वेद-विज्ञान आणि मानवी जीवन

२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात. माणसाला देवधर्म, अध्यात्म हे सोपस्कार करायचे नसतातच, असे नाही, परंतु ‘तो कां करायचा?’ हा चा मूळ प्रश्न असतो. अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अध्यात्म हे वैदिक विज्ञान आहे, तर विज्ञान हे आधुनिक अध्यात्म आहे, तरी सुद्धा या दोन्ही गोष्टींमध्ये एक सूक्ष्म फरक आहे अध्यात्म हे व्यक्तिगत आहे, तर विज्ञान हे सार्वजनिक आहे.

साधना, तप वगैरे करून, अध्यात्मात व्यक्तिगत विकास साधता येतो तर वैज्ञानिक शोध हे सार्वजनिक विकास साधू शकतात. विज्ञानाचा उपयोग करून सर्वसाधारण माणूसदेखील एक बटण दाबून प्रकाश निर्माण करू कतो, टीव्ही च्या सहाय्याने जगभरातील घडामोडींचा आढावा घेऊ शकतो, तर अध्यात्म हे व्यक्तिगत पातळीवर ह्या सर्व गोष्टींची अनुभूती निर्माण करू शकते.

पराकोटीची आध्यात्मिक उन्नती साधलेला एखादा योगी सत्पुरुष वरील सर्व गोष्टींची अनुभूती कोणतीही वैज्ञानिक उपकरणे न वापरता घेऊ शकते किंवा घेत असतो. हे खरे आहे की खोटे, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यावर एकच उपाय आहे – व्यक्तिगतरीत्या आपली आध्यात्मिक उन्नती साधा. त्या सात्त्विक आध्यात्मिक पातळीपर्यंत स्वत:चा विकास करा अन् मग पाहा हे सर्व अनुभव घेता येतात की नाही, हे खरे आहे की नाही.

परंतु आजच्या धावपळीच्या युगात हा प्रकार केवळ अशक्य आहे. कोणाजवळ एवढा वेळच नाही, हा फारच लांबचा प्रवास आहे. प्राचीन शास्त्रांत तर आपण असेही वाचतो, की अशा उच्चतम पातळीपर्यंत व्यक्तिगत विकास घडवून आणण्यासाठी कधी कधी सात सात जन्मच काय, अनेक जन्म वाट पाहावी लागते. ह्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागते. सर्वसाधारण माणसाला हा सगळा द्राविडी प्राणायाम आजच्या धावपळीच्या जीवनात केवळ अशक्य आहे.

मग ह्यावर उपाय तो काय? प्राचीन भारतीय इतिहासातील नोंदींवरून तर असे वाटते, की आपल्या दैनंदिन जीवनातील दु:ख, त्रास, निराशा, अपयश आदींवर अध्यात्मात उपाय तर आहेतच. आपण वेगवेगळ्या धार्मिक कार्याचा सोपस्कार करून तसा प्रयत्नही करून पाहतो पण त्यातून म्हणावे तसे अपेक्षित यश वा परिणाम काही मिळत नाही. उलटपक्षीं आधुनिक विज्ञानात अशा स्पष्ट गोष्टी आहेत, की एक बटण दाबले की पाहिजे तो चॅनल लागतोच, एक नंबर डायल केला की विशिष्ट व्यक्तीशी संवाद होतोच, वगैरे वगैरे आणि त्यातही ह्या सुविधा वापरणारा माणूस अगदी अनपढ असला तरीही चालतो, काय गंमत आहे, नाही परंतु हे जेवढे खरे व सोयीस्कर आहे तेवढेच अध्यात्मसुद्धा खरे आहे व ते असेच सोयीस्कर होऊ शकते. विज्ञानाला जशी प्रक्रिया आहे तशीच अध्यात्माला आपली एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जर आपण आत्मसात केली तर अध्यात्मदेखील तेवढेच सोपे व सोयीस्कर आहे. विज्ञानामध्ये शास्त्रज्ञ शोध लावतात, मार्गदर्शन करतात, तर अध्यात्मात ऋषिमुनी, साधुसंत, योगी सत्पुरुष हे कार्य करतात.

आता हेच पाहा ना, ज्योतिषशास्त्रात ग्रह व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांचा अभ्यास केला जातो. आधुनिक खगोलशास्त्रातही ह्याचा अभ्यास केला जातो. दोन्ही पद्धतींत फरक आहे. परंतु अध्यात्माच्या ह्या विषयाची मूळ संकल्पना हीदेखील विज्ञानाच्या आधारे सिद्ध झाली आहे. समुद्राला येणारी भरती-ओहोटी ही चंद्राच्या गुरुत्त्वाकर्षणाशी संबंधित आहे. समुद्राचे पाणी आणि आपल्या शरीरातील रक्त ह्यांत खूपच साम्य आहे, हे मेडिकल सायन्सेसच्या आधारे सिद्ध झाले आहे. ब्लडप्रेशर असणार्‍या व्यक्तींना पौर्णिमेच्या दरम्यान अधिक त्रास होतो. म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावरही परिणाम होतोच. पागलखान्यात भरती केलेले वेडे, पौर्णिमेच्या दरम्यान विचित्र वागतात. मानवी मनावर, शरीरावर परिणाम करणारा चंद्र हा एकटाच आहे की इतरही ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य आदि सर्व खगोलीय वस्तुजात ह्या ब्रह्मांडातील सकल चराचर सृष्टी, आदी आपल्या शरीरातील कणाकणांवर परिणाम करीत असतात? ह्या सर्व परिणामांचे अति सूक्ष्म आणि अति सरळ पातळीवरचे गणित मांडणारे, अभ्यासणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. गल्लोगल्ली वा रस्त्यावर दुकान मांडून लोकांना फसविणार्‍या कुडमुड्या ज्योतिष्यांनी हे शास्त्र पूर्ण बदनाम करून टाकले आहे. जो येतो तो स्वत:ला एक निष्णात ज्योतिषी भासवितो. आपण अभ्यासिलेले उपाय ठासून सांगतात. मग हे उपाय केल्यावरही जर दोष गेले नसतील तर त्याचा हे विचारदेखील करीत नाहीत. स्वत:ची कोणतीच अनुभूती नसते, नशीब बदलविण्याचे त्यांचे सामर्थ्यही नसते. तरी ते इतरांच्या भविष्याशी सतत खेळत असतात. ज्योतिषशास्त्राचे सूक्ष्म आणि खरे गणित जाणून अचूक भविष्यवाणी करणारे प्रामाणिक अभ्यासक फारच थोडे आहेत, ते भेटणे हा खरा दैवयोगच आहे.

केवळ ज्योतिषशास्त्रच नव्हे तर अध्यात्माशी संबंधित सर्व शास्त्रे,वास्तुशास्त्र, स्थापत्य, नृत्य, संगीत, गायन, वादन, यज्ञशास्त्र, कर्मकांड ह्या सगळ्यांचे गहन विज्ञान आहे. आजच्या आधुनिक विज्ञानाची प्रगती ह्या प्राचीन विज्ञानापूढे अक्षरश: तोकडी आहे.

प्राचीन स्थापत्यशास्त्रांच्या आधारावर बनविलेल्या एखाद्या मंदिराचेच उदाहरण पाहा, अशा मंदिराच्या घुमटाचा आकार हा अति विशिष्ट ‘जॉमेट्रीतल्या पॅराबोलाच्या’ आकारासारखा असतो, अंतर्गोल आरशावर जर सूर्याची किरणे पडली तर ती परावर्तित होऊन आरशाच्या केंद्रस्थानी प्रखर उष्णता निर्माण करतात. ह्या केन्द्रस्थानी जर कापसाचा बोळा ठेवला तर तो क्षणार्धात जळू लागतो, मंदिराच्या घुमटाचाही असाच एक केद्रबिंदू असतो, तो बिंदू म्हणजे गाभार्‍यात बसलेल्या पूजार्‍यांचे स्थान. हे अति विशिष्ट आहे. त्या स्थानावर बसून म्हटलेल्या ॐ काराचा, मंत्रांचा, वैदिक मंत्रांचा ध्वनी घुमटाच्या आतील भागावरून परावर्तित होऊन अनेक पटींनी प्रभावी बनतो, मंदिरातील वातावरण भारून टाकतो आणि हे आपल्या रोमारोमाला जाणवते. किती परिणामकारक विज्ञान आहे हे !

हल्लीच्या काळात मंदिराच्या गाभार्‍यात ग्लेझ्ड टाइल्स लावल्या जातात. घुमटाच्या आकाराकडे कोणाचे लक्षच नसते. अगदी वाट्टेल त्या पद्धतीने आधुनिक मंदिरे बांधली जातात. प्राचीन स्थापत्यशास्त्राची टिंगल उडवून बांधलेल्या अशा मंदिरांत पावित्र्य जपले जाईल का? ह्याचा आपण विचारच करू शकत नाही. कारण आपल्याला ही प्राचीन कला आणि त्यांची मूळ संकल्पनाच अवगत नाही.

mrMarathi