आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य. लेख-२२

आवरा षड्रिपुंना वेळीच नाश करिती जीवाचा (आत्मो. साधना) शरीर शुध्द करा. आत्मा उन्नत करा. हे श्री नरेंद्रनाथांच परोपरीन सांगण आहे. हाच आत्मोन्नती साधनेचा गाभा आहे. शरीर शुध्द करा हे नाथांच्या सूचनेतील पूर्वपद. आपण जस जन्माला आलो तस मरेपर्यंत राहिलो पाहिजे. याचा अर्थ निरागस राहता आल पाहिजे. सुसंगती जडली पाहिजे. षड्रिपूच्या कुसंगतीन शरीर मळत. निरागस देह कुरूप होतो. आत्मा उन्नत करायचा असेल तर शरीर शुध्द पाहिजे. शरीर वेष्टन असे आत्म्याचे आत्मा वास करी शरीराते.। शरीर आपल्याला आत्मा उन्नत करण्यासाठी मिळालेल साधन आहे. साधन कस ठेवाव ? नित्याच्या व्यवहारातील उदाहरण पाहू. पाणी प्यायच असल तर , हात स्वच्छ धुवून घ्या. ज्या फुलपात्रान पाणी प्यायच असेल ते स्वच्छ घासून , विसळून घ्या , पुसून घ्या. आपण केवढे साशंक असतो. जागरूक असतो. पाणी पिण्याच्या वेळी घेतलेली ही खबरदारी. देह हा ब्रह्मरसाची मुस आहे. ज्या शरीराचे माध्यमातून ब्रह्मांडनायक ही पदवी मिळवायची आहे तो देह किती शुध्द असला पाहिजे. हा विचार महत्त्वाचा. त्यासाठी बुध्दीला निश्चयात्मक बनव. ती सत्याचा कैवार , पक्ष घेणारी असू दे. तिला कुसंगतीन बिघडवू नको. विषयांच्या सक्तीमुळे ती ईश्वर चरणी स्थिर होत नाही. मनाचही तसच. या देहामधील मन हे श्री सद्गुरूंच्या चरणी स्थिर करायच. अमाप सुख मिळत. तुकोबाराय म्हणतात. मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी । विठोबाच्या पायी राहणार्‍या मनात काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर असेल तर श्री चरणी आपण ते वाहू शकु का ? आधी तो केर काढ. मन स्फटिक कर. स्वच्छ नि पारदर्शी कर. मन सर्व इंद्रियांचा राजा आहे. त्याला विकाराच गुलाम बनवू नको.
श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय !
लेखक- प्रा. गजानन कुळकर्णी.gajanankulkarni19@gmail.com

Leave a Reply