नाथ पंथाला अशक्य काहीच नाही.

.,.एकदा गोरक्षनाथ आणि शंकराचा मानसपुत्र वीरभद्र यांच्यात युद्ध सुरू झाले. वीरभद्र देव, यक्षिणी, गण यांच्यासह युद्धात उतरला. गोरक्षनाथांनी एकटे. त्यांनी आपल्या बाजूने लढण्यासाठी पूर्वी मृत झालेल्या रावण, कुंभकर्ण, मेघनाद इत्यादी सर्व राक्षसांना जिवंत केले. घनघोर युद्ध सुरू झाले. राक्षस जागे झालेले पाहून विष्णू घाबरला. तो गोरक्षनाथांना म्हणाला “या एकेका राक्षसाला मारण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागले. आता तु त्यांना परत उठवलेस. हे तु सर्वथा अनुचित केलेस. त्यांना परत नाहिसे कर.”

गोरक्षनाथ विष्णू आणि शंकराला म्हणाले “मी या सर्व वीरांना भस्मसात तर करीन पण त्यांच्याबरोबर वीरभद्र आणि अन्य देवसैन्यही मारले जाईल.” दुसरा काही उपाय दिसेना तेव्हा नाईलाजाने शंकराने होकार दिला.

गोरक्षनाथाने मग सर्व सैन्य जाळून भस्मसात केले. आपला मानसपुत्र वीरभद्र गेल्याचे शंकराला दुःख वाटले. तो मुक रुदन करू लागला. ते पाहून गोरक्षनाथांनी विचार केला “अरेरे! काय केले मी हे. बद्रिकारण्यात मी लहान असताना ज्या शिवशंकराने माझे पालनपोषण केले त्याच दयाळू शंकराला आज मी दुःख दिले.”

गोरक्षनाथ शंकराला म्हणाले “स्वामी! जर काहितरी उपायाने तुम्ही मला वीरभद्राच्या अस्थि या राखेतून ओळखून दिल्यात तर मी संजीवनी विद्येने त्याला परत जीवंत करीन.” शंकर युद्धभुमीतून फिरू लागला. मृत वीरांची हाडे कानाला लावून पाहू लागला. वीरभद्र जेथे धारातीर्थी पडला होता तेथील हाडे कानाला लावताच त्यांतून “शिव शिव” असा शब्द उमटलेला त्याला ऐकू आला. ते ऐकून शंकर गोरक्षनाथांना म्हणाला “माझे सर्व गण शिवमय झालेले आहेत. माझ्या खेरीज अन्य नाम त्यांना ठावूक नाही. ह्या घे वीरभद्राच्या अस्थि.” गोरक्षनाथांनी मग वीरभद्राला पुनः जीवंत केले.

भक्ती त्या शिवगणांसारखी असली पाहिले. श्वासाश्वासून, रोमारोमातून शिव हा एकच ध्यास उमटला पाहिजे. जीवंत असतानाच नव्हे तर मेल्यानंतरही शिवनामाची अवीट गोडी दरवळली पाहिजे.

सामर्थ्य, चातुर्य हे नाथ पंथीय गुरू समान असले पाहीजे, जे देवाधिदेव भगवान शंकर यांना अशक्य तेही सहज करता यावे.

mrMarathi