जीव कसा घडतो?

|| पाहतां शरीराचे मूळ | ह्या ऐसे नाही अमंगळ | रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यासी ||

मानवी जीवाची कहाणी खर तर त्याच्या पिंडाच्या गर्भधारणेपासूनच सुरू होते. जनमानसामध्ये प्रसूती होऊन मूल जेव्हा जन्माला येते तेव्हापासूनच त्याच्या जीवनाची कहाणी सुरू होते. जन्मत:च साधारणत: १ ते १.५ फुटाचे असलेले बालक चंद्रकलेप्रमाणे वाढत वाढत वयात आल्यावर साडेपाच ते सहा फुटांचा माणूस होतो. साधारणपणे १५ ते २० वषार्ंत, १ ते १.५ फुटाचे ते बालक वाढत वाढत ५.५ ते ६ फुटांचा सक्षम देह होतो.

ह्या कालावधीत भोवतालचे लोक त्याला घडविण्याचा, वाढविण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. शरीर केव्हा आणि कसे वाढले, हे कळत नाही आणि दिसतही नाही. वाढताना ते दिसतच नाही, पण वाढलेले मात्र दिसते. झाडांची रोपे देखील वाढताना दिसत नाहीत, पण वाढलेली मात्र दिसतात. नेमक ते केव्हा वाढीस लागले हे कळतच नाही.

जीवनसत्त्व दिल्यावर त्याचा परिणाम होताना दिसत नाही, पण परिणाम मात्र झालेला दिसतो. म्हणजे ते एवढ्या सूक्ष्मपणे वाढत असते, की ते कसे आणि केव्हा वाढते हे कळतच नाही आणि वाढताना दिसतही नाही. श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते! कोण बोलविते हरीवीण!’ म्हणजे जन्माला घालणार्‍या जीवांच्या पलीकडे काही गोष्टी आहेत, काही शक्ती आहेत (देवाची सत्ता, ब्रह्मांड), की ज्यांच्या आधारावर मानवी जीव चालत असतो, वाढत असतो.

श्री समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधा’मध्ये मानवी जीवाच्या मुळाचा शोध घेताना म्हटले आहे, की पाहतां शरीराचे मूळ ह्या ऐसे नाही अमंगळ | रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यासी | माणूस जन्माला येणार, तो एक अर्भक’| म्हणूनच त्या अर्भकाचे बीजारोपण होत असते ते एका स्त्रीच्या उदरात. जर ही स्त्री रजःस्वला होऊ शकली नाही, तर हे बीजारोपण देखील होत नाही. परिणामत: मानवी जीवनाचा जन्म अशा ठिकाणीं होणारच नाही. हीदेखील परमेश्वराची एक किमयाच आहे.

स्त्री-शरीरातील ठराविक कालावधीनंतर नैसर्गिकरीत्या बाहेर पडणारा जो विटाळ तोच त्या स्त्रीला गर्भधारणेसाठी योग्य करतो आणि अशाच ठिकाणीं माणसाच्या जन्माचे बीजारोपण होते. म्हणजेच ज्या मातृभूमीत हे बीजारोपण होते ती भूमीची शुद्धता आणि बीजारोपण झालेल्या बीजाची शुद्धता ह्यावर स्थापित झालेल्या बीजाची शुद्धता अवलंबून राहील. श्री ज्ञानेश्‍वरांनी म्हटल्याप्रमाणे ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’, म्हणजेच बीजारोपण करणारे जे मूळ बीज आहे तेच जर शुद्ध- सात्त्विक असेल तरच स्थापित झालेले बीज किंवा स्थापित झालेली गर्भधारणा ही शुद्ध- सात्त्विक, गोमटी अशी असेल. त्या जीवाचे योगदेखील त्याप्रमाणे चांगलेच राहतील.

मानवी जीवनाचे जे मूळ बीज, त्याप्रमाणेच नवीन जीवाची उत्पत्ती राहील. जे योग, भोग, व्याधी, कष्ट, कर्मयोग, दुःख, असमाधान वगैरे स्थापन करणार्‍या उभय जीवांचे असतील तेच योग, भोग आदी योग प्रामुख्याने स्थापित झालेल्या जीवाचे असणार. त्याप्रमाणे जे सुख, समाधान, शांती, सुयोग आदी स्थापन करणार्‍या जीवांचे असतील त्याचप्रमाणे ते नवीन जीवात स्थापन होणार. हाच निसर्गनियम अनुभवास येतो. जसे बीज तसे फळ. म्हणजेच बालकाचे मातापिता ज्या गुणांचे, योगांचे असतील, साधारणतः ठोकळ मानाने तेच गुण बालकामध्ये येतात. ज्योतिषशास्त्राच्या भाषेत सांगायचे झाले तर म्हणावे लागेल, की आईवडिलांच्या जन्मपत्रिकेतील ग्रहांचे नेमके संबंध मुलाच्या जन्मपत्रिकेत पाहावयास मिळतात. ग्रहांच्या भाषेवरून ते आपल्याला कळू शकेल.

मानवी जीवनाच्या जन्मजन्मांतरीची कहाणी लिहिण्याची भाषा म्हणजे नवग्रह व त्यांचे होणारे परस्पर योग, म्हणजे जन्मपत्रिका. संपूर्ण ज्योतिषशास्त्र हे नवग्रह, त्यांची १२ घरे, त्यांच्या १२ राशी व ग्रह आणि राशींचे परस्परयोग, नक्षत्र आदींवर आधारित आहेत. ब्रह्मांडातील प्रत्येक जीवनाचे सद्यजन्मातले योग, तसेच पूर्वजन्मदोष, प्रेतपीडा, अपमृत्यू, शापित जीव आदी विषयांचे ज्ञान ह्या जन्मपत्रिकेतील नवग्रहांवरून लक्षात येतात.

mrMarathi