जर गुरूंचे मार्गदर्शन लाभले असेल तर गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना–उपासना करावी व जीवनात पुढील तत्त्वांचा अंमल करावा. आणि जर गुरु लाभले नसतील, तर आपल्या आवडीच्या देवतेचे नामस्मरण करावे व खालील पथ्ये पाळावीत. सद्गुरूंची भेट आपोआप होईल आणि जीवन सन्मार्गी लागेल.
(१) भूतकाळाची आठवण नको; भविष्यकाळाची चिंता नको. आजचा दिवस जितका चांगला घालवता येईल, तितका चांगला घालवावा.
(२) परमेश्वर ठेवील त्या स्थितीत आनंदाने राहावे.
(३) परमेश्वराकडे सुखाची याचना करू नये. यामुळे जीवदशा वाढते; तीच कमी करायची असते.
(४) संकल्प-विकल्पांना मनात थारा देऊ नये. ते क्वचितच सिद्ध होतात; पण आपली आशा वाढते आणि मनस्ताप होतो.
(५) जगाबद्दल उदासीन रहावे.
(६) राग आणि द्वेष गेले की मन शुद्ध होते. तेव्हाच देवाचा वास होतो.
(७) सर्वांशी नम्रतेने रहावे; पण लांगूलचालन नको.
(८) सर्वभूती दया असावी.
(९) प्रारब्ध भोगूनच संपते. संकटांत धैर्याने तोंड द्यावे.
(१०) जे करायला अवघड असते ते प्रथम करावे; बाकी कामे सहज होतात.
(११) संसाराची आसक्ती कमी कमी करावी.
(१२) ‘मी मोठा ज्ञानी’ हा अहंभाव नको. ब्राह्मी स्थितीत ज्ञान आणि अज्ञान दोन्ही नसते.
(१३) साधकाने निर्व्यसनी असावे. यामुळे बुद्धी तल्लख होते आणि आत्मविचार शक्य होतो.
(१४) नेहमी सात्त्विक आहार घ्यावा. जसे अन्न, तसे मन; सात्त्विक मन ईश्वरोपासनेस योग्य.
(१५) ईश्वरी संकल्पाने प्राप्त झालेले भोग किंवा दुःखे टाकता येत नाहीत. त्यांना सामोरे जाणे उत्तम.
(१६) धन, संपत्ती, वैभव — हे ईश्वराचे देणे. शेवटी सोडून जायचे — ही भावना सदैव ठेवावी.
(१७) जितके कमी बोलाल, तितके मन शांत व शक्तिशाली बनते. कमी बोलणे म्हणजे मौनच.
(१८) शक्य तितका एकांत साधावा. दिव्य अनुभव जाणण्यास मदत होते.
(१९) परधन, परस्त्री यांची अभिलाषा नको.
(२०) सर्व देव एकच; तत्त्व एकच. फरक फक्त आपल्या भावनेत. म्हणून सर्वांबद्दल आदर; आपल्या देवाबद्दल अधिक आपुलकी. भांडण नको.
(২১) लोकांच्या आनंदात, वैभवात सुख मानावे. दुःखरहित सुख फक्त जीवन्मुक्तांना.
(२२) जोपर्यंत तुम्ही याचक नाही, तोपर्यंत भिण्याचे कारण नाही. सर्वच परमेश्वररूप — मग भ्यायचे कोणाला?
(२३) दुसऱ्यावर उपकार करा. अनेकांचा आशीर्वाद हे बलवान शस्त्र. दानधर्मात अहंकार नको — सर्व ईश्वराचे; आपण फक्त निमित्त.
(२४) खोटे आश्वासन देऊ नका; खोटे बोलू नका. हे सत्यापासून दूर नेते; अध्यात्मात अशोभनीय.
(२५) दुसऱ्यांच्या दोषांत आनंद मानू नये.
(২৬) आनंदी, स्वस्थ मनाने केलेली उपासना प्रभावी असते. मारून-मुटकून बसण्यात ओलावा नसतो; भावही नसतो.
(27) चमत्कारांवर भुलू नका.
(28) आई, वडील, गुरु — यांस पूज्य मानावे.
(29) अंतर्मुख व्हावे; त्यामुळे शांती मिळते.
(30) साधकांनी समाजात जास्त मिसळू नये. विकार निर्माण करणारे नाटक, सिनेमा, तमाशे टाळावेत.
(31) नुसते “राम राम” म्हणण्यापेक्षा व्यवहारातही रामासारखे वागणे अधिक फायदेशीर. हीच नाथांची जीव–ब्रह्मसेवा.
(32) संकटकाळी धैर्य सोडू नये. ईश्वरकृपेने मार्ग सापडतो; ढगासारखे संकट जातात.
(33) लोटा जसा रोज धुवावा लागतो, तसे साधनाही रोज करावी. आळस उपयोगाचा नाही.
(34) पाऊस न आला तरी शेतकरी मशागत करतोच. तसे प्रगती न दिसली तरी साधना चालू ठेवावी.
(35) आपण चिरंजीव नाही. भांडणात वेळ न घालवता चिंतन–मननात घालवावा.
(36) साक्षात्कारी संतांचेच ग्रंथ वाचावेत. नुसते प्रकांड पंडितांचे वाचण्यात उपयोग नाही.
(37) श्रीमंत व नास्तिक लोकांपासून दूर रहावे. भोगांची इच्छा वाढते व ईश्वर विसरतो.
(38) जग ही ईश्वरी लीला; आपण नट. जे काम मिळाले ते योग्य रीतीने करणे; काम झाले की पडद्याआड जाणे — नाटककार ईश्वरच.
(39) मृत्यू अटळ; त्याला भीती कशाची?
(40) दुष्टांपासून दूर रहावे. वादविवाद टाळावेत. गरज पडेल तेव्हा फुत्कारावे; पण चावा घेऊ नये. प्रेमाची वागणूक, आध्यात्मिक बळ — यांचा प्रभाव निश्चित पडतो; शत्रूही मित्र बनू शकतो.
(41) पुढे पुढे सगे–सोयरे, घरातील मंडळी — यांच्याशी केवळ आवश्यक संबंध ठेवावेत. जास्तीत जास्त एकांत, मौन, अंतर्मुखता वाढवावी. प्रारब्धाला शिव्या देऊ नका; सतत प्रयत्न करा. चित्त प्रसन्न ठेवा.
आपण या जगात आनंदाने आलो; जावेही आनंदाने आहे. मधला काळही आनंदाने जाईल अशी कर्मे करावीत.
अलिप्त राहून बुद्धीचे खेळ पाहावेत — यात फायदा आहे. आत्मनिरीक्षण–आत्मोन्नतीचा सतत अभ्यास हवा. निराशा, न्यूनगंड — झुरळासारखे झटकून टाकावेत. तक्रार नको; कारण तेच प्रगतीच्या आड येतात.