वेद हे ज्ञान सागर असून सर्वच ज्ञान शाखांचे उगम स्रोत आहेत. वेदांच्या अभ्यासाने व वेदातील प्रयोगांच्या सिद्धतेने मानवाचे जीवन सुख समृध्दी पूर्ण सहजच होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोणत्याही दुष्परिणामाविना दुर्धर रोगाची निवृत्ती करु शकणारा आयुर्वेद जो अथर्ववेदातून निर्माण झालेला आहे.
वेद हे मूलभूत विज्ञान आहे व त्या मध्ये सृष्टीरचनेचे, सृष्टीपालन व विनाश या संबंधीचे सर्वच ज्ञान सांकेतिक रुपाने शब्दबद्ध केलेले आहे. असे असल्याने त्याच्या अभ्यासाशिवाय अनुभूती येणे दुरापास्त आहे. यामुळेच मानवी जीवनात, मानवाच्या उत्क्रांतीत शास्त्रशुद्ध, सप्रयोग वैदिक शिक्षणाचे अपरंपार महत्त्व आहे. असे विषेश शिक्षण ओम एजुकेशन सोसायटी मार्फत दिले जाते.
वैदिक शिक्षण
वेद प्रचार प्रसार कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे वैदिक पाठशाळा आहे. ह्या संस्थे मार्फत हे कार्य प्रह्लाद आश्रम चतुर्वेद पाठशाळे अंतर्गत सुरु आहे. वेद हे सार्वभौम ज्ञान आहे. वेद तत्वांमुळे माणूस बुद्धिमान, कर्तृत्ववान, दातृत्ववान होतो. त्याची कार्यक्षमता वाढते. सर्व प्रकारच्या सुख सोयींचा त्याला लाभ होऊ शकतो. तो दिर्घायुषी होउन उत्तम तर्हेचे जीवन जगू शकतो. ही वेदांची शिकवणूक येथून सांगीतली जाते.
वैदिक शिक्षणाच्या अंतर्गत चतुर्वेदांचे, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद ह्याचे अध्ययन तसेच उपनिषद, पुराण यांच्यातून निर्माण होणारे पूजा-विधाने ज्यानां सर्व सामान्यपणे याज्ञिकी असे संबोधल्या जाते त्याचेही येथुन प्रशिक्षण दिल्या जाते. आजपर्यंत येथून जवळ जवळ १५० विद्यार्थी असे प्रशिक्षण घेउन बाहेर पडले आहेत.
ॐ शिक्षण संस्थे तर्फे प्रह्लाद आश्रम चर्तुर्वेद पाठशाळा या नावाने वैदिक पाठशाळा अकोला येथे सुरु असुन इथुन पूर्णत: निःशुल्क वैदिक प्रशिक्षण देण्यात येते. ह्या सर्व कार्याला नाथपंथाचे परंपरागत आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. या शिक्षणासाठी गुरुकुल पध्द्तीने विद्यार्थ्यांस ७ ते १२ वर्षांपर्यंत आश्रमातच येथील नीतिनियमांना अनुसरुन रहावे लागते. साधारणत: वयाच्या सहाव्या ते नवव्या वर्षी आश्रमात प्रवेश घेता येतो. शिक्षण काळात विद्यार्थ्याचा अन्न, वस्त्र, शिक्षण साहित्य, औषध पाणी इत्यादी सर्व खर्च आश्रमातर्फेच केला जातो. म्हणजे येथून विद्या दान, अन्न दान, वस्त्र दान, व आरोग्य दान नियमित पणे होते.
येथून देण्यात येणार्या प्रशिक्षणा अंतर्गत वेदांच्या परिपाठासोबतच विद्यार्थ्यांना वैदिक तत्वांचा प्रत्यक्ष जीवनात कसा वापर करावा, तसेच वेद, उपनिषद, व पुरणातील प्रयोग कसे सिद्ध करावेत हे प्रात्यक्षिकासह शिकविले जाते.
अपारंपरिक शिक्षण पध्दती
साधारणतः सर्वसामान्यांना ज्ञात शिक्षण पध्दती म्हणजे शाळा कॉलेजातील शिक्षण. परंतु या शिक्षण पध्द्ती ने शिकवल्या जाणारे ज्ञान जरी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमीत होत असले तरी व्यक्तिगत जीवनातील ध्येय, मानसिक स्थैर्य, धाडस आत्मविश्वास व या सारखे इतर गुणग्रहण शक्य होत नाही. गुण ग्रहणासाठी सर्वोत्तम पध्दती ही की, ज्यांचे गुण आपल्यास संक्रमीत करुन घ्यावयाचे असतील, जसे की— छ्त्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी या सारख्या राष्ट्रीय व्यक्तींच्या गुण ग्रहणासाठी त्यांच्या चारित्र्याचा कर्तृत्वाचा अभ्यास करुन त्याची विचारसरणी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे ही होय.
प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात, “अभ्यास साधना व चिंतनाव्दारे युग पुरुष, ऋषीमुनी, युग प्रवर्तक, अवतारी पुरुषाचे गुण ग्रहण करणे व त्याव्दारे व्यक्तिमत्व घडवणे म्हणजेच अपारंपरिक शिक्षण पध्दती”.
मारुती, गणपती, शंकर, भगवान दत्तात्रय आदि देवता आहेत असा दृष्टिकोन मानव जातीने ठेवला परंतु ह्या पैकी कुणीच स्वतः ला देव समजले नाही अथवा आपली ओळख देव म्हणून दिली नाही. त्यांच्या देवासमान सामर्थ्याची अनुभूती सदैव इतर लोक घेत आले आणि म्हणूनच जन समुदायानी त्याना युग प्रवर्तक, युग पुरुष, एक आदर्श चारित्र्य संपन्न अनुकरणीय सत्पुरुष असे न समजता त्यांचे गुणग्रहण न करता, त्यांना देव संबोधुन बाजुला ठेवले. समाज एवढ्यावरच थांबला नाही, तर ह्या आदर्शांचे गुणगान करणार्या आणि त्यांच्या गुण वैशिष्ट्यांची अभिलाषा करणार्यांना अंधश्रध्द म्हणून हिणवू लागला.
ॐ शिक्षण मंडळाच्या माध्यामातुन समाजामध्ये अवतारी पुरुष, युग पुरुष यांच्या चरित्रावरुन त्यांचे गुण ग्रहण कसे करावे, तसेच आपल्याला जे गुण आपल्यात पहिजे त्यांची निर्मिती कशी करावी, त्यांची जोपासना कशी करावी ह्याचे अनुभव सिद्ध मार्गदर्शन करुन व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य केले जाते. हे शिक्षण येथून अपारंपरिक पध्दतीने प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाख़ाली देण्यात येते.