ब्रह्मा, विष्णू आणि महेश या भिन्न देवता आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय ही त्यांच्या कार्याची मर्यादा आहे. परंतु या तिघांच्या तत्त्वांनी जे भगवान दत्तात्रेय झाले, ते सर्व देवांचे, संपूर्ण ब्रह्मांडाचे अध्यात्मिक गुरु झाले.
धर्मगुरू आणि अध्यात्मिक गुरु यांच्यातला फरक लक्षात घेण्यासारखा आहे. धर्मगुरू हे धर्म, समाजनियम किंवा प्रकृतीनियमाप्रमाणे कार्य करणारे—मार्गदर्शन करणारे गुरु असतात. त्यांना सदैव नियमांनुसारच चालावे लागते.
परंतु अध्यात्मिक गुरुंना कोणतेही नियम बंधनकारक नसतात. कोणताही ब्रह्मांडनियम किंवा निसर्गदत्त नियम *कोणाच्या बाबतीत केव्हाही, कोणालाही न सांगता, कारणमीमांसा न देता* तोडण्याचा पूर्ण अधिकार फक्त अध्यात्मिक गुरुंकडेच आहे. सामाजिक भाषेत ज्याला “डिस्क्रिशनरी पॉवर” म्हणतो, ती अध्यात्मिक गुरुंकडे असते.
जीवशक्तीला लागू होणारे किंवा निसर्गाला लागू होणारे कोणतेही नियम ते इच्छा असेल तेव्हा, क्षणार्धात बदलू शकतात. हा अधिकार देवतांनाही उपलब्ध नाही.
आपण सामान्यतः असे समजतो की देव काहीही करू शकतो—परंतु असे प्रकट अधिकार देवांकडे नसतात. खरा अधिकार सद्गुरूंना असतो.
भगवान दत्तात्रेय हे—सर्व देवांचे, सर्व जीवांचे, संपूर्ण निसर्गाचे अध्यात्मिक गुरु आहेत. निसर्ग बोलत नाही म्हणून आपण मानवाला जास्त महत्त्व देतो; परंतु निसर्गातील सर्व शक्ती—वादळ, भूकंप, अतिवृष्टी इ.—अध्यात्मिक गुरुंच्या आज्ञेत चालतात.
एकदा असे झाले—
देवगावला गुरुंच्या ठिकाणी वर्षिक उत्सवासाठी बरेच शिष्य–भक्त जमा झाले होते. बाजारातून सर्व साहित्य आणले होते. उत्सवाच्या दिवशी बुंदीचे लाडू करायचे ठरले होते.
रात्री बुंदी पाडून लाडू बांधायचे, आणि सकाळी मोठ्या पंगतीसाठी स्वयंपाक करायचा होता. सर्व साहित्य आले, पण तूपाचे डबे आलेच नाहीत. ते दुसऱ्या दिवशी औरंगाबादहून येणार होते.
म्हणून लाडू बनवणे अशक्य झाले. रात्रीचे नऊ वाजले होते. सर्वांना काळजी वाटू लागली—महाराजांना सांगणे भागच होते. ते रागावतील, हे निश्चित होते.
औरंगाबाद ३० किमी दूर; दुकाने बंद. रात्री तूप मिळणे अशक्य.
जेव्हा महाराजांना परिस्थिती सांगितली, तेव्हा त्यांनी विचारले—
“किती डबे उद्या येणार आहेत?”
उत्तर मिळाले—“दोन डबे.”
महाराज म्हणाले—
“आत्ताच विहिरीतले दोन डबे पाणी काढा आणि कढईत टाका. उद्या तूप आल्यावर ते विहिरीत टाका—काम होईल.”
सांगितल्याप्रमाणे दोन डबे पाणी काढले, कढईत टाकले— पाणी उकळले… आणि तूप झाले!
त्यात बुंदी तळली गेली, लाडू बांधले गेले. सकाळी सर्वांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण केले.
विशेष म्हणजे—
सकाळी कळले की तूप थिजलेले होते. नंतर बाजारातून दोन डबे तूप आले; ते फोडून विहिरीत टाकले. त्या विहिरीतील पाणी दररोज उपसले जात होते— पण पाण्यातून तुपाचा तवंगही आला नाही!
काय आश्चर्य— पाणी काढताच तूप झाले, आणि तूप पाण्यात टाकताच ते पाणी झाले!
निसर्गाचे सर्व नियम, ब्रह्मांडाचे सर्व नियम, क्षणार्धात बदलले. जे ब्रह्मा–विष्णू–महेशही करू शकत नाहीत, ते सद्गुरू—भगवान दत्तात्रेयांचे स्वरूप—सहज करतात.
देवी–देवता ज्यांना समर्थ नाहीत— सद्गुरू ते क्षणात करतात.
अशक्य ते तुम्हा नाही, सद्गुरुराया!