रास आणि त्या राशीच्या लोकांनी करावयाची दाने 

जीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे, तरी दान हे सहजतेने केले जात नाही. परंतु आपल्याला कल्पना असल्यास योजनाबद्ध दान करता येऊ शकते. दान हे नेहमी सत्पात्री असावे. सात्त्विक, सच्छील, नित्यनियमित कर्माचरण करणारा, वेदांची जोपासना करणारा, आपल्या संस्कृतीवर विश्वास असणारा ‘ब्राह्मण’ असावा. दानाची ही संकल्पना अतिप्राचीन आहे. कोणत्याही व्यक्तीच्या अगर दान घेणार्‍याच्या इच्छेचा वा लोभाचा ह्या संकल्पनेशी तिळमात्र संबंध नाही. दानाच्या महत्त्वाला शास्त्राधार आहे.

* रास                  दानाचा प्रकार

१. मेष व वृश्चिक      मसूरडाळ, गूळ, तांबे व निळे वस्त्र.

२. वृषभ व तूळ        ज्वारी, बाजरी, दूध, सुवर्ण व हिरवे वस्त्र.

३. मिथुन व कन्या         मूग, फळे, सुवर्ण व पिवळे वस्त्र.

४. कर्क              तांदूळ, साखर, रुपे व पांढरे वस्त्र.

५. सिंह              गहू, गूळ, तांबे व लाल वस्त्र.

६. धनू व मीन        हळद, मीठ, सुवर्ण व पिवळे वस्त्र.

७. मकर व कुंभ       तीळ, तेल, उडीद, लोखंड व काळे वस्त्र.

ग्रहांचे वैशिष्ट्य व त्याचा मानवी जीवनावर, स्वभाव वैशिष्ट्यांवर होणारा परिणाम

प्रत्येक जीवावर ग्रहांचा स्वत:चा परिणाम असतो. सूर्यमंडळात भ्रमण करणारा हा ग्रह त्याच्या परिणामस्वरूप माणसावर काय परिणाम करतो, हे ढोबळमानाने खाली दिले आहे. अखिल ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवावर ग्रहांचा परिणाम होत असतो. तो ग्रह किती अंशात्मक त्याच्या राशीला आहे त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव दिसेल. अशा प्रकारे प्रत्येक माणसावर आपोआप परिणाम होऊन त्याचे वागणेबोलणे, स्वभाव, विचार, व्यक्तिमत्त्व आदी गोष्टी घडतात.

रवी ग्रह :-सूर्य किंवा रवी हा ग्रहमालिकेचा राजा आहे. सर्वच ग्रह रवीच्या अस्तंगत भ्रमण करीत असतात. रवीमुळे माणसाच्या सुखदु:खाची कल्पना येते. समाजामध्ये त्याचा असलेला मानमरातब, द्वेष, राजसन्मान, अधिकार,पराक्रम, कीर्ती आणि निरनिराळ्या उद्योगधंद्यांचा बोध होतो. माणूस निर्भय आहे, प्रामाणिक आहे, की न्याय्य वृत्तीचा आहे, ह्याचा बोध रवी ह्या ग्रहावरून होतो.

रवी अनिष्ट असल्यास रवीचा जप करणे. ११ रविवारी दुपारी १२ ते १च्या दरम्यान ज्याला पीडा आहे त्याच्यावरून दहीभात ओवाळून, पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवणे, वा स्वत:च्या वजनाएवढा गहू नित्य वेद पठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे.

(२) चंद्र ग्रह :-चंद्र हा मनाचा कारक आहे. पृथ्वीचा तो उपग्रह आहे मानसिक ताणतणाव, सुखदु:ख ह्याचा विचार पत्रिकेतील चंद्र कसा आहे,ह्याच्यावरून केला जातो. परदेशगमन, जलप्रवास, उदर, स्तन आणि मेंदूवर

चंद्राचाच अंमल असतो. ऐश्वर्य, सुगंधी पदार्थ, संपत्ती इत्यादींची माहिती ह्या ग्रहावरून होते. चंद्र अनिष्ट असल्यास चंद्राचा जप करणे. लघुरुद्र करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा तांदूळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे.

(३) मंगळ :-मंगळावरून लहान भावंडांच्या सुखदु:खाचा, वैवाहिक जीवनाचा अंदाज घेता येतो. हा ग्रह पूढारी, सेनापती, डॉक्टर, शास्त्रज्ञ, लोहार,कासार व सोनार ह्या व्यक्तींचा कारक आहे. ह्या ग्रहावरून युद्ध, धरणीकंप,अग्निप्रलय आदींचा अभ्यास होऊ शकतो. जीवनातील फौजदारी खटले, तुरुंगवास,मरण इत्यादी गोष्टींचे ज्ञान देतो. मूत्राशयावर, रक्तस्रावावर, साथीच्या रोगावर मंगळाचा अंमल असतो. भूमीवर ह्याचा विशेष प्रभाव आहे. मंगळ अनिष्ट असल्यास मंगळाचा जप करणे. सप्तशतीचे पठण करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा गूळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. मंगळवारचे उपवास करणे. गणपतीची आराधना करणे.

(४) बुध:-मुळात हा ग्रह नपूंसक आहे. तसा जात्याच बुद्धिमान आहे. बुद्धिमत्ता, लेखनकार्य, गणिती क्षमता, न्यायव्यवस्था आदी बुद्धिमत्तेचे मूल्यांकन ह्या ग्रहावरून करतात. ज्ञानतंतू, मज्जातंतू, फुफ्फुसे, आतडी आणि जीभ ह्यांच्यावर बुध ग्रहाचा अंमल असतो. बुध अनिष्ट असल्यास बुधाचा जप करणे. निळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा मूग नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. बुधवारचे उपवास करणे. कृष्णाची आराधना करणे.

(५) गुरू :-हा आनंद व समाधान देणारा आहे. वेदान्त, तत्त्वज्ञान,गणित, शास्त्र, विविध कला आदींचे ज्ञान होऊ शकते. यश, कीर्ती, शांती आदींचे मोजमाप करता येते. कावीळ, मधुमेह, रक्तदाब, देवी, गोवर आदी व्याधींचे ज्ञान ह्या ग्रहावरून होऊ शकते.

गुरू अनिष्ट असल्यास गुरूचा जप करणे. पिवळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढी हरभराडाळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. गुरुवारचे उपवास करणे. दत्ताची आराधना करणे.

(६) शुक्र :-स्त्री, चैन व विलासयोग ह्या ग्रहावरून कळू शकतात. प्रापंचिक सुख, गायन, चित्रकला, साहित्य, मंत्रतंत्रविद्या, वाहनसौख्य, अमली पदार्थ, जुगार, वेश्याव्यवसाय, उधळपट्टीची वृत्ती, अत्तरे, अलंकार, वीर्यविकार,मासिक पाळी आदींचे ज्ञान ह्या ग्रहामुळे होते.

शुक्र अनिष्ट असल्यास शुक्राचा जप करणे. पांढर्‍या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा तांदूळ नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. शुक्रवारचे उपवास करणे. देवीची आराधना करणे.

(७) शनी :-व्यवहारदक्ष, तडकाफडकी निर्णय घेणे, गंभीर वृत्ती,चिकाटी हे विशेष गुण आहेत. वकील, शास्त्रज्ञ, गणित, गूढ विषय, नैराश्य हे विशेष आहेत. शरीरातील सांधेदुखी, दमा, अर्धांगवायू, हृदयविकार, मूळव्याध आदी शारीरिक त्रास शनीमुळे होऊ शकतात.

शनी अनिष्ट असल्यास शनीचा जप करणे. काळ्या वस्त्रांचे वा वस्तूंचे दान करावे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढा उडीद वा खाण्याचे तेल नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. शनिवारचे उपवास करणे. ‘पंचमुखी हनुमाना’ची संध्याकाळी उपासना करणे.

(८ व ९) राहू व केतू :-हे मुळात ग्रह नाहीत. ह्यांना छेदनबिंदू म्हणून मानले आहे. जन्मकुंडलीत ह्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. हे विषारी प्राण्याचे कारक आहेत. ह्यांच्यामुळे अघोरी विद्या, स्मृतिनाश, अंधत्व, नैराश्य,पंगुत्व, वेडेपण, विषप्रयोग, आत्महत्या, भूतबाधा आदींचा बोध होतो. कुंडलीत हे जर चांगल्या स्थितीत असतील तर अमाप पैसा व यश देतात. मानवी शरीरावर मंगळ व शनी ह्या ग्रहांचे परिणाम सांगितले आहेत, तसे होतात.

(८) राहू : अनिष्ट असल्यास राहूचा जप करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढे सप्तधान्य जिथे नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. पंचमुखी हनुमानाची संध्याकाळी उपासना करणे. लघुरुद्र करणे.

(९) केतू : अनिष्ट असल्यास केतूचा जप करणे. ज्याला पीडा आहे त्याने स्वत:च्या वजनाएवढे सप्तधान्य जिथे नित्य वेदपठण किंवा वेदाध्ययन होते तेथे किंवा गुरुचरणी समर्पण करणे. पंचमुखी हनुमानाची संध्याकाळी उपासना करणे. लघुरुद्र करणे.

mrMarathi