजे गेल्या १००० वर्षा पासूनची आहे.

mrMarathi